फ्रान्समध्ये ‘जून’ ठरला ८० वर्षातील सर्वात उष्ण महिना

भीषण हीटवेव्हमुळे दोन हजारांहून अधिक मृत्यू

फ्रान्समध्ये ‘जून’ ठरला ८० वर्षातील सर्वात उष्ण महिना

फ्रान्समध्ये यंदाचा जून महिना गेल्या जवळपास आठ दशकांतील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. १९४७ पासून तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रथमच जून महिन्यात सरासरी तापमान इतक्या उच्च पातळीवर पोहोचल्याची माहिती फ्रान्सच्या हवामान विभाग मेटेओ-फ्रान्सने आपल्या मासिक अहवालात दिली आहे.

अहवालानुसार, जून २०२६ मध्ये देशाचे सरासरी तापमान २२.७ अंश सेल्सियस नोंदवले गेले. हे तापमान १९९१ ते २०२० या कालावधीतील सरासरीपेक्षा ३.८ अंश सेल्सियसने अधिक आहे. यापूर्वी जून २००३ हा सर्वाधिक उष्ण महिना मानला जात होता. मात्र, यंदाच्या जूनने तो विक्रमही मागे टाकला. १७ जूनपासून सुरू झालेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने २२ ते २६ जूनदरम्यान संपूर्ण फ्रान्सला झळा बसल्या. विशेषतः २४ आणि २५ जून हे दिवस देशाच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरले. १९४७ नंतर प्रथमच फ्रान्सचे २४ तासांचे सरासरी तापमान ३० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. ही उष्णतेची लाट ३० जूनपर्यंत कायम राहिली.

अत्यंत तीव्र उष्णतेमुळे फ्रान्समधील ७२ प्रशासकीय विभागांमध्ये ‘रेड हीटवेव्ह अलर्ट’ जारी करण्यात आला. २००४ मध्ये हीटवेव्ह अलर्ट प्रणाली सुरू झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेड अलर्ट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मेटेओ-फ्रान्सने स्पष्ट केले. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, २२ ते २८ जून या कालावधीत देशात २,०२५ अतिरिक्त मृत्यू नोंदवले गेले. हा आकडा मागील आठवड्याच्या तुलनेत २९.१ टक्के अधिक आहे.

हे ही वाचा:

पावसाने जोर धरताच मुंबईच्या जलाशयांना दिलासा

पूर्व युक्रेनमधील कोस्तांतिनोवकावर रशियाचा ताबा

“ही खऱ्या बंधुत्वाची भावना”; व्हेनेझुएलाकडून भारताचे आभार

ग्रूमिंग गँगचा म्होरक्या शब्बीरसाठी ब्रिटनचा पाकिस्तानवर दबाव

सध्या उपलब्ध आकडेवारी इलेक्ट्रॉनिक मृत्यू प्रमाणपत्रांवर आधारित असून ती देशातील सुमारे ६० टक्के मृत्यूंचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये मृत्यूंची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून आले. या वयोगटात २,००१ अतिरिक्त मृत्यू नोंदवले गेले, जे मागील आठवड्याच्या तुलनेत २९.७ टक्क्यांनी अधिक आहेत. मृत्यूंच्या ठिकाणांमध्येही मोठी वाढ दिसून आली. घरांमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये ९१ टक्के, वृद्धाश्रमांमध्ये ३७ टक्के, तर रुग्णालये आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये १९.७ टक्के वाढ झाली.

Exit mobile version