पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनवर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही बलुच बंडखोरांनी या ट्रेनचे अपहरण करून पाकिस्तान सरकारला वेठीस धरले होते. आता पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसला लक्ष्य करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टाला जाणाऱ्या ट्रेनला सुलतानकोट भागात लक्ष्य करण्यात आले. हे शहर सिंध आणि बलुचिस्तानच्या सीमेवर आहे. ट्रेनवरील हल्ला आयईडी स्फोट वापरून करण्यात आला असून स्फोट झाला तेव्हा ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. बॉम्बस्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसमध्ये झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी पाकिस्तानातील सिंध-बलुचिस्तान सीमेजवळ असलेल्या सुलतानकोट परिसरात क्वेट्टाला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसला लक्ष्य करण्यात आले. रुळांवर लावलेल्या एका इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IED) मुळे हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे क्वेट्टाला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले.
बलुच बंडखोर गट, बलुच रिपब्लिक गार्ड्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून पाकिस्तानी सैन्याचे जवान ट्रेनमधून प्रवास करत असल्याने हा हल्ला करण्यात आल्याचा दावा केला आहे. “पाकिस्तानी सैन्याचे जवान प्रवास करत असताना ट्रेनवर हल्ला करण्यात आला. स्फोटात अनेक सैनिक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले आणि ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले,” असे बलुच रिपब्लिकन गार्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, बीआरजी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारते आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यापर्यंत अशा कारवाया सुरू राहतील असे जाहीर करते.
हे ही वाचा :
केस कापणाऱ्या जावेद हबीबने अनेकांचे खिसे कापले, २० गुन्हे दाखल
सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील म्हणाला- ”कोणताही पश्चाताप नाही”
“७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर सर्वांना वाटले इस्रायल संपला पण…” काय म्हणाले नेतान्याहू?
उत्तराखंडमध्ये मदरसा बोर्ड रद्द, राज्यात अल्पसंख्याक शिक्षण कायदा लागू होणार: राज्यपालांची मंजुरी!
सध्या बचाव पथके आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे. क्वेटा आणि पेशावर दरम्यान धावणाऱ्या जाफर एक्सप्रेसला अलिकडच्या काही महिन्यांत वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे. यापूर्वी झालेला मार्चमधील हल्ला हा सर्वात भीषण होता. ११ मार्च रोजी बोलन परिसरात क्वेटाहून पेशावरला जात असताना जाफर एक्सप्रेसचे अपहरण करण्यात आले होते, ज्यामध्ये २१ प्रवासी आणि चार सुरक्षा कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. यापूर्वीही या एक्सप्रेसवर वारंवार हल्ले झाले आहेत.







