30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरसंपादकीयशिवशाहीर नावाचा इतिहास

शिवशाहीर नावाचा इतिहास

Google News Follow

Related

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज हयात असते तर त्यांचा शंभरावा वाढदिवस असता. गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. छत्रपती शिवराय हा एकमेव ध्यास घेतलेल्या जीवनाची सांगता झाली. त्यांचे जाणे महाराष्ट्राच्या तरुणाईलाही चटका लावून गेले.

जाणत्या वयापासून एकच नाद, एकच छंद, एकच ध्यास छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा कोणता विचार नाही, दुसरा कोणता उपक्रम नाही. संपूर्ण आयुष्य एकाच नावासाठी वाहिलेले. शिवराय या एकाच ईश्वराची भक्ती केली. आयुष्याचा बेल भंडारा त्यांच्यावरच उधळला. याच ध्यासातून ‘राजा शिव छत्रपती’ या ग्रंथाची निर्मिती झाली. खरे तर हे पुस्तक नाही शिवभारताचे आख्यान आहे. महाराष्ट्राचा सळसळता इतिहास आहे. याच इतिहासाने एक दिवस देशाच्या इतिहासाला कलाटणी दिली. देशावर आलेले हिरवे सावट संपवून टाकले.

या पुस्तकाने छत्रपती शिवरायांचे कार्य घरोघरी पोहोचवले. आजवर या पुस्तकाच्या १७ आवृत्या निघाल्या. पाच लाखांच्या घरांमध्ये हे पुस्तक पोहोचले. कित्येक पिढ्या या पुस्तकाने समृद्ध केल्या. कित्येक पिढ्यांना छत्रपती शिवरायांची ओळख करून दिली. छत्रपतींचे कार्य, हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची युद्धनीती, त्यांचे राजकारण याची भुरळ अनेक पिढ्यांना पडत राहिली त्याचे एकमेव कारण म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

तरुणपणी शिवरायांच्या गडकोटांवर भटकंती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर १२ हजारावर व्याख्याने दिली. या संपूर्ण उद्योगात सातत्य होते आणि नवनिर्मिताचा ध्यास होता. शिवरायांचे नाव पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत नव्या वाटा धुंडाळत राहीले.

राजा शिवछत्रपती या पुस्तका इतकेच यश ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनीफितीला मिळाले. यात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज आणि शिवशाहीरांचे निवेदन असे अदभूत मिश्रण होते. परंतु आजही शिवकल्याण राजा ऐकल्यानंतर शिवशाहीरांचा खणखणीत आवाज तुम्हाला हात धरून इतिहासाच्या प्रांतात घेऊन जातो. इतिहासांच्या पाऊलखुणांमध्ये हरवून टाकतो. शिवकल्याण राजाचे गारुड उणीपुरी ४८ वर्षे महाराष्ट्रावर कायम आहे.

एकच ध्यास घेऊन आयुष्य जगण्यासाठी एक झपाटलेपण लागते. वयाची साठी उलटल्यानंतरही शिवभारताने त्यांच्या आय़ुष्यात निर्माण केलेले झापटलेपण किंचितही कमी झाले नव्हते. किंबहुना ते वाढतच होते. १९८४ मध्ये त्यांनी जाणता राजा या महानाट्याची निर्मिती केली. १५० ते २५० कलाकार, रंगमंचावर अवतीर्ण होणारे हत्ती-घोडे असे याचे स्वरुप व्हायचे. हा प्रयोग नाट्यगृहात नाही तर भव्य मैदानात साकारतो. जाणता राजाने छत्रपतींचा इतिहास देश-विदेशात नेला. यातून येणाऱ्या नफ्यातून अनेक संस्थांना मदतीचा हात देण्यात आला.

छत्रपतींचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यासाठी हा माणूस आयुष्यभर राबला. प्रसिद्धी, पैसा, मानमरातब अशी कोणतीही अपेक्षा न बाळगता हा माणूस शिवध्यास घेऊन जगत राहीला. पु.ल.देशपांडे, न.र.फाटक, नरहर कुरुंदकर, सेतुमाधवराव पगडी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा अनेक दिग्गजांनी शिवशाहीरांचा सन्मान केला.

परंतु, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांनी शिवशाहीरांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली. महाराष्ट्रात ब्राह्मण विरुद्ध मराठा असा कृत्रिम संघर्ष निर्माण करून शिवशाहीरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवशाहीरांच्या मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर ही बदनामी मोहीम सुरू राहिली. ज्या जेम्स लेन याच्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडीया’ या पुस्तकाच्या निमित्ताने शिवशाहीरांवर किटाळ उडवण्याचा प्रयत्न झाला. अखेर जेम्स लेन याने ‘इंडीया टूडे’ या पाक्षिकाला दिलेल्या मुलाखतीत आपली कधी बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी भेट झाली नाही, चर्चाही झाली नाही असा खुलासा केला. या खुलाशा नंतर खरे तर या प्रकरणावर पडदा पडायला हवा होता. परंतु पवार आणि त्यांची ब्रिगेड तरीही शिवशाहीरांच्या विरोधात गरळ ओकत राहिली. कारण सत्य आणि असत्याशी त्यांचा संबंध नव्हता. त्यांना फक्त तेढ निर्माण करायची होती. लोकांची माथी भडकवायची होती.

हे ही वाचा:

“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

छत्रपतींचे जीवनकार्य सर्वदूर पोहोचवण्यात या लोकांचा वाटा किती? छत्रपतींचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी किती प्रयत्न केले? उलट ही अशी मंडळी आहेत ज्यांनी राजकीय लाभ उपटण्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक असलेल्या शिवरायांना सेक्युलर बनवण्याचे प्रयत्न केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम होते, त्यांनी मशीदी उभारल्या, कोणी तरी बाबा याकूब त्यांचा गुरु होता, अशी भेसळ करून इतिहास दूषित करण्याचा प्रयत्न केला. हे समर्थ रामदासांच्याबाबत लोकांचे मन कलूषित करण्याचा प्रयत्न केला. अलिकडेच शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांची बदनामी केली. परंतु पुरंदरे यांचा गौरव करणारे त्यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांनी पवारांना त्यांची जागा दाखवून दिली.

रा.स्व.संघाचे प्रचारक असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे राष्ट्रवादी विचारांनी भारलेले व्यक्तिमत्व. त्यामुळे सळसळता राष्ट्रवाद असलेल्या शिवचरीत्राने ते भारले गेले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. त्यांनी दादरा, नगर, हवेली मुक्तीच्या लढ्यात सहभाग घेतला.

शिवशाहीर आज हयात नाहीत, परंतु ते इतिहासाचा अविभाज्य भाग बनले आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करेल तेव्हा कुणाची इच्छा असो वा नसो शिवशाहीरांची आठवण करावीच लागेल. आयुष्य भर शिवभक्ती करुन शिवशाहीरांनी इतिहासात हे स्थान मिळवलेले आहे. त्यांच्या जयंतीदिनी शिवशाहीरांना मानाचा मुजरा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा