30 C
Mumbai
Tuesday, October 6, 2026
घरसंपादकीयदुसऱ्या ९/११ चे लक्ष्य काय? अब्राहम अकॉर्ड की IMEC

दुसऱ्या ९/११ चे लक्ष्य काय? अब्राहम अकॉर्ड की IMEC

Google News Follow

Related

फ्लायदुबईच्या विमानाचा वापर करून इस्रायलमध्ये ९/११ घडवण्याचा कट स्मित माछर नावाच्या एका भारतीय वैमानिकाने उधळून लावला. जगभरात त्याचे कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मितच्या या धाडसाबाबत कौतुक केले असून त्याचा उल्लेख ‘हिरो’ असा केलेला आहे. हा कट होता का? एखादा देश या कटाच्या मागे होता का? लोकांचे बळी घेण्याच्या पलीकडे या कटाचा काही हेतू होता का? इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने यामागे अब्राहम अकॉर्ड उधळून लावण्याचा कट असल्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. या आठवड्याभरात आखातात अशा काही घडामोडी घडल्या होत्या की या कराराच्या कक्षा विस्तारल्या जाण्याची शक्यता होती.

फ्लायदुबईचे FZ 1073 हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. विमानातील स्मित माछर या भारतीय वैमानिकावर सहवैमानिकाने चाकूने हल्ला केला. विमानाचे अपहरण करून तेल अवीववर ९/११ सारखा हल्ला करण्याचा त्याचा हेतू असावा. विमानात १७४ प्रवासी होते, त्यात बरेचसे इस्रायली होते. माछरने जखमी झाल्यानंतरही कॉकपिटचा पोलादी दरवाजा उघडला. त्याआधी अपहरण किंवा घातपातासाठी प्रसारित करण्यात येणारा ७५०० हा संकेत दिला होता. कॉकपिटचा दरवाजा उघडल्यामुळे आतील गोंधळ बाहेर आला. काही वर्षे सक्तीचे लष्करी शिक्षण घेतलेल्या इस्रायली नागरिकांनी तात्काळ हल्लेखोर पायलटच्या मुसक्या आवळल्या. विमानाने सौदीमध्ये तात्पुरते लँडिंग केले. ओमानच्या वैमानिकाने हे का केले, त्याच्या पाठीशी कोण आहे, हे तपासांती उघड होईलच. इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने यामागे अब्राहम अकॉर्ड उधळण्याचे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे, त्याचा आधार काय? गेल्या काही दिवसांत आखातात घडलेला घटनाक्रम लक्षात घेतला तर इस्रायलच्या प्रतिक्रियेतील आशय लक्षात येऊ शकेल.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये युएई, इस्रायल या देशांच्या दरम्यान २०२० मध्ये अब्राहम अकॉर्ड घडवला होता. अमेरिकेने मध्यस्थ म्हणून या करारावर सह्या केल्या होत्या. हा करार घडवून इतिहासात आपले नाव नोंदवण्याची ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षा होती. या करारामुळे आखातात कायमस्वरूपी शांतता निर्माण होईल असा त्यांचा दावा होता. त्यावेळी सौदी अरेबियाने या करारावर स्वाक्षऱ्या कराव्यात याबाबत ट्रम्प आग्रही होते. परंतु सौदीने माघार घेतली. कारण जेव्हा हे सगळे घडत होते, म्हणजेच २०२० मध्ये, सौदी हा मुस्लिम जगताचा निर्विवाद नेता होता. इस्रायलशी हातमिळवणी करून हे स्थान गमावण्याची सौदीची इच्छा नव्हती. सौदीला तेव्हाही इस्रायलशी संबंध हवे होते. दोन्ही देशांमध्ये अधिकृत संबंध नसले तरी मागील दाराने दोन्ही देशांचा संवाद सुरू असतो. परंतु यापेक्षा जास्त संबंध वाढवण्याची सौदीची इच्छा नव्हती.

इस्रायल हा मुस्लिम जगाचा परंपरागत शत्रू मानला जातो. इस्रायलचे अस्तित्वच मुस्लिम देशांना मान्य नाही. त्यामुळे इस्रायलच्या निर्मितीनंतर लगेचच या देशावर सर्व मुस्लिम देशांनी आक्रमण केले होते. १९४८ पासून आजपर्यंत इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये पाच मोठे संघर्ष झालेले आहेत. प्रत्येक युद्धानंतर इस्रायलच्या सीमा विस्तारल्या आणि मुस्लिम देशांचा पराभव झाला. तरीही इस्रायलचा विरोध काही कमी झाला नाही. गेल्या काही वर्षांत चित्र बदलले आहे. मुस्लिम जगतात कट्टरवादी विरुद्ध विकासवादी असे तट पडलेले आहेत. अनेक देश इस्रायलसोबत मागील दाराने संबंध प्रस्थापित करते झाले आहेत. इस्रायलशी शत्रूत्व आपल्या हिताचे नाही, हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. किंबहुना संबंध ठेवले तर फायदा होईल हे त्यांना समजले आहे. इराण युद्धानंतर ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली.

इस्रायलने इराणवर हल्ला चढवल्यानंतर सौदी, युएई, ओमान, कतार विरुद्ध इराण असे तट पडले. इस्लामी देशांमध्ये आपापसात प्रचंड संघर्ष आहेत. सौदी विरुद्ध येमेन यांचा संघर्ष चिघळलेला आहे. युएई आणि सौदी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. ताज्या इराण युद्धामुळे सगळ्या मुस्लिम देशांच्या लक्षात आले की, अमेरिका आपल्याला सुरक्षा कवच देऊ शकत नाही. येमेनच्या हुतींनी सौदीला लाल समुद्रात सळो की पळो केल्यानंतर सौदीचेही डोळे उघडले. युएईमध्ये मुस्लिम देशांची एक गोपनीय बैठक झाली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू युएईच्या निमंत्रणावरून बैठकीला आले होते. परंतु युएई, इस्रायलशिवाय बैठकीत सौदी, मोरोक्को, इजिप्त, कुवेत, लिबिया, बहरीन, ओमान या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या भेटीबाबत मुस्लिम देशांनी मौन बाळगले आहे. जी काही चर्चा आहे, ती मीडियामध्ये. त्याची पुष्टी किंवा खंडन करण्याच्या भानगडीत कोणीही पडत नाही.

म्हणजे २०२० मध्ये झालेल्या अब्राहम अकॉर्डमध्ये जे होऊ शकले नाही, जे घडावे अशी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचंड इच्छा होती, ते इराण आणि हुतींच्या धसक्याने घडताना दिसते आहे. २०२० मध्ये अब्राहम अकॉर्डवर सह्या केल्यानंतर युएईने इस्रायलला मान्यता दिली. आखातातील तो असा पहिला देश बनला. हुतींचा मारा सौदीला असह्य होतो आहे. मक्का कराराची गोधडी करून पाकिस्तान शांत झोपला आहे. तुर्किये सुद्धा हलत नाही. अमेरिकेने मदतीच्या विनंतीकडे काणाडोळा केला आहे. सौदी असा कोंडीत सापडलेला असताना त्यांनी इस्रायलला हाक दिली. इस्रायलने तात्काळ प्रतिसाद दिला. सौदीला टेक्निकल इंटेलिजन्स पुरवण्याची सुरुवात केली. उपग्रहांच्या माध्यमातून मिळणारा रिअल टाईम इंटेलिजन्स सौदीला मिळू लागला.

येत्या काळात इराण युद्ध जरी संपले तरी आखातील मुस्लिम देशांना असलेला इराणचा ताप संपणार नाही. अमेरिकेकडून आता फार आशा उरलेल्या नसताना इस्रायलशिवाय दुसरा कोणताही देश त्यांची मदत करण्याची शक्यता नाही. कारण इथे समान शत्रूचा नियम लागू होतो. हा घटनाक्रम अभूतपूर्व आहे. आखातातील संकटामुळे मुस्लिम देश सौदीच्या जवळ येताना दिसतायत. इस्रायलकडे सौदीला देण्यासारखे बरेच काही आहे. हे घडले तर अब्राहम अकॉर्डचा विस्तार होणे निश्चित आहे. सौदीने या करारावर सह्या केल्या, तर अनेक मुस्लिम देश त्याचे अनुकरण करतील.

हे ही वाचा:

तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी

भारत-फ्रान्स सागरी सराव ‘वरुण’ला सुरुवात

दुबईत स्मित यांच्या कुटुंबीयांची भारतीय राजदूतांनी घेतली भेट

अमेडियात ९९ टक्के हिस्सा असताना पार्थ पवार आरोपी का नाहीत?

पाकिस्तान, तुर्किये, इराण यांना हे नको असले तरी घडेल. होर्मुझ बंद असल्यामुळे जगाची गोची झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत गल्फ कोऑपरेशन कौन्सिलला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडॉरचे जोरदार समर्थन केले. होर्मुझमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य होते.

युएईमध्ये झालेली बैठक, त्यात मुस्लिम देशांसह इस्रायलचा सहभाग, यामुळे इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडॉरचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून युएई, पुढे सौदी, जॉर्डन आणि इस्रायलपर्यंत रेल्वे असा हा कॉरिडॉर जाणार आहे. इस्रायलच्या हायफा बंदरावरून भूमध्य समुद्रातून युरोपच्या बंदरांपर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या कॉरिडॉरमध्ये सगळ्यात मोठी अडचण इस्रायल आणि मुस्लिम देशांमध्ये असलेला तणाव होता. तो तणाव निवळण्याची शक्यता युएईमध्ये झालेल्या बैठकीमुळे निर्माण झाली होती. तेल अवीववर ९/११ सारखा हल्ला करून पुन्हा एकदा मुस्लिम देश आणि इस्रायलमध्ये वातावरण तापवण्याचा प्रयत्न होता, असे मानायला वाव आहे. हा प्रयत्न भारताच्या एका निधड्या छातीच्या वैमानिकामुळे उधळला गेला. फक्त विमान प्रवाशांचे प्राण वाचलेले नाहीत, तर मोठी प्राणहानीही टळली आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा