पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, भारताचे एक बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहचले होते. पाकिस्तान सैन्याने त्यांना अटक केली होती. अखेर वीस दिवसांनंतर, पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना बुधवारी (१५ मे) भारताच्या स्वाधीन केले. शॉ हे सुखरूप मायदेशी परतले असले तरी पाकिस्तानमध्ये त्यांचा मानसिक छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने त्यांची आपबिती सांगितली आहे.
पूर्णम कुमार शॉ यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी डोळे बांधून ठेवले होते. तसेच त्यांना शिवीगाळ करण्यात आली, दात घासण्यास मज्जाव करण्यात आला होता आणि त्यांना झोपूही देण्यात आले नाही, अशी माहिती समोर आली आहे. शॉ यांना त्यांच्या सीमेवरील बीएसएफच्या तैनातींबद्दल विचारण्यात आले.
पूर्णम शॉ यांना पाकिस्तानी कोठडीत असताना तीन ठिकाणी नेण्यात आले. विमानांच्या उडण्याचा आवाज ऐकू यावा म्हणून एअरबेसजवळही नेण्यात आले, अशी माहिती आहे. जेव्हा पाकिस्तानी अधिकारी शॉ यांची चौकशी करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी बहुतेक नागरी कपडे घातले होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर नियुक्त असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. बहुतेक वेळा त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून वेगवेगळ्या ठिकाणी नेले जात असे. एका ठिकाणी त्याला तुरुंगातही ठेवण्यात आले होते.
पूर्णम शॉ हे १६ वर्षांपासून बीएसएफमध्ये आहेत. त्यांची नुकतीच फिरोजपूर येथे पोस्टिंग झाली होती. पाकिस्तानने १४ मे रोजी भारताचे बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या स्वाधीन केले. पाकिस्तानी रेंजर्सनी अटारी वाघा सीमेवरून बीएसएफ कॉन्स्टेबलला परत पाठवले. ते गेल्या वीस दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात होते. कॉन्स्टेबल पूर्णम कुमार काल सकाळी १०:३० वाजता देशात परतले.
हे ही वाचा:
“युद्धबंदीसाठी पाकिस्तान पायात शेपूट घालून धावत होता!”
शाहबाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधान मोदींची नक्कल; पसरूर लष्करी छावणीत सैनिकांची घेतली भेट
पुलवामामध्ये जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १० दहशतवादी ठार
पूर्णम कुमार हे चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहचले होते, त्यानंतर त्याला पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले. ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिल्याने तणाव वाढला होता. दोन्ही देशांमध्ये संघर्ष होता. अशा परिस्थितीत पूर्णम यांच्या कुटुंबाची चिंता आणखी वाढली होती.
