सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिल्लीकरांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीनिमित्त दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रीन क्रॅकर्स (हरित फटाके) फोडण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाने दिवाळीत फटाक्यांच्या विक्री आणि वापराला काही अटींसह मान्यता दिली आहे. दिल्ली सरकारने ग्रीन क्रॅकर्सला मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भारताचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, केवळ राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) आणि पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (पीईएसओ) द्वारे प्रमाणित केलेल्या ग्रीन क्रॅकर्सला परवानगी असेल. न्यायालयाने म्हटले आहे की, ग्रीन क्रॅकर्सला मान्यता देताना संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे, पर्यावरणाशी तडजोड न करता फटाक्यांना परवानगी आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याची वेळ मर्यादा निश्चित केली आहे. दिवाळीत सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत फटाके फोडता येतील तर, रात्री ८ ते १० वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, बाहेरून दिल्ली- एनसीआरमध्ये फटाके आणता येणार नाहीत. न्यायालयाने असे नमूद केले की, हे फटाके दिल्ली-एनसीआरमध्ये तस्करी करून आणले जातात आणि ग्रीन क्रॅकर्सपेक्षा जास्त नुकसान करतात. शिवाय बनावट ग्रीन क्रॅकर्स आढळले तर परवाना निलंबित करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांवर नियमित तपासणी करण्यासाठी पोलिसांना गस्त पथके स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
हे ही वाचा :
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडलं!
भारत-मंगोलिया राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा साजरा
जैसलमेर बसला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांना शोक व्यक्त!
दिवंगत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक झाल्यानंतरच अंत्यसंस्कार करू!
सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) १८ ऑक्टोबरपासून दिवाळीपर्यंत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचे निरीक्षण करेल. तसेच CPCB आणि इतर NCR प्रदूषण नियंत्रण मंडळांना २० ऑक्टोबरनंतर त्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या वर्षी जुलैमध्ये, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) शहरातील सततच्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर, विशेषतः दिवाळीनंतर, उपाय म्हणून राजधानी प्रदेशात सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक, विक्री आणि फोडण्यावर वर्षभर बंदी घालण्याची बंदी घातली होती.







