पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत पोस्टल आणि पार्सल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवांची देवाणघेवाण तात्काळ बंद करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय हवाई आणि जमीन दोन्ही मार्गांसाठी लागू असणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. याचं पार्श्वभूमीवर भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. तणाव वाढल्यानंतर भारताकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवांची देवाणघेवाण तात्काळ बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील टपाल सेवांची देवाणघेवाण बऱ्याच काळापासून मर्यादित पातळीवर सुरू होती. तथापि, ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर, पाकिस्तानने काही काळासाठी टपाल सेवा बंद केल्या, ज्या नंतर तीन महिन्यांनंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या. परंतु आता, भारत सरकारने सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून सर्व टपाल आणि पार्सल सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातल्यानंतर काही तासांतच हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आणि भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानातील बंदरांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे.
हे ही वाचा..
भारतीय बंदरांवर पाकिस्तानी झेंडाधारी जहाजांना ‘नो एन्ट्री’
इस्लामाबादच्या आर्थिक कणा मोडण्याचे नियोजन
भारताला आयती संधी, पाकिस्तानच्या आयातीवर बंदी
संभलमधील सीओ अनुज चौधरी यांची बदली
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडण्याच्या दृष्टीने भारताने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. पाकिस्तानमधून थेट आयात कमी असली तरी, काही वस्तू अप्रत्यक्ष मार्गांनी किंवा तिसऱ्या देशांद्वारे देशात येत होत्या. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, परराष्ट्र व्यापार धोरणात (FTP) नव्याने जोडलेल्या तरतुदीमध्ये “पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमध्ये उद्भवणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूकीवर तात्काळ बंदी” घालण्याचा उल्लेख आहे.







