28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरसंपादकीयघोषणा  ‘४०० पार...’ची निकाल ३०० च्या आत... भाजपाचे गणित कुठे चुकले?

घोषणा  ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?

हिंदू मतदार एकजुटीने मतदान करेल असे वाटत असताना जात पुन्हा एकदा प्रभावी ठरलेली दिसते

Google News Follow

Related

एक्झिट पोलमुळे भाजपाचे तिसऱ्यांदा सत्तेत दमदार आगमन होते आहे, असे वाटत असताना हिशोब किंचित फसलेला दिसतोय. नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करतील असे आकडे सांगतायत, परंतु हे सरकार मोदी किंवा भाजपाचे सरकार नसेल. कारण भाजपाला बहुमताचा आकडा मिळालेला नाही. सरकार रालोआचे असेल ते नीतीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या मेहरबानीवर असेल.

भाजपा २३९, रालोआचा आकडा २९५ च्या आसपास असून काँग्रेसला ९८ जागा मिळाल्या असून इंडी आघाडीला २३२ च्या आसपास जागांवर आघाडी दिसते आहे. उत्तर प्रदेश, बिहार, प.बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यात भाजपाला जबरदस्त फटका बसला आहे.

दोनदा देशात सत्ता स्थापन केल्यानंतर कमी जागांसह का होईना पुन्हा सत्तेत येणे सोपे नसते. जिथे काँग्रेसला एकदा जिंकलेले राज्य टिकवता येत नाही, तिथे भाजपाने तीन वेळा देशाची सत्ता टिकवली हेही नसे थोडके. भाजपाला जे काही मिळाले ते नरेंद्र मोदी यांच्या नावावर मिळाले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये ते भरभरून मिळाले यावेळी अपेक्षेपेक्षा कमी मिळाले हे निश्चित. भाजपा सत्तेत येणार असे चित्र दिसत असताना उत्साह आणि जल्लोष मात्र विरोधी गोटात आहे, हे नाकारता येत नाही. काँग्रेसला शंभर जागा मिळालेल्या नसताना सत्तेत येण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न दिसतो आहे. रालोआत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे.

आकडे सांगतायत, सरकारची भूमिका सब का साथ, सब का विकास अशी असली तरी, विकास झालेल्या सर्वांनी भाजपाला मतदान केलेले नाही. उत्तर प्रदेश, प.बंगाल, बिहारचे निकाल स्पष्ट सांगतायत. मुस्लिमांचे मत एकतर्फी भाजपाच्या विरोधात पडलेले आहे. त्या तुलनेत २०१४ आणि २०१९ मध्ये जातीच्या भिंती तोडून मतदारांनी भाजपाला केलेले मतदान २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा जातीवर गेलेले दिसते. भाजपा सत्तेवर आला तर संविधान बदलेल या आवईचा परिणाम दलित मतांवर झालेला आहे. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी हे पक्ष फोडून भाजपाने सत्ता स्थापन केली इथपर्यंत ठीक होते, परंतु भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना सत्तेत मानाचे स्थान देण्याच्या भूमिकेबाबत मतदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.

हिंदू मतदार एकजुटीने मतदान करेल असे वाटत असताना जात पुन्हा एकदा प्रभावी ठरलेली दिसते. मनोज जरांगे पाटील यांच्या आडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीचे विष कालवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मित्र जोडल्याचा भाजपाला फायदा होण्यापेक्षा तोटा झाल्याचे चित्र आहे. क्षमतेपेक्षा जास्त जागा घेण्याचा एकनाथ शिंदे यांचा आग्रह नडल्याचे महाराष्ट्राचा निकाल सांगतोय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झोळीत मतदारांनी भरभरून दान टाकले आहे.

भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी सरकार स्थापन करण्यापुरता आकडा भाजपाकडे दिसतो. शरद पवार यांनी नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना फोन करून गुळ लावण्याचा प्रय़त्न केलेला असला तरी तूर्तास या दोघांनी भाजपाच्या सोबत जाण्याचे संकेत दिलेले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी उद्या रालोआची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही नवे मित्र सामील होतील याची काळजी अमित शहा यांना घ्यावी लागणार आहे. कारण नीतीश आणि चंद्राबाबू हे दोन्ही नेते आज भाजपासोबत असले तरी उद्या कोणती भूमिका घेतील हे सांगता येत नाही.

हे ही वाचा:

नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले

नीतिश कुमार एनडीएसोबतच राहणार

हा निकाल परिवर्तनाला पोषक

लैंगिक शोषणाचे आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे कल्याण राखले असले तर मुंबईत ठाकरे यांची ताकद त्यांच्या तुलनेत जास्त आहे हे लोकसभा निवडणुकीने स्पष्ट केले आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. विजयानंतर, पिछेहाट झाल्यानंतर आणि पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची भाजपाची परंपरा आहे, त्यामुळे कुठे चूक झाली याचा विचार नक्की होईल. उपऱ्यांना दिलेली घाऊक एण्ट्री, निष्ठावंतांना बाजूला ठेवून त्यांना दिलेले मानाचे पान, कार्यकर्त्यांकडे होणार दुर्लक्ष, सत्तेसाठी महाराष्ट्रात करण्यात आलेल्या तडजोडी, यापैकी नेमकं काय चुकलं याचा शोध भाजपाला घ्यावा लागेल.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना या निवडणुकीमुळे मिळालेली उभारी आगामी निवडणुकीत महायुतीला नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे. लोकसभेनंतर विधानसभा की महापालिका हा क्रम ठरलेला नाही. बहुधा महापालिका विधानसभेनंतरच होतील, अशी शक्यता आहे. भाजपाला विधानसभेतील विजयासाठी आता जास्त घाम गाळावा लागणार हे नक्की.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा