अमेरिकेने इराणमधील आण्विक केंद्रांवर हवाई हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव अधिकच वाढला आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने रविवारी सकाळी इस्रायलवर ३० पेक्षा अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायली डिफेन्स फोर्सेस (IDF) यांनी याची पुष्टी केली असून या हल्ल्यात १६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
इराणकडून तेल अवीव, हायफा, यरुशलेम या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले. सेंट्रल इस्रायलमध्ये मोठमोठे स्फोट झाल्याचे स्थानिक माध्यमांनी कळवले आहे. IDF च्या डिफेन्स यंत्रणांनी काही क्षेपणास्त्रांना आकाशातच निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही !
अतुल भातखळकरांचा कांदिवलीत योगाभ्यास!
अचूक हल्ल्यात कुद्स फोर्सचे दोन वरिष्ठ कमांडर ठार
केंद्र सरकारने सुरु केले नाविन्यपूर्ण ‘स्टार्टअप चॅलेंज’
उपचार सुरू
१६ पेक्षा अधिक नागरिक जखमी, त्यात दोन लहान मुलांचा समावेश असून या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत. तेल अवीवमधील इचिलोव्ह मेडिकल सेंटर येथे उपचार सुरू. आपत्कालीन सेवा आणि सिव्हिल डिफेन्स टीम्स सतर्क आहेत.
अमेरिकेची भूमिका काय?
भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे 4:30 वाजता, अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या न्यूक्लियर साईट्स वर हवाई हल्ला केला. हे हल्ले फोऱ्डो (Fordow), नतांज (Natanz), इस्फाहान (Isfahan) या ठिकाणी करण्यात आले. या हल्ल्यानंतरच इराणकडून इस्रायलवर हा प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.
सावधगिरीचा इशारा
यरुशलेम, तेल अवीव, हायफा यांसारख्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याचा सायरन वाजवण्यात आला आहे. IDF ने नागरिकांना हल्ल्याचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर न करण्याची विनंती केली आहे. जरी जॉर्डनवर थेट हल्ला झालेला नाही, तरी सावधगिरीच्या दृष्टिकोनातून तेथेही सरकारी कार्यालयांत सायरन वाजवण्यात आले आहेत.
या घडामोडीमुळे पश्चिम आशियात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या आणि इराणच्या संघर्षाचा प्रत्यक्ष परिणाम इस्रायल व त्याच्या शेजारील देशांवर दिसून येत आहे. आता इस्रायल या हल्ल्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो आणि यामुळे मध्य पूर्वेत युद्धसदृश परिस्थिती उद्भवते का, याकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे.
