अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, “अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईमुळे इराणचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा ९० टक्के खात्मा झाला आहे” असे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर ही प्रतिक्रिया देताना इराणच्या नेतृत्वावर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी दावा केला की, इराणच्या लष्करी यंत्रणेवर झालेल्या हल्ल्यांमुळे तेथील कमांड स्ट्रक्चरला मोठा धक्का बसला असून अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाले आहेत. ट्रम्प यांच्या मते, अलीकडील हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा झाला आहे. त्यामुळे इराणची लष्करी निर्णयप्रक्रिया आणि युद्धक्षमता कमकुवत झाली आहे. त्यांनी या कारवाईला “मोठे यश” असे संबोधले. मात्र, अमेरिकेकडून किंवा इराणकडून या सर्व दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “Mojtaba Khamenei is 90% gone.” मात्र त्यांनी या वक्तव्याचा नेमका अर्थ स्पष्ट केलेला नाही. ते गंभीर जखमी असल्याचा दावा आहे की त्यांच्या राजकीय किंवा लष्करी प्रभावाचा संदर्भ आहे, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या वक्तव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सोमवारी इराणमधील लक्ष्यांवर आणखी एका टप्प्यात हवाई हल्ले पूर्ण केल्याची माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये कोणती ठिकाणे लक्ष्य करण्यात आली किंवा किती नुकसान झाले, याबाबत अधिकृत तपशील देण्यात आलेला नाही. मात्र अमेरिकेने इराणवरील लष्करी दबाव कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
हे ही वाचा:
४२ नरेंद्र मोदी स्टेडियमएवढी रेल्वेची जमीन अतिक्रमणाखाली
हॉर्मुझ सामुद्रधुनीत दोन तेलवाहू टँकर्सवर हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू
फ्रान्सच विश्वचषकाचा प्रबळ दावेदार
पुरुषांनी इंग्लंडमध्ये हात टेकले, महिलांनी घडवला इतिहास
हॉर्मुझ सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव अधिक वाढला आहे. अमेरिकेने इराणविरोधात लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत, तर इराणनेही आखाती देशांतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करून प्रत्युत्तर दिले आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक तेलबाजार आणि समुद्री वाहतुकीवरही होत आहे. दोन्ही देशांतील वाढत्या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. जागतिक महासत्तांकडून संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी प्रतिहल्ले आणि आक्रमक वक्तव्यांमुळे संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







