28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरसंपादकीयठाकरे रालोआसोबत जाणार ही चर्चा का होते आहे?

ठाकरे रालोआसोबत जाणार ही चर्चा का होते आहे?

भाजपा ठाकरेंच्या फंदात पडण्याचे कारण नाही.

Google News Follow

Related

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपाला दणका बसला. मविआला चांगले यश मिळाले. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. मविआला उत्साहाचे भरते आले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रालोआला पाठिंबा देणार अशा कंड्या का पिकवल्या जातायत? निखिल वागळेंसारखे पत्रकार यात आघाडीवर आहेत. ठाकरेंनी भाजपासोबत जाऊ नयेत असा सल्ला देतायत. दिल्ली, महाराष्ट्रात अफवांचा बाजार गरम आहे. परंतु वस्तुस्थिती काय आहे?

घटना बदलणार, आरक्षण संपवणार, अशा अफवा पसरवून काँग्रेसने भाजपाला दणका दिला. निवडणुका संपल्या परंतु अफवा थांबण्याचे नाव नाही. सत्य आणि अफवांच्या मधली सीमा रेषा पुसट झालेली आहे. उद्या नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा शपथविधी आहे. भाजपाच्या २४० जागा जिंकून आल्या असल्या तरी रालोआकडे ३०३ खासदारांचा पाठींबा आहे. हा आकडा वाढणार, आणखी काही पक्ष रालोआसोबत येणार असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

काँग्रेसला राज्यात सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत. नाना पटोले यांची कन्या नीता हीने यंदाच्या वर्षी पप्पा मुख्यमंत्री होणार असे जाहीरपणे सांगितले आहे. पटोले यांचे बंधू विनोद पटोले यांनी तर नाना पटोले यांच्या उपस्थितीत ते मुख्यमंत्री होणार म्हणून सांगितले आहे. पटोलेंची महत्वाकांक्षा त्यांच्या कुटुंबियांच्या तोंडून व्यक्त केली जाते आहे. विधानसभेत योग्यतेच्या आधारावर जागा वाटप होईल असे नाना पटोले म्हणतायत. आडमार्गाने ते सूचित करतायत की काँग्रेस जास्त जागा लढवणार आहेत.

२०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती खूपच वेगळी आहे. उद्धव ठाकरेंना भाजपापासून फोडणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही खस्ताहाल होती. राज्यात काँग्रेसचा फक्त एक खासदार होता. काँग्रेसचे आज १३ खासदार आहेत. काँग्रेस राज्यातील नंबर वन पार्टी बनली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार राज्यात मविआ १५० विधानसभा मतदार संघात आघाडीवर आहे. याचा अर्थ विधानसभा निवडणुकीनंतर मविआची सत्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवे राजकीय समीकरण लक्षात घेतले तर मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचा दावा असणार हे उघड. इथेच ठाकरेंची अडचण होणार आहे.

भाजपासोबत युतीमध्ये असतानाही ठाकरेंच्या पक्षाला मंत्रिपदे मिळत होती. परंतु मुख्यमंत्रीपदाची आशा नव्हती. हे पद टप्प्यातही नव्हते. मुख्यमंत्रीपद मिळावे या महत्वाकांक्षेने पेटलेल्या ठाकरेंनी भाजपाशी काडीमोड करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार थाटला. आता तेच मुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून खूप दूर गेलेले दिसते आहे. उद्धव ठाकरे रालोआकडे वळतील अशी जी चर्चा होते आहे, त्याच्या मुळाशी नेमके हेच वास्तव आहे. ही चर्चा भाजपाकडून पेरली जात असल्याची शक्यता कमी आहे. लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी भेटीसाठी ठाकरेंची वेळ मागितली, अशी बातमी एका मराठी चॅनलवर पेरण्यात आली होती. लाड यांनी तातडीने ही बातमी असत्य असल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी ही बातमी भाजपाच्या विरोधात जाणारी असल्यामुळे ती भाजपाने पेरली असण्याची शक्यता नाही. ही कोणी पेरली असेल याचा अंदाज बांधणे फार कठीण नाही.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदी यांची ‘शेजारधर्म प्रथम’ची हाक

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव जाणार शपथविधीला

८० पैकी ६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात ‘धन्यवाद यात्रा’

१८व्या लोकसभेचे पहिले सत्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यात

दिल्लीतील समीकरणे अशी आहेत की भाजपाला आज नसली तरी भविष्यात आणखी मित्र पक्षांची गरज पडू शकते. परंतु भाजपा ठाकरेंच्या फंदात पडण्याचे कारण नाही. भाजपाकडे अधिक मजबूत आणि अधिक पर्याय आहेत. द्रमुक सध्या इंडी आघाडीत आहे. ही आघाडी दोन कारणांसाठी स्थापन झाली होती. एक तर भाजपाविरोध हा त्यातला समान धागा होता. दुसरे कारण सत्ता आलीच तर त्यांना सत्तेत वाटा हवा होता. बाकी द्रमुकला तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा फायदा होतो, अशातला काही भाग नाही. लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपाला सुमारे ११ टक्के मतं पडलेली आहेत.

भाजपाचा एकही उमेदवार विजयी झालेला नसला तरी २०१९ मध्ये केवळ साडे तीन असलेला भाजपाच्या मतांचा टक्का २०२४ मध्ये आठ टक्क्यांनी वाढला. भाजपासोबत केंद्रात सेटींग झाले तर राज्यात अण्णामलाई नावाच्या उगवत्या सूर्याचा ताप थोडा कमी करणे द्रमुकचे नेते एम.के.स्टॅलिन यांनी शक्य आहे. केंद्राशी चांगले संबंध असतील तर राज्यालाही काही कमी पडणार नाही. गेल्या लोकसभेच्या काळात वायएसआर काँग्रेसचे नेते आणि आंध्रचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे रालोआत सामील नव्हते. परंतु मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभा असो वा लोकसभा त्यांनी मोदींच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली.

द्रमुकचे एम.के.स्टॅलिन तिसऱ्या टर्ममध्ये हीच भूमिका पार पाडू शकतात. त्यांच्याकडे २२ खासदार आहेत. त्यामुळे उद्धव यांच्यापेक्षा एम.के.स्टॅलिन ही भाजपासाठी चांगली चॉईस आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्रातही चित्र बदलू शकते. परंतु तेव्हा गरज भाजपा नसेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा