देशात सत्ता राबवताना नेहरु घराण्याने शंभर पापे केली असतील, सोनिया गांधी देशाच्या नागरीक बनण्यापूर्वी मतदार झाल्या असतील. राहुल गांधी यांच्या मनात हिंदूंबाबत प्रचंड विखार असेल तरीही समस्त भारतीयांनी राहुल गांधी यांचे आभार मानायला हवे. त्यांनी जर मतदार यादीतील त्रुटींवरून निवडणूक आयोगावर शरसंधान केले नसते, तर कदाचित देशात स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हीजन सुरू झाले नसते. मतदार यांच्यांची इतकी साफ सफाई झाली नसती. प.बंगालमधील ७० लाख नावांवर फुली पडण्याची शक्यता असताना उत्तर प्रदेशात मतदार याद्यांमध्ये तीन कोटी नावे कमी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांना एवढेच सांगायचे आहे, इब्तिदा ए इश्क मे रोता है क्या, आगे आगे देखिये होता है क्या…
कुऱ्हाड पायावर मारून घेण्याचा अनेकांना छंद असतो. राहुल गांधी यांनी तर मह्त्प्रयासाने हा छंद जोपासला आहे. आजवर काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ९५ निवडणुकांमध्ये पराभूत झालेला आहे. हे कर्तृत्व आपलेच हे सांगण्या इतपत धाडस त्यांच्यात असण्याचे काही कारणच नाही. कारण ते जवाहरलाल नेहरुंचे वंशज आहेत. कोणावर तरी खापर फोडणे त्यांना भाग होते. आधी ते इव्हीएमवर घसरले, सध्या ते एसआयआरचा मुद्दा घेऊन कंठशोष करतायत. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन हा निवडणूक आयोगाला घटनेने बहाल केलेला अधिकार आहे. ठराविक काळानंतर हा उपक्रम हाती घेतला जातो. मतदार याद्यांची साफसफाई केली जाते. मोदी सरकार सत्तेवर येण्याच्या १२ वर्ष आधी देशात एसआयआर झाली होती. मोदी सत्तेवर आल्याच्या एक दशकानंतर निवडणूक आयोगाला देशात एसआयआर घेण्याची उपरती झाली, त्याचे एकमेव नसले तरी एक महत्वाचे कारण राहुल गांधी आहेत. त्यांनी निवडणूक घोटाळा म्हणून जे निवडणूक आय़ोगावर जे काही आरोप केले, पत्रकार परिषदा घेऊन जे काही ढोल बडवले, त्याचा संबंध फक्त मतदार याद्यांतील त्रुटींशी होता. निवडणूक आय़ोगाला राहुल गांधी यांनी फूलटॉस दिला. त्यांनी एसआयआर घेऊन सिक्सर मारला. राहुल गांधी यांच्या या कर्माचे परिणाम आज, अवघा विरोधी पक्ष भोगताना दिसतो आहे. राहुल गांधींमुळे त्यांचा हक्काचा मतदार मतदार यादीतून साफ होण्याची शक्यता आहे. त्याचा पहीला फटका ममता बॅनर्जी यांना बसताना दिसतो आहे. पश्चिम बंगालमधून ७० लाख नावे मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता आहे. यापेक्षा जास्त होती, परंतु कमी होण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेशातून २.९३ कोटी नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधीच्या परदेश दौर्यावर काय म्हणाले कुशवाह ?
भावाने दोन निष्पाप मुलांचा घेतला जीव
ही नावे कोणती असतात हे लक्षात घ्या, मतदार यादीतील मृत व्यक्ती, अशा व्यक्ति ज्यांनी नावे दोन ठिकाणी आहेत. अशा व्यक्ति जे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. चौथी श्रेणी संशयास्पद घुसखोरांची आहे, जे लोक चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड तयार करून किंवा दुसऱ्याची नावे वापरून मतदार यादीत घुसलेली आहेत.
तुम्ही म्हणाल की, यापैकी पहील्या तीन वर्गातील मतदार तर कोणालाच मतदान करीत नाहीत, त्यांचा फायदा कसा होऊ शकेल ? उत्तर स्पष्ट आहे. हीच नावे वापरून घुसखोर बांगलादेशी, रोहिंगे मतदार याद्यांमध्ये नावे घुसवत असतात. पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुरू असताना २२०२ बूथ असे आढळले जिथे २००२ पासून एकही मतदार मृत नाही, किंवा ज्यांचे स्थलांतर झाले नाही. सगळी यादी जशीच्या तशी. हा प्रकार उघडपणे संशयास्पद होता. या याद्यांची पुन्हा चौकशी झाल्यानंतर गौडबंगाल उघड झाले. मृत मतदार आणि स्थलांतरीत झालेले मतदार हाच बांगलादेशी घुसखोरांचा मतदार यादीत शिरण्याचा राजमार्ग बनला आहे. एखादा प्रकाश अधिकारी कैलासवासी झाला की त्याच्या नावाने एखादा मोहमद शरीफ त्याचे नाव धारण करून मतदार यादीत जागा बनवतो.
उत्तर प्रदेशात १५ कोटी ४४ लाख, ३०९२ मतदार आहेत. त्यापैकी १८ ते २० टक्के नावे कापली जाण्याची शक्यता आहे. यात अर्थातच स्थलांतरितांचे प्रमाण मोठे असणार.
बिहारपासून एसआयआर सुरू झाली. तिथे ६८ लाख नावे कापली गेली. प.बंगालमध्ये हा आकडा ७० लाखाच्या जवळपास आहे, यूपीचा अंतिम आकडा आलेला नाही, परंतु तो मोठा असेल यात कोणालाही संशय नाही. याचा काही प्रमाणात फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. कारण ज्यांचे नाव मुंबई, दिल्लीतील मतदार यादीत नोंदवले आहे आणि गावीही आहे. अशा मतदारांचे नाव कापले जाणार. त्यातले अनेकजण असे आहेत की, ज्यांच्या गावी मोठ्या मालमत्ता आहेत. त्यांना मूळ ठिकाणच्या मतदार यादीतून आपले नाव कापले जाणे नको आहे. अशा मतदारांनी कुटुंबातील एका व्यक्तिचे नाव मतदार यादीत ठेवावे असा पर्याय भाजपाच्या नेत्यांनी सुचवला आहे.
मतदार यादीच्या साफसफाईत बांगलादेशी-रोहिंग्या मतदारांचा सफाया होणार हे मात्र निश्चित. प.बंगालमध्ये तृणमूल, तामिळनाडूत द्रमुकचे, उत्तर प्रदेशात सपाचे मतदार कमी होणार. ही मते म्हणजे देशाच्या खांद्यावर असलेला अनावश्यक भार. उत्तर प्रदेश सरकारने या घुसखोरांसाठी मोठ्या संख्येने डिटेंशन सेंटर उभारण्याचे काम सुरू केलेले आहे. सरकारी मालकीच्या इमारतींमध्ये अशा प्रकारची डिटेंशन सेंटर बनवण्यात येत आहेत. महत्वाच्या नगर पालिकांमध्ये, शहरांमध्ये घुसखोरांना शोधून त्यांची धरपकड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात डिटेंशन सेंटर उभारण्यात येणार आहे. ही वातावरण निर्मितीच अनेकदा पुरेशी ठरते. भारत बांगलादेश सीमेवर जी घुसखोरांची गर्दी झालेली आहे ती स्पष्टपणे सांगते आहे की, या देशात डर का माहोल निर्माण झालेला आहे. परंतु तो फक्त घुसखोरांसाठी. ममता बॅनर्जींनी पुरवलेले आधारकार्ड, पॅनकार्ड हातात असले तरी ते सुरक्षित नाहीत. कारण त्यांना ठाऊक आहे की, ते भारतीय नाहीत.
निवडणूक आयोग भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक जबाबदारी पार पाडतो आहे. देशाच्या राजकारणाचे एक प्रकारे शुद्धीकरण सुरू आहे. भारतीय मतदारांच्या हक्काची चोरी थांबवली जाते आहे. विदेशी मतदाराला आणून भारतीय मतांचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जातो आहे. एसआयआर म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन नाही. ही पुढची प्रक्रिया ज्या माध्यमातून देशातील घुसखोरांच्या विरोधात व्यापक कारवाई होणार. परंतु एसआयआरमुळे ही प्रक्रीया अधिक सुगम होणार आहे.
भारताच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. जर प.बंगालमध्ये एसआयआर झाली नसती तर कदाचित ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्या असत्या. कारण बोगस मतदारांची प.बंगालच्या मतदार यादीत झालेली घुसखोरी ही ममतांच्या कृपेमुळे झालेली आहे. निवडणुकीच्या काळात या मेहरबानीची परतफेड करण्याची संधी घुसखोरांना मिळते. आधारकार्ड, पॅनकार्ड बहाल कऱणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या पदरात मतांच्या राशी ओतल्या जात. हे मतदार भाजपाला कधीही मतदान करणार नाहीत. कारण भाजपाचा घुसखोरीला विरोध आहे. ही मंडळी ममतांची लाभार्थी होती. हे घुसखोर फक्त मतदार यादीत घुसखोरी करत नव्हते. फुकट रेशन, विधवा पेंशन, निराधार योजनेची रक्कम, सगळे काही ओरपत होते. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊन मोफत उपचार घेत होते.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे किती बांगलादेशी आहेत, हे येत्या काळात त्यामुळेच उघड होणार आहे. राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये यामुळे वाचणार आहेत. हे घडते आहे, केवळ राहुल गांधी यांच्यामुळे. याचा पहिला झटका बसला तेजस्वी यादव यांना, दुसरा झटका २०२६ मध्ये ममता बॅनर्जी यांना बसण्याची शक्यता आहे. तिसरा झटका अखिलेश यादव यांना २०२७ मध्ये बसणार आहे. राहुल गांधी यांनी इंडी आघाडीच्या मतपेढीचे दहन केले. त्यांचा हक्काचा मतदार हिरावून घेतला. बांगलादेशी मतांची भर घालून मुस्लीम मतपेढी मजबूत करण्याचा, हिंदू मतदारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न उधळला जातो आहे. याचे खूप मोठे श्रेय राहुल गांधी यांनाच आहे. सगळ्यांची लंका लावून राहुल गांधी विदेशात पर्यटनाला रवाना होत आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







