29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरसंपादकीय‘पदवीधर’वरून सरदेसाई- परब भिडले कोणाचा गेम होणार ?

‘पदवीधर’वरून सरदेसाई- परब भिडले कोणाचा गेम होणार ?

Google News Follow

Related

माझे कुटुंब माझी जबाबदारी धोरण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता गेल्यानंतर सुद्धा जारी ठेवले आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे कुटुंबिय सगेसोयरे वरुण सरदेसाई यांच्यासाठी ताकद लावत आहेत. विधान परिषदेची मुदत संपत आलेले एड. अनिल परब यामुळे प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे उबाठा गटात नवी घमासान होण्याची चिन्ह आहेत.

 

मविआची सत्ता येण्या आधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात आणि सत्ता गेल्यानंतर सुद्धा परब सक्रीय राहीले आहेत. विभागप्रमुख म्हणून त्यांनी उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये शिवसेनेची उत्तम बांधणी केली होती. आजही तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा उत्तम संवाद आहे. त्यांचे वकीली ज्ञान यथा-तथा जरी असले तरी पक्षाला जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा ते त्या आघाडीवरही उभे राहिलेले आहेत. मविआची सत्ता असताना ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्या भाजपा नेत्यांची प्रकरणे खणून काढण्याचे कामही परब यांच्यावर सोपवण्यात आले होते. अर्थात त्यांच्या हाती काहीही आले नाही ही गोष्ट वेगळी. एकूणच संघर्षाच्या काळात त्यांनी आपली उपयुक्तता दाखवून दिलेली आहे.

 

अनिल परब हे २०१८ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. मविआच्या काळात मंत्री झाले. अनिल देशमुख हे गृहमंत्री असले तरी ठाकरेंच्या वतीने पोलिसांशी बोलण्याचे काम सचिन वाझे आणि परबच करीत असत.विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जो पहिला पेन ड्राईव्ह धमाका केला, त्यात परिवहन बदली घोटाळ्याचा विषय होता. त्या घोटाळ्यात मंत्री म्हणून अनिल परब यांच्या नावाची चर्चा होती.

 

दापोलीतील त्यांच्या बेकायदा रिसॉर्टचे प्रकरण खूप गाजले. याप्रकरणी सदानंद परब या त्यांच्या सहकाऱ्याला अटकही झाली होती. हे सगळं सांगण्याचे कारण इतकेच की शिवसेना, मातोश्री आणि अनिल परब हा गेली अनेक वर्षे फेव्हीकॉल का मजबूत जोड आहे. आमदारकीची मुदत संपत आल्यामुळे अनिल परब यांच्यासमोर पुढची विधानसभा लढवण्याचा पर्याय आहे. दुसरा पर्याय लोकसभा लढवण्याचा आहे. तिसरा पर्याय पुन्हा विधान परिषदेवर निवडून जाण्याचा. पक्षातील आमदारांची संख्या इतकी रोडावली आहे की उबाठा गटाचा आमदार विधान परिषदेत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर मतदार संघाची निवडणूक परब यांच्यासाठी एकमेव संधी आहे.
परंतु इथेच माशी शिंकलेली आहे.

 

वरूण सरदेसाई ही निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड इच्छूक आहेत. त्यांना रश्मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा खंबीर पाठींबा असल्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंना या निर्णयासमोर मान तुकवणे भाग आहे. वरूण सरदेसाई कामाला लागलेले आहेत. त्यांनी तयारी सुरू केली आहे. ठाकरेंचे त्यांना आशीर्वाद असल्यामुळे पक्षाची शिल्लक यंत्रणा त्यांच्यासाठी कामाला लागलेली आहे.

 

वरुण सरदेसाई यांच्या या हालचालीमुळे परब खदखदतायत. ऊन-सावलीत, वादळ-वाऱ्यात आपण ज्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिलो, ते ठाकरे कुटुंबिय आपल्या उमेदवारीचा विचार न करता सगेसोयऱ्यांसाठी ताकद लावतात हे दिसत असल्यामुळे ते प्रचंड हिरमुसले आहेत. त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. कारण सरदेसाईंच्या तुलनेत परबांचे योगदान निश्चितपणे मोठे आहे. खरे तर या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. शिवसेना सत्तेत आल्यानंतर वरूण सरदेसाई उगवले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास मंत्रालयात फायली तपासण्याच्या मोहिमेवर त्यांना आदित्य ठाकरेंनी रुजू केले आहे, अशी चर्चा होती. खरे-खोटे कोणाला ठाऊक, पण वरूण सरदेसाई नगरविकास मंत्रालयात तळ ठोकून बसलेले असायचे हे नक्की.

हे ही वाचा:

सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर

आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी

राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा चेन्नईच्या रुग्णालयात मृत्यू!

पिसेतल्या आगीनंतर मुंबईत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात!

युवासेना नावाचे जे प्रकरण शिवसेनेत होते, ज्याची स्थापना भविष्यात आदित्य यांचे पक्षारोहण सुखद व्हावे म्हणून करण्यात आली होती. त्यात वरूण सरदेसाईंसारख्या बऱ्याच जणांची वर्णी लागली होती. इथे फक्त आदित्य स्तोत्राचा जप एवढीच कार्यक्षमता अपेक्षित असल्यामुळे इथे गर्दी वाढत गेली. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये जुन्या जाणत्या नगरसेवकांना पेन्शनीत काढून त्यांच्या जागी युवासेनेतील या उभरत्या नेत्यांनी भरून काढायची अशी योजना होती. महापालिकेत हा गेम यशस्वी झाल्यानंतर पुढे विधानसभेत याची पुनरावृत्ती अपेक्षित होती. अर्थात महापालिकेच्या निवडणुका लोंबकळल्यामुळे ही योजना साफ पडली. दरम्यानच्या काळात सत्ता गेल्यामुळे सगळाच बाजार उठला.

 

आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अशा सगळ्याच पातळीवर गळती सुरू झाली. त्यामुळे विधानसभा, विधान परिषद, राज्य सभा अशा सर्वच ठिकाणी जाण्याची आस बाळगून जे लोक स्वप्न रंगवत होते अशा मंडळींची अडचण झाली. कारण आता संधी खूपच कमी आणि दावेदारांची संख्या मोठी अशी स्थिती. त्यात कष्ट करणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्यांपेक्षा सगेसोयरेच भारी आहेत. वरुण सरदेसाईंना ज्या प्रकारे ठाकरेंचे समर्थन मिळते आहे, त्यावरून सगेसोयऱ्यांचा आग्रह इथेही दिसून येतो. कार्यकर्त्याला न्याय मिळो न मिळो, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पद मिळाले पाहिजे असा ही मानसिकता आहे.

 

दरम्यान, अनिल परब यांचे दापोली प्रकरण अचानक थंड्या बस्त्यात गेले आहे. दापोलीच्या रीसॉर्टबद्दल अलिकडे चर्चाही थांबली आहे. परब भाजपातील काही जणांशी प्रेमाचे संबंध ठेवून आहेत. मविआची सत्ता असताना एका भाजपा आमदाराच्या विरोधात वरूण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी मोर्चा खोलला होता. त्याला वाचवण्यात परब यांनी ताकद लावली होती. आता त्याची परतफेड होण्याची शक्यता आहे. अर्थ स्पष्ट आहे पदवीधर मतदार संघासाठी वरूण सरदेसाईंच्या नावाचा आग्रह ठाकरेंनी सोडला नाही, तर पुन्हा एकदा घमासान निश्चित आहे. त्यामुळे शिल्लक पक्ष अधिक बारीक सारीक होण्याच्या दिशेने वाटचाल करेल अशी शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा