‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर दारुण पराभव पत्करावा लागला आहे, असे मत पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ फेलो मायकेल रुबिन यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आणि भारताने केलेल्या लष्करी कारवाईचे कौतुक केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ज्या जलद आणि अचूक पद्धतीने दहशतवादी तळांवर हल्ला केला त्यामुळे जगाचे लक्ष पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्ककडे वळले आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड झाला, असे रुबिन म्हणाले.
भारताने पाकविरुद्धची लढाई राजनैतिक आणि लष्करी दोन्ही बाजूंनी जिंकली
रुबिन म्हणाले की, “भारताने ही लढाई राजनैतिक आणि लष्करी अशा दोन्ही बाजूंनी जिंकली आहे. भारत राजनैतिकदृष्ट्या जिंकण्याचे कारण म्हणजे आता संपूर्ण जगाचे लक्ष हे पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्यावर केंद्रित आहे. ७ मे रोजी, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मध्ये दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने थोड्या काळासाठी प्रत्युत्तर दिले, ज्याला भारताने पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला करून प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. शिवाय या कारवाईने पाकिस्तानच्या लष्कर आणि दहशतवादी गटांमधील संबंध उघड झाले,” असे रुबिन यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तानी अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते यावरून असे दिसून येते की दहशतवादी आणि आयएसआय किंवा पाकिस्तानी सशस्त्र दलाचा सदस्य यांच्यात कोणताही फरक नाही.
पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली होती
“लष्करीदृष्ट्या पाकिस्तानला धक्का बसला आहे. पाकिस्तान हे युद्ध कसा जिंकला आहे हे स्वतःला पटवून देत आहे. पण, पाकिस्तानला हे पटवून देणे खूप कठीण जाणार आहे की, त्याने हे चार दिवसांचे युद्ध जिंकले आहे,” असे रुबिन म्हणाले. पुढे त्यांनी कठोर शब्दात पाकिस्तानवर टीका करत म्हटले की, “चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तानची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली होती जो युद्धबंदीची याचना करण्यासाठी आपल्या पायांमध्ये शेपूट घालून धावत होता. पाकिस्तान आता हा पराभव कोणत्याही प्रकारे लपवू शकत नाही.”
हे ही वाचा:
शाहबाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधान मोदींची नक्कल; पसरूर लष्करी छावणीत सैनिकांची घेतली भेट
पुलवामामध्ये जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १० दहशतवादी ठार
तिथे बोरॉन आले, इथे बरनॉल येऊ दे…
लढाई भारतावर लादण्यात आली
रुबिन यांनी असेही स्पष्ट केले की, ही लढाई भारताने सुरू केलेली नाही, तर ती भारतावर लादण्यात आली आहे. प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. भारताने फक्त प्रत्युत्तर दिले, जे पूर्णपणे न्याय्य होते. भारताने स्पष्ट संदेश दिला की ते सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले कधीही सहन करणार नाहीत.







