26 C
Mumbai
Tuesday, December 10, 2024
घरसंपादकीयती आली आहे, तोही परत येतोय....

ती आली आहे, तोही परत येतोय….

ज्यांना हटवण्यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले ते परत येतायत.

Google News Follow

Related

महाराष्ट्रात गेली पाच वर्षे विरोधी पक्षांचे राजकारण पूर्णपणे देवेंद्र फडणवीस केंद्रित राहिले. काहीही होऊ दे हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नको यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत? शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, इतकंच काय मनोज जरांगे यांच्यासारखे मोहरेही फडणवीसांच्या नावाने खडे फोडत होते. महाराष्ट्राच्या जनतेने असा काही अदभूत जनादेश दिला की ते परत येणार ही आता पुरेसे स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला यांचे तर आधीच पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही कमबॅक विरोधकांची झोप उडवणारे आहेत. मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत उद्धव ठाकरेंचे एक विधान गाजले. एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन. जनतेने या निवडणुकीत कौल दिला. उद्धवजी तुम्ही घरीच बसा, देवेंद्र फडणवीसच राहतील. मविआच्या नेत्यांचे सगळे बाण देवेंद्र फडणवीस यांच्यावर चालत होते. एके काळी हे चित्र महाराष्ट्राने शरद पवार यांच्याबाबत पाहिले आहे. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते म्हणून ते तमाम विरोधकांच्या रडारवर आले असे कोणी म्हणू शकेल. त्यात फारसे तथ्य नाही. अडीच वर्ष महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. परंतु त्यांना मुख्यमंत्रीपद मिळत नाही, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठीही बॅटींग केली. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा करीष्मा मान्य करावा लागेल, या शब्दात सुळे यांनी शिंदेंचे कौतुक केलेले आहे. हे विधान म्हणजे शिंदेंना गुळ लावण्याचा प्रकार आहे.

थोडक्यात देवेंद्र फडणवीस नको बाकी कोणीही चालेल असा विरोधकांचा सूर राहिला. मनोज जरांगे यांचे संपूर्ण आंदोलन आपण जर पाहिले तर लक्षात येईल की मराठा आरक्षण फक्त निमित्त होते. फडणवीसांना झोडण्यासाठीच ते राबत
होते. त्यांना गाडण्याची आणि संपवण्याची भाषा करत होते. लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड रोखण्यात महायुती सरकारला यश आले. राज्यात महायुतीचे सरकार येईल असे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सुद्धा फडणवीस मुख्यमंत्री पदी येतील असे कोणी छातीठोकपणे सांगत नव्हते. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील. फडणवीसांची वर्णी भाजपाच्या अध्यक्षपदी लागेल अशी जोरदार चर्चा होती. ते महाराष्ट्रातून जाणार हे जवळजवळ निश्चित झाले होते.

हे ही वाचा:

वाँटेड माओवादी कमांडर छोटू खरवार झारखंडमध्ये चकमकीत ठार!

देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा, शिंदेंनी दिला पाठींबा

संभल हिंसाचार; आरोपींचे पोस्टर लावा, बक्षीस जाहीर करा, नुकसान भरपाई वसूल करा! 

मविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!

‘देंवेद्र फडणवीसांच्या दळभद्री घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ आलेला आहे’, असा दावा संजय राऊत करतात त्यामागे फडणवीस जाणार हा आत्मविश्वास होताच. ठाकरेंचे ‘मी राहीन किंवा तुम्ही राहाल’ हे विधान त्याच पठडीतले. महाराष्ट्रात फडणवीस हटाओ अशी जी अघोषित मोहीम सुरू होती त्याची कारणे अनेक आहेत. फडणवीसांच्या हाती सूत्र आल्यापासून भाजपाची कायम चढती कमान राहिली. ते शरद पवारांच्या राजकारणाला पुरून उरले. सत्ता हातून निसटल्यानंतरही त्यांनी आत्मविश्वास गमावला नाही. सत्ता हाती असून शरद पवार आणि ठाकरेंना सत्तेचे सुख त्यांनी लाभू दिले नाही. अडीच वर्षे त्यांना सळो की पळो करून सोडले. १०५ आमदारांना घरी बसवले म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्यांचे पाय लटपटायला लागतील असे काम विरोधी पक्ष नेता म्हणून फडणवीसांनी केले. या काळात त्यांचे एक वेगळे आक्रमक रुप महाराष्ट्राने पाहिले. सत्तेत असलेल्या मविआच्या नेत्यांची, मंत्र्यांची रवानगी तुरुंगात झाली.

‘एण्टालिया प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी मनसुख हिरणच्या जीवाला धोका आहे’, असे असे फडणवीस विधानसभेमध्ये सांगतात काय आणि काही तासात त्याच व्यक्तिचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत मिळतो काय… ही गोष्ट स्पष्ट सांगून गेली की विरोधात असले तरी फडणवीसांचे प्रशासनात, पोलिसांमध्ये मजबूत सोर्स आहेत. तेच सोर्स वापरून त्यांनी परिवहन मंत्रालयातील बदली घोटाळ्याची पोलखोल केली. गिरीश महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचा गेम करण्याचा कट शिजत होता. तो शिजण्याआधीच फडणवीसांनी चव्हाट्यावर आणला. हा कट सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्या कार्यालयात शिजला. तिथे झालेल्या चर्चेच्या साग्रसंगीत वृत्तांताचे रेकॉर्डीग त्यांच्याकडे कसे आले हे कोडे सवाल आजही अनेकांना सुटत नाही.

अशा अनेक प्रकरणात आयपीएस रश्मी शुक्ला यांनी त्यांना मदत झाल्याचे आरोप झाले. मविआच्या सरकारला ग्रहण लावण्यात त्यांची भूमिकाही आहे, असा मविआच्या नेत्यांचा वहीम होता. मविआचे सरकार आल्यानंतर शुक्ला यांच्याकडे सत्ताधाऱ्यांची वक्रदृष्टी वळली. त्या शुक्ला बाई दोन दिवसांपूर्नी पुन्हा एकदा महासंचालकपदी विराजमान झाल्या. फडणवीस यांच्या परतीचे कोणतेच संकेत नसताना एकच माणूस आत्मविश्वासाने सांगत होता की, निवडणुकांनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. भाजपाच्या नेत्यांनाही याबाबत खात्री वाटत नव्हती. राज ठाकरे यांना स्वप्नात दृष्टांत झाला की आणखी काय हे ईश्वरालाच ठाऊकपण त्यांचे बोल सत्य होणार आहेत. ज्यांना हटवण्यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले ते परत येतायत. ढोल ताशांच्या गजरात अगदी वाजत गाजत त्यांची एण्ट्री झालेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
211,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा