33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरसंपादकीयअदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना...

अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…

अदाणींना लागलेला धक्का अर्थकारणासाठी चांगली बाब निश्चितपणे नाही, हे षडयंत्र आहे.

Google News Follow

Related

शेअर बाजारात आजच्या दिवसाचे वर्णन ब्लॅक फ्रायडे असेच करावे लागेल. आज निर्देशांक ८७४ पॉइंट घसरला. भारतीय उद्योग जगातील फ्लॅगशिप कंपनी अदाणी समुहाचे शेअऱ आज दणदणीत कोसळले. ज्या हिंडेनबर्ग शॉर्ट सेल एण्ड रिसर्च फर्मच्या अहवालामुळे बाजारात ही उलथापालथ झाली, ती पाहून डॅनिअल क्रेगचा कसिनो रॉयल हा बॉण्डपट आठवल्याशिवाय राहात नाही.

दहशतवादी संघटनांचा पैसा शेअर बाजारात गुंतवणारा एक बँकर. दहशतवादी आणि बँकर मिळून प्रचंड पैसा कमावण्याचा एक डाव रचतात. विमान दुर्घटनेचा प्लॉट रचला जातो. दिवस निश्चित केला जातो. दुर्घटनेच्या ठीक आधी विमान कंपनीच्या शेअर्सचा शॉर्ट सेल केला जातो. शॉर्ट सेल म्हणजे शेअरच्या किमती कोसळतील असा अंदाज बांधून केलेली आधीच केलेली घाऊक विक्री. विमानाला ऑईल टँकर धडकणार असतो. या घातपातानंतर विमान कंपनीचे शेअर्स कोसळतील आणि त्यातून प्रचंड फायदा होईल असा हा डाव. म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स कोसळतील याची पार्श्वभूमी आधीच तयार करायची. ही बातमी काही ठराविक लोकांना कळवायची. प्रचंड रकमेचे शॉर्ट सेल करायचे आणि खोऱ्याने पैसा कमावायचा.

भारतीय शेअऱ बाजारात ज्या हिंडेनबर्ग शॉर्ट सेल एण्ड रिसर्च फर्म या कंपनीने अदाणी समुहाचे १२ वाजवायचा प्रयत्न केला तो प्रकार असाच आहे का? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे या फर्मचा इतिहास तसाच आहे. फर्मच्या अहवालात तथ्य किती हे बाहेर येईलच, परंतु हिंडेनबर्गच्या अहवालाचा हेतू काय, यावरही चर्चा झाली पाहिजे. अमेरिकी सरकार या कंपनीची चौकशी करते आहे. २०२० पासून ३० कंपन्यांची नौका बुडवली आहे. या कंपन्या बुडाल्यामुळे गुंतवणूकदार कंगाल झाले, परंतु काही जणांचे मात्र उखळ पांढरे झाले. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे यूएस डीपार्टमेंट ऑफ जस्टीसकडून अशाच संशयास्पद शॉर्ट सेलसाठी या फर्मची चौकशी सुरू आहे.

कंपनीचा कच्चाचिठ्ठा काढायचा. अहवाल तयार करायचा, हा या फर्मचा उद्योग आहे. परंतु हा अहवाल प्रसिद्ध करण्याआधी १० बड्या गुंतवणूकदारांना लीक केला जातो. ही मंडळी शेअर कोसळणार हे आधीच माहीत असल्यामुळे शॉर्ट सेल मारून ठेवतात. शेअर जेव्हा प्रत्यक्षात कोसळतो तेव्हा प्रचंड पैसा कमावतात.

गेल्या काही वर्षात अदाणी समुहाची कमान सतत चढती आहे. बंदरे, विमानतळ, ग्राहकोपयोगी वस्तू, गॅस, कोळसा, वीज, सिमेंट, लॉजिस्टीक, खाणी, सौर ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात अदाणी समुहाने हातपाय पसरले. अनेक कंपन्या विकत घेतल्या. गौतम अदाणी १२० अब्ज डॉलर मालमत्तेसह देशातील पहिल्या क्रमांकाचे तर जगात तिसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती झाले. जेव्हा तुम्ही जुने संस्थानिक खालसा करून नवे संस्थानिक बनता तेव्हा संघर्ष होतोच. कॉर्पोरेट जगातील हे संघर्ष छुपे, परंतु अधिक धारधार असतात. अदाणींच्या प्रकरणाला तर राजकीय संघर्षाची किनारही आहे. आंतरराष्ट्रीय आयाम आहेत.

गेल्या दशकभरात अदाणींची गरुड भरारी अनेकांना खुपत होती. एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२२ दरम्यान अदाणी समुहाच्या शेअर्सच्या किमती सुमारे ४० पट वाढल्या. कंपनीचे भागभांडवल १७ लाख ४४ कोटी रुपयांनी वाढले. हा वेग अफाट होता. मीडियातील एक मोठा गट, अनेक राजकीय पक्ष त्यांना पाण्यात पाहात होते. त्यामुळे एकीकडे अफाट प्रगती होत असताना, त्यांच्याबाबत कुजबुज वाढत होती. अदाणी समुहावर वाढलेला कर्जाचा बोजा हा चर्चेचा मुख्य बिंदू होता. CLSA या नावाजलेल्या वित्तिय कंपनीच्या अहवालानुसार कंपनीचे कर्ज गेल्या चार वर्षात एक ट्रीलियन रुपयांवरून दोन ट्रीलियन रुपयांवर गेले. यापैकी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा आकडा सुमारे ८०० कोटी रुपये इतका आहे.

हे ही वाचा:

अखेर मालाडच्या बागेतून ‘टिपू सुलतान’ला पळवून लावले

कॅप्टन कूल म्हणतोय ‘लेट्स गेट मॅरिड’

पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

हिंडेनबर्गचा अहवाल २४ जानेवारीला प्रकाशित झाला. देशाबाहेरील शेल कंपन्यांना पैसे पाठवून, हाच पैसा अदाणी समुहाच्या शेअर्समध्ये गुंतवला जातो, शेअऱ मार्केटमध्ये अदाणी समुहाच्या शेअर्सची किंमत फुगवण्याचे काम काही बड्या ब्रोकर्सना सोपवण्यात आले आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्यामुळे गेल्या आठ वर्षात कंपनीतून चार चीफ फायनान्स ऑफिसर्सनी राजीनामा दिला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अदाणी परिवाराचे सदस्य समुहाच्या महत्वाच्या पदावर आहेत, असे अनेक आक्षेप हिंडेनबर्गच्या अहवालात घेण्यात आले आहेत.

अहवालात अदाणी समुहाला ८८ प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्सना ९६ लाख ६७२ कोटींचा फटका बसला. आजवरचे नुकसान ३६.५ अब्ज डॉलर्सचे आहे. पाकिस्तानच्या तिजोरीत ६ जानेवारी रोजी सुमारे १० अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. ही बाब लक्षात घेतली, तर ३६ अब्ज डॉलर्स म्हणजे किती मोठी रक्कम आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकेल.

अदाणी समुहाने हिडनबर्गच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रसिद्धी पत्रकच जारी केले आहे. अदाणी समुहाचा महत्वाकांक्षी एफपीओ बाजार येणार असून त्याला अपशकून करण्यासाठी हा अहवाल प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा एफपीओ २० हजार कोटी रुपयांचा असून आजवरचा सर्वात मोठा एफपीओ आहे. हिंडेनबर्गवर कायदेशीर कारवाई कऱण्याचा इशाराही अदाणी यांनी दिला आहे.

२००८ साली अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स ही ६० अब्ज डॉलर्सचे भाग भांडवल असलेली कंपनी दिवाळखोर झाल्यामुळे अमेरिकेला मंदीचा तडाखा बसला होता. अवघ्या जगाला त्याची झळ बसली परंतु सुदैवाने भारत यातून तरला. कोविडमुळे जगभरातील अर्थव्यवस्था डळमळत असताना भारतात आर्थिक चित्र उत्साहवर्धक आहे. इंडिया टू डे समुहाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून केलेल्या सर्वेमध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर येणार असा निष्कर्ष व्यक्त केला आहे.   भारत एक बलाढ्य विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. नेमकी ही बाब जगाचे नियंत्रण करणाऱ्या शक्तींना खटकते आहे. बीबीसीवर अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करणारी एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाली. हिंडेनबर्ग अहवाल याचे पुढचे पाऊल असावे. २०२४ पर्यंत असे अनेक बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. अर्थात, या अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यावाचून अदाणींना पर्याय नाही. अदाणींना लागलेला धक्का अर्थकारणासाठी चांगली बाब निश्चितपणे नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा