फ्रान्समधील एव्हियन येथे जी-७ शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तब्बल सोळा महिन्यांनंतर द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत व्यापार, ऊर्जा, संरक्षण, व्हिसा धोरण आणि जागतिक घडामोडींवर चर्चा झाली. मात्र, पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, भारतीय नाविकांची सुरक्षा आणि होर्मुझ सामुद्रधुनीचे वाढते महत्त्व हे चर्चेचे प्रमुख विषय ठरले. अमेरिका आणि भारतात ट्रेड डील होणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले.
बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतीय नागरिक आणि भारतीय नाविकांवर निर्माण झालेल्या धोक्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. समुद्री व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर काम करणाऱ्या नाविकांचे संरक्षण सुनिश्चित करणे ही जागतिक समुदायाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
होर्मुझ खुला, तेलवाहतूक पुन्हा सुरू
ऑपरेशन टायगर यशस्वी; ठाकरे गटाला मोठा धक्का
ई-रिक्शा आणि ट्रॅक्टरच्या भीषण धडकेत सहा महिलांचा मृत्यू
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत बोलताना मोदी यांनी ट्रम्प यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. होर्मुझ मार्गावरील कोणताही अडथळा जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि अर्थव्यवस्थेसाठी गंभीर परिणाम घडवू शकतो, असे त्यांनी सांगितले. “होर्मुझबाबत आमची आणि तुमची चिंता एकच आहे. होर्मुझ खुले राहणे जगासाठी अत्यावश्यक आहे. हा मार्ग सुरळीत सुरू राहिल्यास जागतिक व्यापाराला गती मिळेल आणि अनेक देशांना दिलासा मिळेल,” असे मोदी यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले.
यावेळी ट्रम्प यांनीही मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी मोदींची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी हे शांत, मजबूत आणि प्रभावी नेतृत्व करणारे नेते असल्याचे सांगत ट्रम्प यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचाही उल्लेख केला.
जी-७ परिषदेत आपल्या भाषणात मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्षामुळे अनेक देशांमध्ये जीवित आणि वित्तहानी झाल्याचे सांगितले. या परिस्थितीत समुद्री मार्गांची सुरक्षा, नाविकांचे संरक्षण आणि जागतिक पुरवठा साखळी अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संवाद, संयम आणि राजनैतिक तोडग्यांच्या माध्यमातूनच या संकटावर मात करता येईल, असा संदेशही त्यांनी दिला.
मोदी-ट्रम्प भेटीमुळे भारत-अमेरिका संबंधांना नवी गती मिळण्याबरोबरच पश्चिम आशियातील शांतता, भारतीय नाविकांची सुरक्षा आणि जागतिक सागरी व्यापाराच्या सुरक्षेबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे मानले जात आहे.







