गडचिरोलीत माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी सदस्य आणि वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले. एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यासह नक्षलवाद्यांनी केलेल्या आत्मसमर्पणामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या उपस्थितीत हा आत्मसमर्पण कार्यक्रम बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोलीत पार पडला.
भूपती उर्फ सोनू याने आपल्या ६० नक्षली साथीदारांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले. यावेळी शरणागती पत्करणारे माओवादी यांनी त्यांची शस्त्रे मुख्यमंत्र्यांना सोपवली आणि मुख्यमंत्री यांनी त्यांना संविधानाची प्रत सुपर्द केली. भूपतीवर विविध राज्यात मिळून तब्बल दहा कोटींहून अधिक बक्षीस होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “भविष्यात आणखी काही नक्षलवादी आत्मसमर्पण करतील.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सातत्याने नक्षलवादाशी लढणारा गडचिरोली जिल्हा, सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, भंडारा, गोंदीया हा भाग देखील नक्षलवादाने ग्रस्त होता. विषेशतः गडचिरोली जिल्हा हा सीमावर्ती भाग आहे. हा सर्व भाग मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला. माओवादी सक्रिय झाले आणि येथील युवकांमध्ये व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला. भारतीय संविधानाने आपल्याला न्याय मिळू शकत नाही, असा संभ्रम तेव्हा येथील युवकांमध्ये निर्माण केला गेला, तसेच जंगलातून आपण राज्य चालवून एक नवी व्यवस्था उभी करू अशा प्रकारचं स्वप्न त्यावेळी तरुणांना दाखवलं गेलं. त्यावेळी अनेक तरुण या स्वप्नाला बळी पडले. त्या काळात अनेक तरुण माओवादी चळवळीकडे वळले. मात्र, त्यानंतर संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
दिल्लीकरांनो हरित फटाकेच फोडा!
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडलं!
भारत-मंगोलिया राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा साजरा
जैसलमेर बसला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांना शोक व्यक्त!
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात योजना आखण्यात आली. त्यामध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे शस्त्र घेऊन हिंसाचार करतात त्यांच्यासमोर दोनच विकल्प ठेवायचे. एकतर शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात या किंवा पोलीस कारवाईला सामोरं जा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर धोरण सुरू केले, ज्यामुळे देशभरातून नक्षलवादाचा नायनाट होताना दिसत आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.







