33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरसंपादकीयआव्हाड तुमचा रामाशी संबंध काय?

आव्हाड तुमचा रामाशी संबंध काय?

आव्हाडांनी गाझाबद्दल बोलत राहावं, इशरत जहाँच्या नावाने आणखी चार रुग्णवाहीका चालवाव्यात

Google News Follow

Related

देशभरात माहोल राममय झाला आहे. आपण स्वत:ला प्रभू श्रीरामाशी जोडले नाही तर आपल्यावर बुलडोजर चालेल याची जाणीव राजकीय नेत्यांनाही झालेली आहे. तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रिगेडी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. ‘राम मांसाहारी होता, तो आम्हा बहुजनांचा’, असा दावा त्यांनी केला आहे. म्हणजे पुन्हा रामाच्या निमित्ताने हिंदूंमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशी फूट पाडण्याची संधी. राम काय होता? हे सांगण्याची वेळ आव्हाडांवर यावी इतकी काही रामभक्तांची परीस्थिती वाईट स्थिती नाही. राम शाकाहारी होता की मांसाहारी हे आमचे आम्ही बघून घेऊ, तुमचा रामाशी संबंध काय हे आधी सांगा, हे आव्हाडांना ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे.

आव्हाडांचे राजकीय गॉडफादर शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना हिंदू देवदेवतांचे वावडे आहे, हे काही गुपित राहिले नाही. मटण खाऊ दगडूशेठ मंदीरात दर्शनाला जाणारे आणि अचानक मटण खाल्याचे आठवल्यामुळे दर्शन न घेणारे शरद पवार आणि संकष्टीला मटण खाऊन त्याचे कौतिक करणाऱ्या सुप्रिया सुळे असे दिव्य नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला लाभलं आहे. हिंदूद्वेष्टे ब्रिगेडी तत्वज्ञान हा त्यांच्या पक्षाचा आधार राहीलेला आहे.

 

हिंदूंमधील जातीच्या भिंती उंच उंच करत राहाणे आणि पराकोटीचा मुस्लीम अनुनय हे त्यांचे धोरण आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान हा त्या धोरणाचा अविभाज्य घटक आहे. इशरत जहांसारख्या दहशतवादी तरुणीचे समर्थन करणे, तिची भलामण करणे हे त्यांचे लाडके उपक्रम. राम मंदीर आंदोलनाच्या सुरूवातीपासून पवारांनी केलेली विधाने अत्यंत विखारी आहेत. या संपूर्ण आंदोलनाला ते किती पाण्यात पाहातात अशा उदाहरणांची जंत्री देता येईल. राम मंदीरामुळे कोरोना जातो का? हे तर अगदी ताजे विधान.

अयोध्येत आज भव्य मंदीर उभे राहते आहे, त्यासाठी कोणी खस्ता खाल्या? बाबरी ढाचा कोसळल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी राजीनामा दिला. भाजपाशासित चार राज्य तत्कालीन केंद्र सरकारने बरखास्त केली. देशातले समस्त डावे, लिबरल, छद्म धर्मनिरपेक्षतावादी, काँग्रेसची चाटुकारिता करणारे पत्रकार या आंदोलनात कोलदांडा कसा घातला येईल एवढे एकच काम करत होते. ‘सेव्ह गाझा’ सारखी आंदोलने करत होते, ज्याचा या देशाशी, देशातील नागरीकांशी काहीही संबंध नाही. आव्हाडांसारखे निलाजरे मुंब्र्यातील एका दहशतवादी तरुणीचा उदो उदो करत होते. या मंडळींचा रामाशी संबंध काय? ज्यांचा काडीचा सहभाग नाही, असे लोक आज अयोध्येत उभ्या राहीलेल्या मंदीराबाबत
जमेल त्या मार्गाने पोटशूळ व्यक्त करतायत. धार्मिक उन्माद काय आणि धर्माचा व्यापार काय? कोण भिक घालतेय या विचार जंतांना?

प्रत्येक मंगलमय आणि पवित्र कार्यावर पिंका टाकण्यासाठी आपला जन्म झालाय, असा समज झालेले मनोरुग्ण हिंदू समाजात आलेले चैतन्य पाहून कमालीचे दु:खी झाले आहेत. देशात गेली ५०० वर्षे राम जन्मभूमीसाठी संघर्ष सुरू आहे. कधी तो तीव्र झाला कधी मंदावला. परंतु हा संघर्ष थंडावला अशी स्थिती कधीच आली नाही. १९८९ पासून या आंदोलनाला धार आली. देशात राम मंदिरासाठी अनेक अभियाने हाती घेण्यात आली. राम रथयात्रा, रामशीला पूजन, गंगा पूजन झाले. १९९०, १९९२ मध्ये कारसेवा झाली. पहिल्या कारसेवेत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू कारसेवकांचा बळी घेण्यात आला. या संपूर्ण संघर्षात आव्हाड यांच्यासारखे भंपक कुठे होते?

या अभियानात त्यांचा सहभाग काय होता. राम बहुजनांचा आहे, याची उपरती झालेल्या आव्हाडांनी अयोध्येत प्रभू रामाच्या डोक्यावर छत नाही, म्हणून कधी तरी खंत व्यक्त केली होती का? कधी त्यांचे मन हळहळले होते का? अयोध्येत भव्य राम मंदीर झाले पाहिजे, अशी मागणी तरी कधी केली होती का? त्या काळी मुस्लीम मतांसाठी बाबरीचे ताबूत खांद्यावर घेऊन त्यांचे नेते शरद पवार नाचत होते. अयोध्येत राम मंदीर कसे उभे राहणार नाही, बाबरी ढाचा हिंदूंच्या छाताडावर जन्मभर कसा कायम राहील यासाठी प्रयत्न करत होते. त्या काळी केंद्रात संरक्षण मंत्री असलेले शरद पवार यांनी पंतप्रधान नरसिंहराव यांना सावध केले होते. ‘भाजपावर विश्वास ठेवू नका, बाबरीला ढाचाला धोका निर्माण होऊ शकतो’. अर्थ स्पष्ट आहे. ज्यांचा जीव बाबरीसाठी तुटत होता.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम मंदिराबाबत ऐतिहासिक निवाडा दिला. एका ट्रस्टची स्थापना करून मंदीर निर्मितीचा मार्ग प्रशस्त करा असा आदेश दिला. तेव्हा देशातील समस्त रामभक्तांनी उत्सव साजरा केला. शरद पवारांना तेव्हा प्रश्न पडला होता की ‘बाबरी मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना केव्हा होणार?’ अनेकांना तेव्हा प्रश्न पडला होता. शरद पवारांचे बाबराशी नेमके नाते काय? अयोध्येत राम मंदीर निर्माण होणार याचा आनंद ना कधी पवारांना झाला, ना सुप्रिया सुळे यांना, ना कधी आव्हाडांसारख्या त्यांच्या चेल्यांना. मग राम मंदिराचे काम आता अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर रामावर दावेदारी सांगायला येणारे हे आव्हाड कोण? आणि पवार तरी कोण?

हे ही वाचा:

हिजबुलचा वॉन्टेड दहशतवादी जाविद अहमद मट्टू दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!

प. बंगालमधून दीड लाख अमेरिकन डॉलर जप्त

अन्य धर्माबद्दल बोलले असते तर आव्हाड जिवंत तरी राहिले असते का?

आव्हाडांनी गाझाबद्दल बोलत राहावं, इशरत जहाँच्या नावाने आणखी चार रुग्णवाहीका चालवाव्यात. राम हा त्यांचा प्रांत नाही. राम मंदीर निर्मिती मुळे अवघ्या देशात उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे ब्रिगेडी मानसिकतेच्या तमाम नेत्यांची थोबाडं काळवंडली आहेत. पाटणकर काढा घेतल्यासारखी ही मंडळी या विषयावर व्यक्त होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्यामुळे थयथयाट करतायत. राम ही भाजपाची प्रॉपर्टी आहे का? असा सवाल करत आहेत. अशा तमाम मंडळींना ठणकावून सांगण्याची गरज आहे. होय आम्ही राम विकत घेतला आहे. ‘नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम… परंतु जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरीनाम’. शब्द गदीमांचे असले तरी या भावना समस्त भारतीयांच्या आहेत.

 

बाकी राम १४ वर्षे वनवासात होता, म्हणून तो मांसाहारीच असणार हा आव्हाडांचा तर्क त्यांच्या ‘तीक्ष्ण’ बुद्धीमत्तेची साक्ष देणारा आहे. जंगलात ऋषी पण राहायचे हे बहुधा त्यांना माहीत नसावे. जंगलात कंदमुळे, फळे आणि खाण्यायोग्य वनस्पतीही मिळतात, हेही त्यांना ठाऊक नसावे. राम शाकाहारी होता म्हणून पूजनीय झाला नाही. तो मर्यादा पुरुषोत्तम होता म्हणून पूजला जातो हे कोणी तरी त्यांना सांगण्याची गरज आहे. अवघी हयात मुंब्र्यात बसून ‘सेव्ह गाझा’ सारखी बनावट आंदोलनं करण्यात गेली. त्यामुळे हिंदू धर्मातील या मूलभूत बाबींची त्यांना माहीती नाही. रामाबद्दल मतं मांडणे ही फार दूरची गोष्ट आहे, प्रभू रामाचे नाव घेण्यासाठीही किमान पात्रता लागते, ज्याला बोली भाषेत लायकी म्हणतात. ज्यांच्याकडे ती नाही, त्यांनी रामाच्या नावाने उपद्व्याप करण्याच्या भानगडीत पडू नये.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा