अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. इराणमधील एका सरकारसमर्थक वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या कथित ‘बदला यादी’त (Revenge List) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह एकूण १३ जागतिक नेत्यांची नावे प्रकाशित करण्यात आली आहेत. या घडामोडीमुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वृत्तानुसार, इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर त्यांचे उत्तराधिकारी मोजतबा खामेनेई यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक भूमिका मांडली. त्यानंतर तेहरानमधून प्रकाशित होणाऱ्या सरकारसमर्थक ‘हमशहरी’ या वृत्तपत्राने एक माहितीपट (इन्फोग्राफिक) प्रसिद्ध केला. त्यामध्ये अमेरिकन, इस्रायली आणि युरोपीय नेत्यांचे फोटो प्रकाशित करून त्यांना ‘बदला’ घेण्यासाठी लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही यादी इराण सरकारची अधिकृत भूमिका आहे की केवळ वृत्तपत्राची संपादकीय भूमिका, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या ग्राफिक मांडणीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कपाळावर स्नायपरच्या निशाण्यासारखी लक्ष्ये दर्शवलेली आहेत. त्यांच्या खाली नारंगी रंगाचा तुरुंगातील गणवेश घातलेले इतर ११ नेते दाखवले आहेत, ज्यात ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर ब्रेड कूपर, इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी, इस्रायलच्या संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ आयल झमीर आणि इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांचा समावेश आहे.
आपल्या निवेदनात मोजतबा खामेनी म्हणाले, “सूड घेणे ही आपल्या राष्ट्राची इच्छा आहे आणि तो अटळपणे घेतलाच पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “यादीत ज्यांची नावे आहेत ते गुन्हेगार, आपल्या बिछान्यात शांतपणे मृत्यू पावण्याची इच्छा घेऊनच आपल्यासोबत कबरेत जातील.”
ग्राफिक प्रसिद्ध होऊनही, या यादीला तेहरानने अधिकृतपणे मान्यता दिली असल्याचे कोणतेही संकेत नव्हते. शिवाय, आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या विशिष्ट व्यक्तींची नावे मोजतबा खामेनी यांनी उघड केली नाहीत. संघर्ष सुरू होण्यापूर्वीपासून उत्तराधिकारी सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत आणि २८ फेब्रुवारी रोजी अयातुल्ला अली खामेनी यांना ठार करणाऱ्या त्याच हल्ल्यात ते जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
वनडेत हिशोब चुकता करणार टीम इंडिया?
भारतीय सैन्यात मोठा बदल, ‘थिएटर कमांड’ युग सुरू
अभिषेक बॅनर्जींच्या ‘सेबाश्रय’ आरोग्य शिबिरात उपचारानंतर पाय गमावला; गुन्हा दाखल
पवारांना मागे टाकत देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम!
या घडामोडी अशा वेळी समोर आल्या आहेत, जेव्हा व्यापारी जहाजांवरील हल्ले, अमेरिकेचे इराणवरील हवाई हल्ले आणि त्यानंतर इराणकडून आखाती देशांतील अमेरिकन तळांवर करण्यात आलेले क्षेपणास्त्र हल्ले यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.







