32 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरसंपादकीयमोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

मोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक आर्थिक सल्ला भारतीयांच्या पथ्यावर पडलेला आहे. सोन्याचे दर घसरतील हे मोदींना ठाऊक होते, असे ठामपणे सांगता येत नाही, परंतु देशहितासाठी वर्षभर सोने खरेदी करू नका, अशी जाहीर विनंती त्यांनी जनतेला केली तेव्हापासून सोन्याच्या भावात मोठी घसरण सुरू झाली. सल्ला ऐकून ज्यांनी सोने खरेदी करण्याचे लांबणीवर टाकले ते आज मोदींना दुवा देत असतील. मोदी हे अर्थतज्ज्ञ नाहीत, परंतु अनेकदा त्यांचे निर्णय अर्थतज्ज्ञ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापेक्षाही उजवे ठरले आहेत.

भारतात सोनेही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सणावारा निमित्त सोन्याची खरेदी केली जाते. एका अर्थाने नियमितपणे सोन्याचा संचय केला जातो. पिढ्यान्‌पिढ्या हे सुरू असते. १० मे रोजी देशवासियांना आवाहन केले होते की, देशहितासाठी नागरिकांनी वर्षभरासाठी सोन्याची खरेदी टाळावी. हा सल्ला लोकांना आवडणार नाही, हे त्यांना ठाऊक असावे. परंतु ऐकायला आवडतील असे सल्ले देण्यापेक्षा जे उपयुक्त आहेत, असे सल्ले देण्याकडे मोदींचा कल आहे. सोन्याच्या खरेदीबाबत त्यांनी दिलेला सल्ला त्यात पठडीतील होता. काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी मोदींवर प्रचंड आगपाखड केली होती. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत साशंकता व्यक्त केली होती. तेव्हापासून आजपर्यंत सोन्याच्या दरात २० टक्के घसरण झाली आहे. अजूनही सोन्याचे भाव खाली येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातल्या त्यात गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या ३५०० डॉलर प्रति औंस असलेले सोने येत्या काही वर्षांत १० हजार डॉलर प्रति औंस होईल अशी शक्यता जेफ्रीज या वित्त संस्थेने सप्टेंबरच्या ताज्या अहवालात व्यक्त केली आहे.

सोने खरेदी करू नका असा सल्ला देणारे मोदी हे काही पहिले पंतप्रधान नाहीत, यूपीएच्या सत्ताकाळात पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही अशाच प्रकारचा सल्ला जनतेला दिला होता. बहुधा काँग्रेस नेत्यांना हे ठाऊक नसावे किंवा जनतेच्या विस्मरणशक्तीवर काँग्रेसचा गाढ विश्वास असावा. सोने खरेदी टाळा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्यावर जळजळीत टीका करू लागले. ‘हे आवाहन म्हणजे सरकारच्या अपयशाची कबुली आहे. सरकार आर्थिक अपयशाची जबाबदारी जनतेच्या खांद्यावर ढकलत आहे’, अशी प्रतिक्रिया त्यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. ‘इंडिया इज डेड इकॉनॉमी’ असा दावा राहुल गांधी यांनी केलाच होता. अर्थकारणावर चिखलफेक करण्याची त्यांना ही आयती संधी होती. याबाबत राहुल गांधी यांनी कायम सातत्य दाखवले आहे. ताज्या अमेरिका दौऱ्यातही त्यांनी भारताच्या अर्थकारणाबाबत नकारात्मक विधाने केली आहेत. राहुल गांधी यांची बडबड मनावर घेऊन खुन्नसमध्ये ज्यांनी सोने खरेदी केले त्यांना प्रचंड खोट खावी लागली. त्यावेळी मोदींचे ज्यांनी ऐकले, त्या लोकांचे भले झाले, असे आकडे सांगताहेत.

हे ही वाचा:

कोटा अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

बहरीनमधील अमेरिकी तळावर इराणचा क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला

श्री समर्थ, विद्यार्थी, सरस्वतीची आगेकूच

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे ७०० धावांचे पंचक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे २०२६ रोजी हैदराबाद येथील एका जाहीर सभेत देशवासियांना “पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका” असे आवाहन केले होते. मोदींचा उद्देश स्पष्ट होता. इराण-अमेरिका आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे तेलाचे दर कडाडले होते. ८७ टक्के तेलाची आयात करणाऱ्या भारतासारख्या देशाच्या परकीय गंगाजळीवर मोठा ताण आला होता. सोने खरेदीसाठीही परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होते, त्यामुळे मोदींनी सोने खरेदीबाबत वर्षभर संयम पाळण्याचे आवाहन केले होते.

काल शनिवारी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी लखनऊ येथील कौशल दीक्षांत समारोहात त्यांनी या आवाहनाची आठवण करून दिली. आणखी एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे.  १० मे २०२६ रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर होते. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,५२,३५० ते ₹१,५३,१४० दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दर प्रति औंस सुमारे $४,७१४ ते $४,७१९ होता.

आज रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सोन्याचा दर मेच्या तुलनेत खूपच घसरला आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ₹१,२५,०८० आहे. १० मे २०२६ च्या तुलनेत आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम सुमारे ₹२७,००० ते ₹२९,००० ने स्वस्त झाले आहे. मोदींच्या आवाहनाला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नोव्हेंबर २०२६ मधील अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात सोन्याची खरेदी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या काळात भारतातील एकूण सोन्याची मागणी गेल्या वर्षीच्या २२९.८ टनांवरून २९ टक्क्यांनी घसरून १६२.५ टनांवर आली. दागिन्यांच्या मागणीत २० टक्के, तर सोन्याची नाणी आणि बार (गुंतवणूक) यांच्या खरेदीत ४० टक्क्यांची घट झाली आहे. सोन्याची निव्वळ आयात ४६ टक्क्यांनी कमी झाली आहे. संपूर्ण २०२६ या वर्षात भारतातील सोन्याची मागणी गेल्या ६ वर्षांतील नीचांकी पातळीवर म्हणजे सुमारे ६२५-६७५ टन राहण्याचा अंदाज आहे.

ज्यांनी गुंतवणूक म्हणून महागड्या दराने सोने विकत घेतले त्यांना घाम फुटला आहे. मजबूत झालेला डॉलर आणि बाँड मार्केटमधील आकर्षक व्याजदर ही सोन्याच्या घसरणीमागे असलेली कारणे सांगितली जातात. अमेरिकेने जारी केलेले बाँड म्हणजे अमेरिकेने व्याजाने घेतलेले कर्ज आहे. कर्जाचा हा डोंगर वाढत चालला आहे. व्याज फेडण्यासाठी नोटा छापाव्या लागताहेत. नोटा छपाईमुळे एक दिवस चलनाचा पूर येईल. डॉलर कोसळेल, त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्याकडे पाहतील, सोन्याची मागणी वाढेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत. ब्रोकरेज फर्म जेफ्रीजचे जागतिक इक्विटी स्ट्रॅटेजी प्रमुख ख्रिस्तोफर वुड यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी ही भविष्यवाणी केली होती.

त्यांनी हा आकडा २०२६ साठीचे तात्काळ उद्दिष्ट म्हणून दिलेला नाही, तर दीर्घकालीन अंदाज म्हणून मांडला आहे. अमेरिकेची खराब वित्तीय स्थिती, वाढते कर्ज आणि भविष्यात व्याजदर नियंत्रित ठेवण्यासाठी अमेरिकेला बाँड यिल्ड्सवर नियंत्रण आणावे लागल्यास डॉलर कमकुवत होईल आणि दीर्घकाळात सोने $१०,००० प्रति औंसपर्यंत जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले होते. बाँड यिल्डवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकी सरकारला बाजारातून बाँडची फेरखरेदी करावी लागेल. त्यासाठी डॉलर छापावे लागतील. बाजारात डॉलरचा पुरवठा वाढेल आणि त्यामुळे डॉलरची किंमत कोसळेल, असा या भाकीताचा अर्थ आहे.

नोव्हेंबर २०२६ मधील प्रमुख जागतिक बँका आणि बाजार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या ६ महिन्यांत (मे २०२७ पर्यंत) सोन्याच्या किमतीत सुरुवातीला चढ-उतार राहून नंतर हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. गोल्डमन सॅक्स, जे.पी. मॉर्गन, सिटी बँक आणि बँक ऑफ अमेरिकाने सोन्याच्या दराचे जे भाकीत केले आहे, त्यानुसार २०२७ च्या मध्यापर्यंत किंवा अखेरीपर्यंत सोन्याचे दर प्रति औंस $४८०० ते $५००० प्रति औंस राहतील.

विश्लेषकांच्या मते, सध्या भारतीय बाजारात सोन्यावर मंदीचे सावट असून ₹१,२१,७०० ते ₹१,२५,००० च्या आसपास महत्त्वाचे स्तर आहेत. अमेरिकन व्याजदर वाढीचा दबाव कायम राहिल्यास नजीकच्या काळात दर दबावाखाली राहू शकतात, मात्र २०२७ च्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा सुधारणा झाल्यास देशांतर्गत दरही सावरू शकतात.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा