उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडलं आहे. त्यामुळे आता इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्री पदाची धुरा देण्यात आली आहे. बाबासाहेब पाटील यांनी प्रामुख्याने तब्येतीच्या कारणास्तव आपले पालकमंत्री पद सोडत असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले आहे. तब्येतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली. त्यानंतर आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे पालकमंत्री असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असून त्यांना लांबचा प्रवास करणे शक्य होत नाही असं कारण त्यांनी दिलं आहे.
हे ही वाचा :
भारत-मंगोलिया राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा साजरा
जैसलमेर बसला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांना शोक व्यक्त!
दिवंगत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक झाल्यानंतरच अंत्यसंस्कार करू!
गोपनीय कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले एशले टेलिस कोण आहेत?
बाबासाहेब पाटील यांनी प्रकृतीचे कारण दिलेले असले तरी राजकीय वर्तुळात चर्चेला हवा मिळाली आहे. नुकताच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला होता. मेळाव्यामध्ये भाषण करताना खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्री योग्य वेळ देत नाहीत, अशी खंत बोलून दाखवली होती. केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टसाठी येतात. इतर वेळी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत असं म्हणत टीका केली होती. त्याचबरोबर तेथील पदाधिकारी आणि नेते आहेत त्यांना सोबत घेत नाहीत अशी टीका केली होती. त्यामुळेच बाबासाहेब पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.







