तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सुरुवातीला त्यांच्या बहुचर्चित शपथविधी समारंभाची वेळ १० मे रोजी दुपारी पावणेचार वाजता निश्चित केली होती. मात्र नंतर त्यांच्या वैयक्तिक ज्योतिषी राधन पंडित वेत्रिवेल यांच्या सल्ल्यानुसार “शुभ मुहूर्त” पाहून वेळ बदलून सकाळी १० वाजता करण्यात आली. विजय यांच्या राजकीय प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर वेत्रीवेल मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले जाते.
आता विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर वेत्रीवेल यांचेही नशीब उजळले आहे. त्यांची तमिळनाडू सरकारमध्ये “ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी” (राजकीय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर झाली.
तमिळनाडूमधील प्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळख असलेल्या वेत्रीवेल यांनी निवडणुकांपूर्वीच विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. फक्त विजयच नव्हे तर जे. जयललिता यांच्यासह अनेक मोठे राजकारणी वेत्रीवेल यांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावत असत, असे म्हटले जाते. टीव्हीकेच्या विजयाच्या वेळी विजय यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वप्रथम पोहोचणाऱ्यांमध्येही वेत्रीवेल होते.
हे ही वाचा:
श्रीनगरमध्ये ‘लष्कर’ची पोस्टर्स, शस्त्रे, दारुगोळ्यासह दोन जण अटकेत
अमेरिका–इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी
जोसेफ विजय यांचा दारू दुकानांवर प्रहार
हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
गेल्या चार दशकांपासून ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेत्रीवेल यांनी अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगितले आहे. मात्र त्यांनी स्वतःच्या राजकारणातील प्रवेशाची भविष्यवाणी केली होती का, हे अद्याप स्पष्ट नाही. तमिळनाडूच्या राजकारणाचे निरीक्षक सांगतात की, जयललिता अनेक मोठे निर्णय वेत्रीवेल यांच्याशी सल्लामसलत करून घेत असत. ते सोशल मीडियावरूनही लोकांना ज्योतिष सल्ला देतात.
प्रदीप गुप्ता आणि त्यांच्या ऍक्सिस माय इंडिया टीमने टीव्हीकेला १०८ ते १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र विजय मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणी इतक्या आधी कुणीच केली नव्हती. वेत्रीवेल यांनी विजय यांची कुंडली पाहिल्यानंतर त्यांच्यात “सुनामीसारखी राजकीय ताकद” असल्याचे म्हटले होते.
“पंडित वेत्रीवेल” म्हणून ओळखले जाणारे वेत्रीवेल यांनी २००८ मध्ये दिल्लीला गेल्यानंतर आपले नाव बदलून “राधन पंडित” केले. दिल्लीमध्ये त्यांनी भाजपा आणि काँग्रेसमधील नेत्यांपर्यंतही आपला प्रभाव वाढवला असल्याचे सांगितले जाते.
टीव्हीकेने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी १०८ जागा जिंकत जोरदार कामगिरी केली. विजय बहुमतापासून थोडे दूर राहिले, मात्र काँग्रेस आणि व्हीसीकेसह अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.







