33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरसंपादकीयमुद्दे सरले की गुद्दे उरतात...

मुद्दे सरले की गुद्दे उरतात…

लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न असला तरी लाट अस्तित्वात नसल्याची जाणीव जरांगेंना झाली असेल

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांची रणनीती मात्र अजून निश्चित होताना दिसत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या जरांगे समर्थकांच्या पहिल्या बैठकीत आपसांत हाणामारी झाली. उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या समर्थकांना जरांगे समर्थकांनी बदडून काढले. या बैठकीत मराठा समाजाचा उमेदवार एकमुखाने ठरवण्यात येणार होता.

निवडणूक लढवणे सोपे नाही. रणनीती ठरवणे तर अजिबात सोपे नाही. लोकसभा निवडणुकीत काय करायचे याबाबत जरांगेंची रणनीती दर चार दिवसाने बदलते आहे. मनात जो विचार येईल तो जाहीर करायचा आणि चार दिवसांनी बदलायचा असा प्रकार सुरू आहे. निर्णय घेणारे आणि बदलणारे जरांगे एकटेच असल्यामुळे विषय सोपा आहे. निर्णय का बदलला असे त्यांना विचारणारा कोणी नसल्यामुळे हे चालूनही जाते आहे.

सुरूवातीला ईव्हीएम मशीनचा गेम कऱण्याची योजना बनली. याचा मराठा समाजाच्या भल्याशी काय संबंध असा प्रश्न जरांगेंना कुणी विचारला नाही. प्रत्येक लोकसभेत इतके अर्ज भरायचे जेणेकरून ईव्हीएमवर मतदान घेणे शक्य होणार नाही. बॅलट पेपरचा वापर करावा लागेल, असे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीची हीच रणनीती वापरण्याची चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही भीतीने गारठले असावेत. परंतु त्यांच्या सुदैवाने या रणनीतीला फार प्रतिसाद मिळाला नाही. जरांगेंची भाषा बदलली. मराठा समाजाचे जास्त उमेदवार दिल्यास मतं फुटतील याचा त्यांना साक्षात्कार झाला. मराठा समाजाची ताकद दाखवायला हवी असे म्हणत त्यांनी कोलांटी मारली. प्रत्येक मतदार संघात एक उमेदवार देऊन मराठा समाजाची ताकद दाखवायची असे ठरले. हे उमेदवार ठरवण्यासाठी पहिली बैठक संभाजीनगरात झाली. पहील्याच बैठकीत फियास्को झाला.

राज्यातील समस्त मराठा समाज आपल्या पाठीशी आहे, आपण म्हणू त्याला मराठा समाज मतदान करणार, असा समज बाळगून आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून जरांगे बोलतायत. मराठा समाजातील अनेक नेते, विचारवंत त्यांना जाहीर विरोध करत असतानाही त्यांचा हा गैरसमज कमी होत नाही, याबाबत त्यांचे कौतुकच केले पाहिजे. प्रत्येक लोकसभा मतदार संघांत किती उमेदवार उभे करायचे याबाबत जरांगेंचे तळ्यात मळ्यात सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मविआतून बाहेर पडले. त्यांनी जरांगेंशी चर्चा केली. याबाबत ३० मार्च रोजी निर्णय होणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक हे आपले लक्ष नसून विधानसभा हे लक्ष आहे, असे विधानही जरांगेंकडून आलेले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे समर्थकांची बैठक झाली, या बैठकीत दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचे नाव घेतल्यामुळे विकी पाटील या तरुणाला मारहाण करण्यात आली. मराठा आंदोलनाचा विषय तापल्यास आपल्याला फायदा होईल या आशेवर बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा धक्का आहे.

उमेदवार ठरवण्यासाठी एकत्र यायचे आणि काही मतभेद झाल्यास जरांगेंकडे जायचे असे ठरले असताना मारहाणीचा विषय यायला नको होता. परंतु पैसे घेऊन खैरेंचे नाव काही जण घेणार आहेत, अशी माहिती मिळाल्यामुळे विकी पाटीलला बदडण्यात आले. त्याने खरोखरच पैसे घेतले होते की नाही, हे सिद्ध करण्याची गरजही कोणाला वाटली नाही.
राजकारण करणे हे उपोषण करण्या इतके सोपे नाही, हे जरांगेंच्या लक्षात आले असावे. राजकारणात पाच दशकं काढलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला आपला पक्ष आणि समर्थक एकत्र ठेवता आले नाही, तिथे जरांगे नावाचा धूमकेतू तर काल परवा महाराष्ट्राच्या आकाशात उगवला आहे.

राजकारण पार्टटाईम करता येत नाही. लोकांसाठी तुम्हाला २४ तास उपलब्ध असावे लागते. जे लोक पार्टटाईम राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा राहुल गांधी होतो. राजकारणात २४ तास राबल्यानंतरही यश मिळेल याची खात्री नसताना जेमतेम काही महिने चाललेल्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन जरांगे राजकारणात ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत.
संभाजी नगरमध्ये जे काही झाले ती तर सुरूवात आहे. आरक्षणाच्या आंदोलनात मी म्हणेन ती पूर्व हा जरांगेंचा खाक्या होता. लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडताना हा खाक्या उपयोगी पडणार नाही. इथे इतरांचे सुद्धा ऐकून घ्यावे लागते. आपल्या मताला किंमत नाही, असे जेव्हा लोकांच्या लक्षात येते तेव्हा ते तुम्हालाही किंमत द्यायचे बंद करतात.

हे ही वाचा:

मुख्तार अन्सारीचा प्रवास; स्वातंत्र्य चळवळ, वीरचक्र मिळविणाऱ्या कुटुंबातला मुलगा ते गुन्हेगार

जम्मूहून श्रीनगरला जाणारी टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

दक्षिण आफ्रिकेतील बस अपघातात ४५ प्रवासी ठार

आंदोलन संपले तरी मी संपलो नाही, माझी किंमत संपलेली नाही, हे दाखवण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे. याचसाठी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जरांगेचा आटापिटा सुरू आहे. लाटेवर स्वार होण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी आता लाट अस्तित्वात नाही, याची जाणीव त्यांना होऊ लागलेली आहे. लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येईल तस तशी त्यांना याची खात्री पटू लागेल. लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवाद, संस्कृती, देशाचे अर्थकारण, विकास, पायाभूत सुविधा, रोजगार हे महत्वाचे मुद्दे आहेत. ज्यांना आपण निवडून देऊ ते आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या योग्यतेचे आहेत की नाहीत, हा लोकांच्या दृष्टीने महत्वाचा निकष राहणार आहे.

त्यामुळे १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही सगेसोयऱ्यांचे तुणतुणे वाजवणाऱ्या जरांगेंना या निवडणुकीत लोक फार गांभीर्याने घेणार नाहीत. जे काही मूठभर लोक त्यांच्यासोबत उरले आहेत, त्यांचाही लोकसभा निवडणुकीत भ्रमनिरास होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर फक्त त्याची झलक दिसलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा