युक्रेनने दोन रशियन हवाई तळांवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनने केलेल्या या हल्ल्याची पुष्टी एका रशियन अधिकाऱ्यानेही केली आहे. या हल्ल्यात किमान ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या ठिकाणाहून धुराचे लोट उठताना दिसत आहेत आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या काळात ४० हून अधिक रशियन विमाने नष्ट झाल्याचा दावा युक्रेनियन माध्यमांनी केला आहे.
रशियाच्या इर्कुत्स्क प्रदेशाच्या गव्हर्नरने सायबेरियातील पहिल्या ड्रोन हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, लष्करी तुकडीला लक्ष्य करण्यात आले होते. या धोक्याचा सामना करण्यासाठी लष्कर आणि नागरी कृती दल आधीच तैनात आहेत. ड्रोन लाँच साइट ब्लॉक करण्यात आली आहे.
द सनच्या वृत्तानुसार, युक्रेनने दोन प्रमुख रशियन हवाई तळांवर मोठा ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये ४० हून अधिक रशियन लष्करी विमाने नष्ट झाली आहेत. युक्रेनियन सुरक्षा सेवेच्या (एसबीयू) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले रशियाच्या ‘ओलेन्या हवाई तळावर’ आणि ‘बेलाया हवाई तळावर’ करण्यात आले. नष्ट झालेल्या विमानांमध्ये Tu-९५ आणि Tu-२२M३ बॉम्बर्सचा समावेश आहे. या हल्ल्यात नष्ट झालेल्या लढाऊ विमानांमध्ये A-५० हवाई पूर्वसूचना देणाऱ्या विमानाचाही समावेश आहे.
हे ही वाचा :
शर्मिष्ठा पानोलीच्या अटकेवरून पवन कल्याण, कंगनाचा संताप
अब्बास अन्सारींनी आमदारकी गमावली, पोट निवडणुक होणार?
राऊत यांच्यासारखा वेडा इसम काय बोलतो याकडे कशाला लक्ष द्यायचे?
दरम्यान, युक्रेनने रशियाच्या आण्विक पाणबुडी बंदरावरही मोठा हल्ला केल्याची माहिती येत आहे. परदेशी माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की, युक्रेनने रशियन तळाजवळील ट्रक कंटेनरमधून हा मोठा ड्रोन हल्ला केला. याचा एक व्हिडिओ माध्यमांमध्येही दाखवला जात आहे, ज्यामध्ये कंटेनरमधून ड्रोन बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान, रशियन सैन्याने युक्रेनियन शहरांमध्ये ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडल्यानंतर एका आठवड्यात ही घटना घडली.







