इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजून संपलेले नसून दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूचं आहेत. अशातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी म्हटले की, इस्रायलने कदाचित हमास नेता मोहम्मद सिनवार याला ठार केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण गाझा येथील एका रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात सिनवारला लक्ष्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मोहम्मद सिनवार याला ठार केल्याचा दावा केला असला तरी हमासने मात्र त्याच्या मृत्यूची पुष्टी अद्याप केलेली नाही. मोहम्मद सिनवार याचा भाऊ याह्या सिनवार याची हत्या इस्रायली सैन्याने केली होती. त्यानंतर मोहम्मद याने हमासचे नेतृत्व स्वीकारले होते. जेरुसलेममध्ये पाच महिन्यांत पहिल्यांदाच झालेल्या पत्रकार परिषदेत नेतान्याहू म्हणाले की, “आम्ही हजारो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. देइफ, हनिया, याह्या सिनवार यांसारख्या हमास नेत्यांचा खात्मा केला आणि असे दिसते की मोहम्मद सिनवारचाही खात्मा केला आहे. आमचे सैन्य गाझामधील अधिकाधिक प्रदेश ताब्यात घेत आहे. लवकरच पट्टीतील सर्व भाग इस्रायली सुरक्षा नियंत्रणाखाली असतील,” असा विश्वास नेतान्याहू यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
किरीट सोमय्यांना धमकी देणारा युसुफ अन्सारी तडीपार
पाकच्या मदतीने चीनचा नवा डाव; CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार
ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी
दक्षिण कोरिया: ली यांनी माजी राष्ट्रपती यून यांच्यावर का साधला निशाणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आखाती भेटींमध्ये इस्रायलला वगळण्यात आल्यानंतर अमेरिकन प्रशासनाशी मतभेद झाल्याच्या अटकळी नेतान्याहू यांनी फेटाळून लावल्या. दरम्यान, इस्रायलच्या लष्कराने सांगितले की त्यांनी गाझा पट्टीत पीठ, बाळांचे अन्न आणि वैद्यकीय उपकरणे वाहून नेणाऱ्या १०० मदत सामान वाहून नेणाऱ्या ट्रक्सना परवानगी दिली आहे. तसेच नेतान्याहू म्हणाले की, बंधकांना परत आणण्यासाठी इस्रायल तात्पुरत्या युद्धबंदीसाठी तयार असेल. अन्यथा गाझावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करी मोहीम सुरू ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.







