28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरसंपादकीयरायगडातील अनंत ‘गीते’चा भावार्थ…

रायगडातील अनंत ‘गीते’चा भावार्थ…

गीते ठाकरेंना भावी मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवत आहेत

Google News Follow

Related

कडवट शिवसैनिक नावाची एक जमात कधी काळी शिवसेनेत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे दैवत होते. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले अनेक कडवट शिवसैनिक, शिवसेना नेते, उपनेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळात मोडीत निघाले. पक्षात खूप मागे पडले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे त्यातले अपवाद आहेत. अत्यंत तडाखेबंद भाषण करणारा हा नेता आपल्या पक्षप्रमुखांच्या पावलावर पाऊल टाकत यूटर्नची कला शिकला आहे.

 

उद्धव ठाकरेंच्या सध्या रायग़डच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अजून लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली नाही. तरीही ठाकरे कामाला लागलेले आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांमुळे त्यांची झोप उडालेली आहे. काही दिवसांपूर्वी मोदी नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांनी मोदींना पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर केलेला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी पुन्हा महाराष्ट्रात येणार आहेत. भाजपाला महाराष्ट्रात चार जागा मिळण्याची शक्यता नसल्यामुळे मोदी वारंवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याचे विश्वप्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. मोदींच्या महाराष्ट्रात येण्यामुळे उबाठा गट किती अस्वस्थ आहे, याची कल्पना त्यांच्या वक्तव्यावरून येते.

घरातून बाहेर न पडणारे ठाकरे याच अस्वस्थतेमुळे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरू लागले आहेत. कल्याण दौऱ्यानंतर ते रायगडच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची पेणमध्ये सभा झाली. माजी खासदार, मोदी सरकारमधील माजी मंत्री अनंत गीते यांनी पेणच्या सभेत त्यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला. गीते हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या अन्य नेत्यांप्रमाणे त्यांनी पैशाच्या राशी निर्माण केल्या किंवा तळघरं भरली नाहीत. कधी काळी गीते अंधेरीच्या तेलीगल्लीत दहा बाय दहाच्या खोलीत राहायचे. आजही राजकारणातील भपका त्यांना शिवलेला नाही.

 

मविआ सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेला मांडीवर घेतले म्हणून कट्टर शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ होते. गीते त्यातलेच एक. २०२१ मध्ये एका जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती भडीमार केला. ‘राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कोणीही नेता, जगाने त्याला कोणतीही उपाधी देवो, जाणता राजा म्हणो, तो आमचा नेता होऊ शकत नाही’. अशी जहरी टीका त्यांनी केली. ही टीका अर्थात शरद पवारांवर होती. गीतेंच्या या भाषणानंतर ते ठाकरेंना सोडून जातील अशा प्रकारची चर्चा सुरू होती. परंतु मविआचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर गीतेंची भूमिकाही बदलली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह भाजपा सोबत गेले. गीतेंच्या वाटेतला अडथळा दूर झाला. ठाकरेंच्या सोबत राहूनच लोकसभा लढता येईल हे त्यांच्या लक्षात आले. ‘तटकरे गेल्यामुळे माझा मार्ग मोकळा झाला’ असे गीते यांनी जाहीरपणे सांगितले. ठाकरेंनीही गीतेंसाठी ही लोकसभा शरद पवार यांच्याकडून मागून घेतली. गीतेंची उमेदवारी इथून जाहीर केली.

 

मविआची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करणारे गीते सत्ता गेल्यानंतर मात्र शरद पवार आणि ठाकरेंसोबत अनेकदा एका मंचावर आले. ठाकरेंसोबत गद्दारी करणाऱ्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या रायगडच्या तीन आणि रत्नागिरीतील एका आमदाराला आपण येत्या निवडणुकीत पाडणार अशी गर्जना करू लागले. गीतेंचे राजकीय शत्रू आता बदलले आहेत. राष्ट्रवादी तीच आहे, खंजीर खुपसणारी तरीही ते आता शरद पवारांच्या विरोधात बोलत नाहीत. आमदार भरत गोगावले, सिद्धेश कदम, उदय सामंत यांच्याविरुद्ध भडीमार करत असतात. राजकारणाची चाल कायम नागमोडी असते ती अशी.

हे ही वाचा:

तीन कोटी महिला बनणार ‘लखपती दीदी’

बूट फाटल्यामुळे नातेवाइकाचे लग्न हुकले; वकील ग्राहकाची दुकानदाराला नोटीस

झारखंड: हेमंत सोरेन यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी!

यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल

पेणच्या सभेत गीते यांनी ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. हे तेच गीते आहेत जे २०२१ मध्ये म्हणाले होते की, ‘मविआ सरकार हे आमचे सरकार आहे, असं फक्त एवढ्यासाठी म्हणायचे की आमचा मुख्यमंत्री आहे’.
तेच गीते ठाकरेंना भावी मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवत आहेत. हे मुख्यमंत्रीपद स्वबळावर मिळेल असे गीते यांचा समज आहे का? मविआच्या काळात किमान पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे होते. आता तर काहीही उरलेली नाही. कमरेला लंगोटी उरलेल्या काडी पेहलवानासारखी त्यांची परीस्थिती आहे. महाराष्ट्रात भावी या शब्दाचा वेगळा अर्थ आहे. शरद पवार हे भावी पंतप्रधान होते. ते भावी असल्यामुळे कधीही पंतप्रधान होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातले भावी कायम भावी राहतात म्हणून जर गीते ठाकरेंना भावी मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्याला कोणाची हरकत असण्याचे काय कारण? परंतु एक गोष्ट निश्चित २०२१ मध्ये कडवट शिवसैनिक म्हणून गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती, असा जो लोकांचा समज होता तो आता दूर व्हायला हरकत नाही. ती टीका वैयक्तिक राजकीय समीकरणे बिघडल्यामुळेच करण्यात आली होती.

सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते. गीतेंचा त्यांनी पराभव केला होता. त्यामुळे विद्यमान खासदार म्हणून पुढच्या वेळी त्यांनाच तिकीट मिळणार हे उघड होते. गीतेंचे वय ७२ आहे. अर्थात लोकसभा लढवण्याची त्यांना ही शेवटची संधी आहे. ही संधी तटकरेंमुळे हुकणार याची खात्री झाल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसवर बरसले होते. ‘राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला’, अशी टीका त्यांनी केली होती. ‘शरद पवारांना कोणी जाणता राजा म्हणो, पण ते आमचे गुरु होऊ शकत नाहीत’, असे म्हणणारे गीते आता त्याच शरद पवारांच्या सोबत एका मंचावर दिसतात. ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करतात. गुरुची विद्या गुरुला एवढाच रायगडमधल्या अनंत ‘गीते’चा भावार्थ आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा