पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून, बुधवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी खैबर पख्तूनख्वा येथील एका दुर्गम वायव्य भागातून संघर्षाच्या ताज्या घटना समोर आल्या आहेत. पाकिस्तानमधील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्याने “विनाकारण गोळीबार” केला, ज्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. पाक सैन्याने अफगाण लष्करी चौक्यांवर आणि टँकांवर कारवाई करून त्यांना नुकसान केल्याचे वृत्त आहे.
असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला माहिती देताना, नाव न सांगण्याच्या अटीवर दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर गोळीबारात अफगाण सैन्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने कुर्रममध्ये विनाकारण गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने पूर्ण ताकदीने आणि तीव्रतेने प्रत्युत्तर दिले,” असे सरकारी प्रसारक पीटीव्ही न्यूजने एक्सवरील सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले.
डॉनच्या वृत्तानुसार, तालिबान राजवटीच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले आणि एका टँकला आग लागली, ज्यामुळे तालिबानी सैनिक त्यांच्या ठिकाणाहून पळून गेले. नंतरच्या वृत्तात असेही म्हटले आहे की, “कुर्रम सेक्टरमध्ये अफगाण तालिबानची आणखी एक पोस्ट आणि टँकची जागा नष्ट करण्यात आली.”
अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील उपपोलिस प्रवक्ते ताहिर अहरार यांनी चकमकींना दुजोरा दिला परंतु अधिक माहिती दिली नाही. दरम्यान, या आठवड्यात दोन्ही बाजूंनी त्यांच्या दीर्घ सामायिक सीमेवर गोळीबार होण्याची ही दुसरी वेळ आहे.
पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे की अफगाण सैन्य आणि पाकिस्तानी तालिबान यांनी संयुक्तपणे पाकिस्तानी चौकीवर “कोणत्याही चिथावणीशिवाय” गोळीबार केला, ज्यामुळे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने त्याला “जोरदार प्रत्युत्तर” दिले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की पाकिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानी तालिबानचा एक विस्तीर्ण प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केला.
हे ही वाचा :
दिल्लीकरांनो हरित फटाकेच फोडा!
अंदमान निकोबार बेटे आता आंतरराष्ट्रीय इंटरनेट डेटा ट्रान्सफरचे मुख्य केंद्र
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडलं!
भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर सातव्यांदा निवड
दरम्यान, शनिवारी दोन्ही बाजूंनी अनेक सीमावर्ती भागात गोळीबार झाला आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी डझनभर लोकांचा मृत्यू झाला. सौदी अरेबिया आणि कतारच्या आवाहनानंतर रविवारी संघर्ष थांबला असला तरी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सर्व सीमा क्रॉसिंग अजूनही बंद आहेत.
काबूलने सांगितले की त्यांनी अफगाणिस्तानच्या हद्दीचे आणि हवाई क्षेत्राचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल प्रत्युत्तर म्हणून अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांना लक्ष केले आणि ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. दुसरीकडे मात्र पाकिस्तानच्या लष्कराने कमी आकडेवारी सांगितली. त्यांनी म्हटले की त्यांनी सीमेवर प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात २३ सैनिक गमावले आणि २०० हून अधिक “तालिबान आणि संबंधित दहशतवादी” मारले.
Pak-Afghan Border Update 🚨
Tank position and Afghan Taliban post destroyed in shurku sector Kurram. pic.twitter.com/vmtmQrQt5T— Pakistan Army 🇵🇰 (@PakArmyc) October 14, 2025







