26 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरसंपादकीयनेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?

नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?

मनसुखच्या असहाय पत्नीने फोडलेला हंबरडा, बहुधा ईश्वराने ऐकला असावा

Google News Follow

Related

मनसुख हिरणच्या प्रकरणात आरोपी असलेला एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याला मुंबई उच्च न्यायालयाने २००६ च्या लखन भैया एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेप सुनावली. एका अत्यंत बुद्धीमान आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या करीअरची माती झाली. परंतु ही माती करून घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून शर्मा स्वत:च होता. लखन भैय्या प्रकरणात शर्माला जन्मठेप झाली असली तरी हे मनसुख हिरणच्या पत्नीचे शाप असावेत. असहाय बायकांची हाय घेऊ नये असे म्हणतात ते उगीचच नाही. प्रदीप शर्मा नावाच्या ताऱ्याचा उदय आणि अस्त ही एक सुरस कथा आहे.

मुंबईत गँगवॉर टिपेला होते तेव्हाचा हा काळ. प्रदीप शर्मा हा १९८३ च्या बॅचचा पीएसआय. विजय साळसकर त्यांचा बॅचमेट. दोघांची ओळख आणि मैत्री इथूनच सुरू झाली. त्यांच्या मैत्रीत बिब्बा पडण्याची कथा कोल्डवॉरही नंतरचे कथानक.
शर्माचे वडील रामेश्वर शर्मा हे प्रोफेसर होते. धुळ्यात त्याचा जन्म झालेला असला तरी मुळचा तो मथुरेचा. एमएससी फिजीक्स झालेल्या शर्माला दुसरे एखाद्या क्षेत्रात सहज संधी मिळाली असती. पण त्याला पोलिसांच्या खाकी वर्दीचे प्रचंड आकर्षण होते. त्यामुळेच त्याने पीएसआयची परीक्षा दिली. कारकीर्दीच्या सुरूवातीला माहीम पोलिस स्टेशनमध्ये रुजू झाला. पण नावा रुपाला आला तो १९९१ च्या एका एन्काऊंटरमुळे. त्यावेळी शर्मा घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभागात होता. रझ्झाक नावाच्या एका घरफोड्याला शर्माने ठोकले.

१९९२ मध्ये शर्मा आणि विजय साळसकर ही जोडगोळी क्राईम ब्रॅंचमध्ये दाखल झाली. याच दरम्यान शर्मा ओम प्रकाश सिंह याच्या संपर्कात आला. ओपी याचा भाऊ अरुण सिंह हा प्रोफेसर होता. माफीया दाऊदच्या टोळीने त्याची हत्या केली होती. ओपी छोटा राजनसाठी काम करायचा. तो शर्माचा खबरी बनला. १९९२ मध्ये दाऊदचे दोन मोठे गँगस्टर श्रीकांत नानू देसाई आणि सुभाष कुंचिकुर्वे उर्फ माकडवाला यांचा साळसकर-शर्मा जोडगोळीने एन्काऊंटर केला. त्याची प्रचंड चर्चा झाली. साळसकर-शर्मा यांच्यातील कोल्डवॉर इथूनच सुरू झाला. साळसकर हे क्राईम ब्रॅंचमध्ये प्रचंड चमक असलेले नाव. शर्माला साळसकरांची चमक आणि नाव दोन्हीचा मोह पडला होता. त्याला फक्त त्याचाच जय जयकार हवा होता. तो साळसकर यांच्याशी स्पर्धा करत होता.

हे ही वाचा:

हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण

आयपीएलचे सामने कुठे पहाल?

प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!

सिद्दीक कप्पननेच कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पीएफआय हिट पथकाला निर्देश दिले

१९९३ मध्ये साळसकर यांची क्राईम ब्रॅंचमधून बदली झाली. शर्मा नार्कोटीक कण्ट्रोल ब्युरोत गेला. तिथेही शर्माचा प्रचंड गवगवा झाला. त्याने चांगले काम केले. इथेही ओपी त्याच्यासोबत होता. २००० साली छोटा राजनवर झालेल्या हल्ल्यात ओपीचे नाव पुढे आले. दाऊदला ही टीप त्यानेच दिल्याची कुजबुज होती. पुढे या ओपीचा राजन टोळीने नाशिक जेलमध्ये गेम केला. २००६ मध्ये रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैया या वसईच्या गँगस्टरला अटक झाली. आणि त्याच दिवशी त्याचा वर्सोवामध्ये एन्काऊंटर झाला. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २१ पोलिसांसह १३ पोलिसांना जन्मठेप सुनावली. परंतु प्रदीप शर्माला मात्र निर्दोष ठरवले होते. राज्य सरकारने या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. न्या. रेवती ढेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने शर्माला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील राजीव चव्हाण यांनी हा खटला लढवला.

प्रदीप शर्मा याची कारकीर्द वादग्रस्त राहिली. अंडरवर्ल्डशी सोटेलोटे असल्याचा ठपका ठेवून त्याला ऑगस्ट २००८ मध्ये निलंबित करण्यात आले होते. मे २००९ मध्ये मॅटने त्याच्या बाजूने निकाल दिला. त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले.
२०१९ मध्ये त्याने पोलिस दलाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा येथून निवडणूक लढवली. इथून त्याचे ग्रह फिरले. नालासोपाऱ्यात तो पडला. मविआच्या काळात झालेल्या मनसुख हिरणच्या हत्येप्रकरणी शर्मा पुन्हा गोत्यात आला. हत्याप्रकरणातील एक आरोपी कॉन्स्टेबल संतोष शेलार याने मनसुखची हत्या झाल्यानंतर शर्माला फोन करून सांगितले की काम हो गया है. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया या इमारतीखाली स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आले. या प्रकरणातील इत्यंतभूत माहिती मनसुखला होती, म्हणून त्याची हत्या करण्यात आली होती. हा मोठा योगायोग आहे की या प्रकरणातील तीन आरोपींचा शिवसेनेशी थेट संबंध होता. एपीआय सचिन वाजे, इन्स्पेक्टर सुनील माने आणि शर्मा. राजकारणाचा सोस आणि राजकारणातील असंगांचा संग शर्माला भोवला.

शर्माने आयुष्यात ११२ एन्काऊंटर केली होती. त्यातले फक्त लखन भैय्याचे एन्काऊंटर त्याला शेकले. ज्या अधिकाऱ्याने बड्या बड्या गँगस्टरना धक्क्याला लावले त्याला एका गॅंगस्टरच्या भावाने बुडवले. महत्वाचे म्हणजे शर्माला निर्दोष ठरवण्याच्या याचिकेच्या विरोधात राज्य सरकारने २०१५ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांना आपल्या एन्काऊंटरचा आकडा वाढवण्याचा सोस होता, असे म्हणतात. याची दखल खुद्द न्यायालयानेही घेतली होती. अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात खटले दाखल झाले. त्यात काही एन्काऊंटर फेक असल्याचेही उघड झाले. लखनभैय्याच्या प्रकरणात प्रदीप शर्माला जन्मठेप झाली असली तरी मनसुख हिरणची हत्या ही उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरली. मनसुखच्या असहाय पत्नीने फोडलेला हंबरडा, बहुधा ईश्वराने ऐकला असावा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा