34 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरसंपादकीयदेवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…

देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…

मिलिंद देवरा यांच्याकडे काँग्रेसच्या गुपितांचा खजिना आहे

Google News Follow

Related

अनेक दशकं ज्यांनी काँग्रेसची तिजोरी भरण्याचे काम केले असे दिग्गज काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसला दोन-तीन दिवस आधी याची कुणकुण होती. देवरा फक्त दहा वर्षे काँग्रेसची खासदारकी आणि दोन वर्षे मंत्री पदाची उब घेतलेला नेता नाही. त्यांच्याकडे काँग्रेसच्या गुपितांचा खजिना आहे. हा तो वारसा आहे, जो मिलिंदना त्यांच्या पित्याकडून मिळालेला आहे.

 

दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला. मुरली देवरा यांचा हा मतदार संघ. नामांकीत उद्योगपती, हिरे व्यापारी, लक्ष्मीपुत्रांची झळाळी जेवढी दक्षिण मुंबईत आहे तेवढी अवघ्या भारतात कुठेच नाही. दक्षिण मुंबईच्या या बालेकिल्ल्याला सर्वात आधी सुरूंग लावला भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी. जयवंतीबेन यांचा पराभव करून मिलिंद देवरा २००४ मध्ये जिंकून आले. २००९ मध्ये पुन्हा विजयी झाले. २०१४ मध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी देवरांना पराभूत केले. कारण उघड होते. नरेंद्र मोदींची देशभरात लाट होती. या लाटेत काँग्रेसचे कैक बालेकिल्ले भुईसपाट झाले. ही लाट २०१९ मध्ये अधिक उंच उसळली. पुन्हा देवरा पडले.

दक्षिण मुंबई मतदार संघाची २०१९ ची निवडणूक लक्षात राहण्याचे एक विशेष कारण होते. रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी निवडणुकीची रणधुमाळीत उतरले. काँग्रेस नेते राहुल गांधी याच निवडणुकीती सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदाणी-अंबानी की सरकार असा घणाघात करत असताना अंबानी काँग्रेसचा प्रचार करीत आहे.
तेव्हा मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा प्रचार करत होते. अंबानी यांनी एक व्हीडीयो जारी केला होता. त्यामध्ये अंबानी म्हणतात Milind is a man of south Mumbai. Milind has in-depth knowledge of social, economic and cultural ecosystem of south Mumbai.

देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीने एका काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरण्याच्या या कृतीमुळे सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या. राजकीय पंडितांना, उद्योग जगातील धुरीणांनाही प्रश्न पडला. मुकेश अंबानी ज्यांच्या प्रचारात उतरले, ज्यांना उदय कोटक यांनी जाहीर पाठींबा दिला, त्यांना प्रचारासाठी कसलीही कमतरता पडली नसणार ही बाब उघड आहे. परंतु अरविंद सावतं यांच्याकडे मोदी की गॅरेण्टी असल्यामुळे देवरा पुन्हा एकदा २०१९ मध्ये पडले.

हे ही वाचा:

दिव्या पाहुजाच्या डोक्यात गोळी घातल्याचे निष्पन्न!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही झाला डिपफेकचा शिकार!

मुंबई- काळाचौकी परिसरातील पालिकेच्या शाळेत सिलेंडर्सचा स्फोट!

शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक!

२०१४ आणि २०१९ च्या तुलनेत काँग्रेस अधिक गाळात गेली आहे, ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळे देवरा भाजपामध्ये प्रवेश करतील ही चर्चा सुरू होतीच. राहुल गांधी यांच्यासोबत देवरा यांचे संबंध पूर्वी सारखे राहिले नव्हते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. देवरा त्यानंतर फार सक्रीय नव्हते. अलिकडे पैशाचा ओघ आटल्यामुळे मिलिंद देवरा यांच्या गळ्यात पक्षाने सह-कोषाध्यक्ष पद मारले होते. देवरांनी त्यांचे पिताश्री मुरली देवरा यांच्या प्रमाणे पक्षाला थैल्यांचा नैवेद्य द्यावा यासाठी ही मेहेरबानी करण्यात आली होती.

 

मविआच्या जागा वाटपात उबाठा गट दक्षिण मुंबई सोडणार नाही हे देवरांच्या लक्षात आले होते. त्यांनी काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी फोनवर याबाबत बोलणे केले होते. दक्षिण मुंबईबाबत मला राहुल गांधी यांच्याशी बोलायचे आहे, तुम्हीही माझी चिंता त्यांच्या कानावर घाला असे देवरा यांनी रमेश यांना सांगितले. तू पक्ष सोडण्याच्या विचारात आहेस का? असा थेट सवाल रमेश यांनी देवरा यांना केला. हा संवाद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या फक्त दोन दिवस आधीचा.

 

 

मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर जयराम रमेश यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. माझ्याशी झालेली चर्चा हा निव्वळ फार्स होता. पक्ष सोडण्याचा निर्णय देवरांनी आधीच घेतला होता, असे रमेश यांचे म्हणणे आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही, असेही रमेश म्हणाले आहे. हे बाब मात्र खरी काँग्रेस पक्षाची इतकी वाताहात झाली आहे, की कोणाच्या असण्याने आणि नसण्याने पक्षाचे काही भले होण्याची शक्यता नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देण्याऱ्या काँग्रेसचे येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार याची देवरांना कल्पना आहे. मोदींच्या प्रभावासमोर अंबानी यांचा प्रभाव सुद्धा टिकत नाही, याचा अनुभव देवरांनी २०१९ मध्ये घेतला आहे.

दक्षिण मुंबई मतदार संघ असाही काँग्रेसने उबाठा गटाच्या झोळीत टाकला होता. त्यामुळे दक्षिण मुंबई गमावली हा काही काँग्रेससाठी मुद्दा नव्हता. परंतु पक्षातले बिभीषण बाहेर जाताना फक्त एकटे जात नाहीत, बरीच गुपित सोबत घेऊन जातात. बिभिषणांनी उघड केलेल्या गुपितांमुळे रावणाचा वध शक्य होतो. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंची बरीच गुपितं आहेत. तशी देवरांकडे काँग्रेसची गुपितं आहेत. त्यातला बराच मसाला मुरली देवरा यांच्याकडून मिलिंद यांना वारसा म्हणून मिळालेला आहे. देवरा यांचे शिवसेनेत जाणे भाजपाने जुळवून आणलेले आहे. या घडामोडी दिल्लीतच शिजल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले देवरा गांधी-वाड्रा परिवारासाठी जिवंत बॉम्ब ठरण्याची शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा