पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (TLP) या कट्टर इस्लामिक संघटनेविरोधात पोलिसांनी मुरिदके येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, ज्यामुळे हिंसक चकमकी झाल्या असून अनेक आंदोलक जखमी झाले. लाहोरहून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व पक्षप्रमुख साद हुसेन रिजवी करत होते. यात आतापर्यंत तहरिकचे १० ते ११ कार्यकर्ते ठार झाल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला, तर पाकिस्तान रेंजर्सनीही हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी मात्र आरोप केला की, रेंजर्सनी प्रगत शस्त्रास्त्रांचा वापर केला. हा मोर्चा सरकारविरोधी, गाझा समर्थक आणि इस्रायलविरोधी मोहिमेचा भाग आहे. अनेक अडथळे असूनही, तहरिक कार्यकर्त्यांनी मुरिदके येथे छावण्या उभारल्या आहेत.
हे ही वाचा:
हमास हल्ल्यातून बचावलेल्या इस्रायली युवकाने स्वतःला घेतले पेटवून
‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ हा चुकीचा निर्णय
ठेकेदारीच्या पैशावरून वाद — हातगाडी चालकाचे अपहरण करून खून!
गुरुग्राममध्ये संयुक्त पथक-दोन शार्पशूटर यांच्यात चकमक
हिंसाचाराची तीव्रता वाढली
गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानातील पंजाबमध्ये तणाव वाढत होता. लाहोरमध्ये पोलिसांनी आंदोलकांना इस्लामाबादकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता, हिंसक संघर्ष उफाळून आला. तहरिकने दावा केला की, त्यांचे ११ कार्यकर्ते ठार आणि ५० हून अधिक जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, गोळीबाराचे आवाज ऐकू येतात आणि एक तहरीकचा एक कार्यकर्ता म्हणतो की, आज सकाळपासून आमचे ११ लोक शहीद झाले आहेत, सतत गोळाफेक आणि गोळीबार सुरू आहे.”
हे आंदोलन ९ ऑक्टोबरपासून गाझावरील इस्रायली हल्ल्यांच्या विरोधात सुरू झाले होते आणि ११ ऑक्टोबरनंतर अधिक तीव्र झाले. पोलिसांनी अश्रुधुर आणि लाठीचार्ज करून मोर्चा पांगवण्याचा प्रयत्न केला, तर आंदोलकांनी दगडफेक करून प्रतिकार केला. स्थानिक माध्यमांनुसार, डझनभर पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.
तहरिक प्रमुखांचा इशारा
मोर्चादरम्यान तहरिकचे प्रमुख साद हुसेन रिजवी म्हणाले, “अटक ही समस्या नाही, गोळ्या ही समस्या नाहीत, शेलही समस्या नाहीत. शहादत हेच आमचे भाग्य आहे.”
सरकारची प्रतिक्रिया
पाकिस्तानचे मंत्री तलाल चौधरी यांनी या हिंसाचाराचा निषेध करताना म्हटले, “तहरिक गाझा प्रश्नाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहे. सरकार कोणत्याही संघटनेला हिंसा आणि दबावाच्या मार्गाने काम करू देणार नाही.”
कायदा आणि सुव्यवस्था
दरम्यान, रावळपिंडी आणि इस्लामाबादमधील मोबाइल डेटा सेवा अंशतः पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
लाहोरमध्ये सरकार आणि तहरिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, साहीवाल विभागात तहरिकशी संबंधित सुमारे १७० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एमपीओ अंतर्गत कारवाई झाली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पोलिसांनी दोनदा आंदोलकांना मुरिदकेच्या पुढे जाण्यापासून रोखले. चार जिल्ह्यांतील मोठे पोलीस तुकडी तैनात करण्यात आल्या आहेत. तहरिक कार्यकर्ते शनिवारी मुरिदके येथे पोहोचले आणि बसून आंदोलन सुरू केले, त्याआधी प्रशासनाने मोठ्या खंदकांचे बांधकाम करून रस्ते बंद केले होते.
आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी
हा अस्थिरतेचा प्रसंग अशा वेळी उफाळला आहे जेव्हा इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझा शांतता कराराचा पहिला टप्पा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने अंतिम करण्यात येत आहे.







