31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरसंपादकीयदहशतवादी नाचण कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन तगडे

दहशतवादी नाचण कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन तगडे

मुंबई लोकल मध्ये २००१ ते २००३ या काळात झालेल्या बॉम्बस्फोट कटासह अन्य प्रकरणात एकूण १४ वर्षांचा कारावास भोगलेल्या दहशतवादी साकीब नाचणचा मुलगा शमिलला एनआयएकडून अटक

Google News Follow

Related

मुंबई लोकल मध्ये २००१ ते २००३ या काळात झालेल्या बॉम्बस्फोट कटासह अन्य प्रकरणात एकूण १४ वर्षांचा कारावास भोगलेल्या साकीब नाचण या दहशतवाद्याचा मुलगा शमिल याला काल एनआयएने अटक केली. इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेली एनआयएने केलेली ही सहावी अटक आहे. साकीबच्या कारवायांचे केंद्र हे भिवंडीतील पडघा होते. तर शमिल पुण्याच्या कोंढव्यात सक्रीय होता. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना राजकीय गॉडफादरचे आशीर्वाद असतात. नाचण खानदान सुद्धा त्याला अपवाद नाही.

साकीब नाचण हा मुळचा पडघ्याचा. त्याचे वडील अब्दुल हमीद नाचण हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. आठवड्याभरापूर्वी पडघ्यात एनआयएने अकीब नाचण या इसमाच्या बोरिवली गावातील बंगल्यावर छापा मारला आणि त्याला अटक केली. इस्लामिक स्टेट्सच्या टोळक्यात अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी जुल्फीकार बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे त्याच्या बंगल्यावर मुक्कामाला होते. अकीबने त्यांना पैसाही पुरवला होता, ही बाब चौकशी दरम्यान उघड झाली. प्रकरणाचे धागेदोरे पडघ्यापर्यंत पोहोचले तेव्हाच यात साकीबचा कुठे ना कुठे सहभाग आढळणार अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. साकीबचा मुलगा शमील या प्रकरणात खोलवर गुंतल्याचे आता उघड झालेले आहे. साकीबचीही यात भूमिका असण्याची शक्यता आहे.

२००१ ते २००३ या काळात मुंबई सेंट्रल, विले पार्ले आणि मुलुंड लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. कित्येक मुंबईकरांचा बळी घेण्यात आला. या घातपातांसाठी स्फोटकं पुरवणाऱ्या अबु सुलतान, अबु अन्वर अली आणि मोहमद इक्बाल वाणी या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा क्राईम ब्रँचच्या पथकाने गोरगाव येथील हब मॉल जवळ एन्काऊंटर केला. प्रदीप शर्मा, दया नायक यांनी ही मोहीम यशस्वी केली होती. या दहशतवाद्यांकडे दोन एके-४७ रायफल, दोन ग्रेनेड आणि एक डायरी सापडली होती. या डायरीत असंख्य महत्वाचे तपशील होते. साकीब नाचण याला पुरवलेल्या स्फोटकांची आणि
रकमेची नोंदही त्यात होती.

लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा म्होरक्या साकीब नाचण असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी प्रदीप शर्मा, अंबादास पोटे, दया नायक यांचे पथक पडघ्यात गेले. परंतु, स्थानिक रहिवाशांनी या पथकाला रोखले. त्यांच्यावर दगडांचा मारा केल्यामुळे या अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. त्याच वेळी साकीबचा एन्काऊंटर झाला असता, परंतु एका अदृश्य शक्तीने त्याला वाचवले. अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला पोलिसांसमोर हजर व्हायला सांगितले. त्यानंतर साकीबला अटक झाली. विविध गुन्ह्यांमध्ये तो १४ वर्ष तुरुंगात होता.

स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडीया अर्थात सिमी या संघटनेवर बंदी आणल्यानंतर त्याच संघटनेला वहादत- ए- इस्लामीचा नवा चेहरा देण्यात आला. नाचण याच संघटनेसाठी काम करत होता. त्याने पडघ्यात उच्चशिक्षित मुस्लीम तरुणांचे टोळके बनवले होते. नाचणच्या बंगल्यात अनेक संशयास्पद बैठका होत असत. त्या बैठकांमध्ये मोबाईल फोनची मुभा नसे. नाचणशी संपर्कात असलेले लोक मोबाईल क्वचित वापरत. २०१७ मध्ये नाचण ठाणे तुरुंगातून सुटला. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे पाच महीने आधीच त्याची सुटका झाली. लोकल बॉम्बस्फोट म्हणजे देशाविरोधात छेडलेले युद्ध होते. अनेक जणांचा या घातपातात बळी गेला. अशा आरोपीला तुरुंग प्रशासन चांगल्या वर्तणुकीचा हवाला देऊन पाच महिने आधी मुक्त करते हा मुळात मूर्खपणाचा कडेलोट होता. साकीब सारखा दहशतवादी सुटल्यानंतर गप्प बसेल, कामधंदा करेल, बायकोला भाजी, इस्त्रीचे कपडे आणून द्यायला मदत करेल, अशी आशा बाळगणे याला मुर्खपणाशिवाय दुसरे
काय म्हणणार?

परंतु, तुरुंगातील चांगली वर्तणूक हा फक्त मुखवटा होता. त्याचे चाळे बंद झालेले नव्हते. दहशतवादी कारवायांसाठी नाचण पैसा फिरवण्याचे काम करतो असा संशय गुप्तचर यंत्रणांना होता. त्याच्यासाठी काम करणारा एक हवाला एजण्ट गुप्तचर संस्थांच्या रडारवर होता. त्याच्यावर नजर ठेवण्यात आली तेव्हा हा एजण्ट महाराष्ट्रातील एका बड्या राजकारणी खानदानासाठी काम करत असल्याचे उघड झाले. त्याच्या सीडीआरमध्ये त्या खानदानातील सर्व सदस्यांचे फोन नंबर वारंवार झळकत होते. काही जण तर त्याच्या नियमित संपर्कात होते. खानदानातील मूळ पुरुषाचा नंबर फार कमी वेळा या सीडीआरमध्ये दिसला तरी त्याची कन्या, पुतण्याचा मुलगा मात्र या हवाला एजण्टशी नियमितपणे बोलत असत. अनेकदा यांच्यात सॅण्डवीच कॉल होत असत. म्हणजे हवाला एजण्टचे नाचणशी बोलणे झाल्यानंतर लगेच तो एजण्ट खानदानातील सदस्यांशी बोलत असे. त्यामुळे त्यांच्यात काही कनेक्शन असण्याची दाट शक्यता होती. परंतु, साधी चौकशीही झाली नाही.
साकीब फक्त राजकीय गॉडफादरच्या सावलीत नव्हता. अंडरवर्ल्डमधील शार्कशी त्याचे संबंध होते. त्याच्या शब्दाला वजन होते.

याच संपर्काच्या आधारावर साकीब नाचणने २०१९ मध्ये आणखी एक प्रयोग केला होता. गज्वा ए हिंदसाठी पैसा उभा कर, असा मेसेज त्याला उत्तर प्रदेशातील त्याच्या कॉण्टॅक्टकडून आला. नाचणने त्या इसमाला अलिशाह पारकर याच्याकडे पाठवले. हा भारतीतील मोस्ट वॉण्टेड माफीया दाऊद इब्राहीमचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा. अलिशाहसोबत त्याची भेट होणार याचा सुगावा गुप्तचर संस्थांना लागला. काही अधिकारी अलिशाह कडे गेले. त्याची कॉलर पकडून त्याच्याकडून माहिती घेण्यात आली.

हे ही वाचा:

‘१८३ एन्काऊंटरबाबत अहवाल द्या’

आता फसवणुकीसाठी ‘४२०’ नव्हे ‘३१६’ कलम

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार

श्रीनगर एअरबेसवर मिग- २९ लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन तैनात

साकीब नाचणच्या एका खास चेल्याच्या सीडीआरमध्ये मविआ सरकारमधल्या मंत्री असलेल्या नेत्याचा नंबर वारंवार दिसला आहे. नाचण परिवाराला राजकीय आशीर्वाद होता. आता शमीलला अटक झाली आहे. तो आयईडी स्फोटकं बनवण्यात माहीर असल्याची माहीती उघड झाली आहे. २०१३ मध्ये विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र संघटीत गुन्हे प्रतिबंधक कायदा, मकोका
लावण्यात आला. परंतु, न्यायालयाला त्याचा पुळका आला. तो साकीब नाचणचा मुलगा आहे, म्हणून त्याच्यावर मकोका सारखा कठोर कायदा लावण्यात आला, अशी टीप्पणी करून न्यायालयाने पोलिसांना झापले. शमीलला जामीन देण्यात आला.

आता एनआयएने केलेल्या कारवाईवरून पोलिसांची भूमिका अत्यंत योग्य होती हे उघड झाले आहे. शमील हा मकोका लावण्याच्या योग्यतेचाच आरोपी होता. पुण्यातील कोंढवा हे या कारवायांचे केंद्र होते. तपास यंत्रणा इस्लामिक स्टेट्सचे जाळे खणून काढेल यात संशय नाही. परंतु, या जाळ्याला मजबूती देणारे राजकीय नेते कधी तरी तपास यंत्रणांच्या जाळ्यात येणार आहेत का? हा सवाल मात्र अनुत्तरीत राहण्याची शक्यता दिसते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा