29 C
Mumbai
Friday, April 17, 2026
घरसंपादकीय'देवाचे नवे बाप' ट्रम्प यांचा पोप यांच्या झग्याला हात

‘देवाचे नवे बाप’ ट्रम्प यांचा पोप यांच्या झग्याला हात

Google News Follow

Related

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे ‘देवाचा बाप कसा असतो’ हे पाहण्याचे भाग्य महाराष्ट्राच्या वाट्याला आले. संकष्टीला मटण खाणारी त्यांची कन्या आणि मटण खाऊन देवळात जाणारे पवार म्हणजे पुरोगाम्यांचे दैवत; त्यांना पाहण्याचे भाग्य महाराष्ट्राला लाभले. ते अमेरिकी जनांना लाभण्याचे काहीच कारण नव्हते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पवारांच्या भूमिकेत शिरण्याचे मनावर घेतले आहे. इराण युद्धावरून सल्ला देणाऱ्या व्हॅटिकनच्या पोप यांना त्यांनी सुनावले आहे. “मी व्हाईट हाऊसमध्ये बसलो आहे, म्हणून तू व्हॅटिकनमध्ये बसू शकलास,” या शब्दांत त्यांनी पोप यांची लायकी काढली आहे. तिखट इटालियन मिरची जॉर्जिया मेलोनी यांनी या मुद्द्यावरून ट्रम्प यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

“कभी कभी तो लगता है साला अपूनीच भगवान है…” हा समज जगातील अनेक नेत्यांचा आहे. साधा खासदार, आमदार सोडा, अगदी नगरसेवकांनाही ही भ्रमबाधा झालेली असते. सगळे जग आपल्यामुळेच चालते, हा भ्रम ही मंडळी आयुष्यभर कवटाळून असतात. फरक एवढाच की, पवारांनी तो जाहीरपणे बोलून दाखवला. आपण देवाचे बाप असल्याचे जाहीर केले. त्यांच्या पुरोगामी पिलावळीने टाळ्या पिटल्या. कधीकाळी साडेतीन जिल्ह्यांमध्ये दबदबा असलेले पवार सध्या काही तालुक्यांपुरते मर्यादित झाले असले, तरी त्यांची महती ट्रम्प यांच्या कानापर्यंत गेली असण्याची दाट शक्यता आहे; कारण ट्रम्प पवारांचे अनुकरण करत ‘देवाचे बाप’ बनले आहेत. दैवी वेशभूषेतील स्वतःचा फोटो त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर अपलोड केला आणि व्हॅटिकनचे पोप लिओ यांची बिनपाण्याने हजामत केली.

टॅरिफच्या मुद्द्यावरून ट्रम्प आधी सगळ्या जगाशी भिडले. ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपातील नाटो देशांशी त्यांनी पंगा घेतला. युक्रेनला मदत करून ते रशियाशी भिडत आहेतच. चीनशी कधी छुपा तर कधी उघड संघर्ष सुरूच असतो. आता तर त्यांनी कॅथोलिक ख्रिस्ती जगाचे अनभिषिक्त सम्राट, शक्तिशाली व्हॅटिकन चर्चचे पोप लिओ १४ वे यांच्याशी उघड तंटा सुरू केला आहे. व्हॅटिकनला स्वतंत्र देशाचा आणि पोप यांना राष्ट्रप्रमुखाचा दर्जा आहे. अमेरिका आणि व्हॅटिकनचे संबंध घट्ट आहेत. चर्चच्या माध्यमातून व्हॅटिकनने सगळ्या जगात उत्पात निर्माण केला आहे. धर्मांतर हा व्हॅटिकनचा मूळ उद्योग. ड्रग्जचा व्यवसाय, लहान मुलांचे लैंगिक शोषण, पोर्नोग्राफी अशा अनेक आरोपांमुळे व्हॅटिकन चर्च गेली अनेक दशके चर्चेत आहे. परंतु ट्रम्प यांनी या मुद्द्यावरून पोप यांना हाणलेले नाही. खरे तर व्हॅटिकन आणि सीआयए हे एक घट्ट समीकरण आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि व्हॅटिकनचे पोप असा संघर्ष यापूर्वी झालेला नाही. ट्रम्प यांच्या काळात आजवर जे घडले नाही, अशा बऱ्याच गोष्टी घडतायत हा भाग वेगळा. ट्रम्प चेकाळल्यासारखे पोप यांना हाणत असले, तरी पोप महाशय यांच्या मुखात अजूनही शांततेची भाषा आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

माझगाव डॉककडून कोलंबो डॉकयार्ड ताब्यात

भारताकडून अफगाणिस्तानला १३ टन बीसीजी लसींची मदत

राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंचे होणार कौतुक; शनिवारी सत्कार सोहळा

पोप हे जगभरातील ख्रिस्ती समुदायासाठी आदरणीय व्यक्तिमत्व असताना ट्रम्प यांनी थेट त्यांच्या झग्याला हात घातल्यामुळे कॅथोलिक संतप्त झालेले आहेत. जानेवारी महिन्यापासून हा तंटा सुरू झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढू लागल्यानंतर पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर पोप लिओ १४ वे यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांनी युद्ध टाळण्याचे आणि संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले. पोप यांची ही भूमिका नवी नाही, त्यात सातत्य आहे. जानेवारीत पोप यांनी हे विधान केल्यानंतर ट्रम्प त्यावर काहीच बोलले नव्हते. त्यांचा पारा तेव्हापासून वाढू लागला असेल असे मानायला वाव आहे.

मार्च महिन्यात पोप यांनी पुन्हा एकदा इराणविरोधी लष्करी कारवाईवर टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “युद्ध हा कधीच उपाय नसतो.” यावरून अमेरिकेच्या धोरणावर अप्रत्यक्ष टीका झाली. ट्रम्प यांचा पुन्हा भडका उडाला असणार. तरीही ते व्यक्त झाले नाहीत.

ट्रम्प यांची एक मोठी समस्या आहे; त्यांना सुरात सूर मिसळणारे चाटुकार लागतात. विरोध त्यांना सहन होत नाही. कोणी टीका केली तर ट्रम्प यांचा तीळपापड होतो. मग समोर विरोध करणारा कोण आहे, यामुळे त्यांना फरक पडत नाही. पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या फाटक्यात पाय घातला. इराण प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून देशांतर्गत विरोध वाढत असताना पोप यांची टीका म्हणजे उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरली. एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी दाबून ठेवलेल्या रागाचा भडका उडाला.

१२ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी पोप यांच्यावर थेट हल्ला चढवला. “पोप यांना गुन्हेगारीबाबत काहीच कळत नाही, परराष्ट्र धोरणाचा तर त्यांना गंधवारा नाही,” या शब्दांत त्यांनी फटकारले. एवढे बोलून बहुधा ट्रम्प यांचे मन भरले नसावे. पुढे त्यांनी असे विधान केले की मर्यादेचा कडेलोट झाला. पोप यांच्या आदराच्या साफ चिंधड्या उडाल्या. बहुधा त्यांचा मेंदूही भिरभिरला असणार. “मी व्हाईट हाऊसमध्ये बसलो आहे, म्हणून तुम्ही व्हॅटिकनमध्ये बसू शकलात,” या शब्दांत ट्रम्प यांनी पोप यांची टोपी उडवली. या वक्तव्याने धार्मिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

‘ट्रुथ सोशल’वर त्यांनी एक पोस्ट टाकली. एक फोटो अपलोड केला, त्यात त्यांनी स्वतःला दैवी स्वरूपात दाखवले. लिओनार्दो दा विंची, मायकल एंजेलो, अल ग्रेको या दिग्गज चित्रकारांच्या शैलीतले हे ख्रिस्तकालीन वाटावे असे चित्र होते. या पोस्टमुळे ख्रिश्चन समुदायामध्ये खळबळ उडाली. ट्रम्प यांच्यावर अहंकारीपणाचा ठपका ठेवत लोकांनी भडिमार केला. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवला.

युरोपसह जगभरातील अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर टीका केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांचे वक्तव्य “अस्वीकार्य” असल्याचे सांगितले आणि पोप यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. मेलोनी या ट्रम्प यांच्या फार वाकड्यात जात नाहीत; अनेकदा त्यांनी ट्रम्प यांचे समर्थनच केले आहे. परंतु या प्रकरणात त्याही ट्रम्प यांच्यावर उखडल्या आहेत.

ट्रम्प यांचे एक बरे आहे, एकदा त्यांनी काही भूमिका घेतली की ती चूक की बरोबर हे तपासण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. किंबहुना आपण जे करतो तेच योग्य असते, अशी त्यांची भूमिका असते. पोप प्रकरणात त्यांच्यावर टिकेची राळ उठली, तरीही ते बधले नाहीत. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, पोप यांचे चुकलेच आहे, असा पुन्हा त्यांनी षटकार मारला. पोप यांचा कट्टरवाद्यांकडून वापर केला जात असल्याची नवी टीका त्यांनी केली. ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्ट मात्र त्यांनी हटवली. “मी या पोस्टमध्ये स्वतःला उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या वेशभूषेत दाखवले होते, त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला” अशी मखलाशी करायला ते विसरले नाहीत. लिओ हे अमेरिकी आहेत, परंतु त्यांनी इराण प्रकरणात घेतलेली भूमिका चुकीची आहे. “ते सतत इराण प्रकरणी माझ्या भूमिकेवर टीका करत असतात, परंतु मला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रसज्ज इराण नको आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

एका बाजूला ट्रम्प लिओ यांच्यावर आगपाखड करत असताना, पोप लिओ यांनी पोप स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली. “मला भीती नाही, आम्ही राजकारणी नाही. चर्चचे काम म्हणजे शांतीचा संदेश देणे आहे.”

त्यांनी वाद वाढवण्याऐजी नैतिक भूमिका कायम ठेवली. कोणीच माघार घेत नसल्यामुळे वाद अजून संपलेला नाही. ख्रिस्ती जगतात अस्वस्थता आहे. राजकारणात खळबळ आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये मतभेद उघड झाले आहेत. इराण युद्ध सुरू असताना ट्रम्प यांनी नवी आघाडी उघडली आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा