जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवार, १५ मे रोजी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही चकमक अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेर येथे झाली. या कारवाईत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाल्याची माहिती आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. ४८ तासांत खोऱ्यात दहशतवादी आणि सैन्य यांच्यातील ही दुसरी चकमक आहे. दोन दिवसांपूर्वीच शोपियानमध्ये एका मोठ्या कारवाईत लष्कराने लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले होते.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील नादिर गावात ही चकमक झाली. सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला असून या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सैन्यानेही कारवाई केली आणि चकमक सुरू झाली. लष्कराने जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून लष्कराचे शोध अभियान अजूनही सुरू आहे. या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वाणी आणि यावर अहमद भट अशी त्यांचे नावे आहेत. हे सर्व जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
यापूर्वी जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये मंगळवार, १३ मे रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले होते. केलर येथील शुक्रू वनक्षेत्रात ही चकमक घडली. तीनपैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे शाहिद कुट्टे आणि अदनान शफी दार असल्याचे सांगितले जात आहे. शाहिद हा लष्करचा ए ग्रेड दहशतवादी होता. त्यांच्याकडून AK-47 जप्त करण्यात आल्या आहेत. शाहिद कुट्टे आणि अदनान शफी हे दोघेही शोपियानचे रहिवासी आहेत.
हे ही वाचा:
मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १० दहशतवादी ठार
तिथे बोरॉन आले, इथे बरनॉल येऊ दे…
छत्तीसगढच्या करेगुट्टात ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!
तापसी पन्नूने कुठे वाटले वॉटर कूलिंग जग
२०२३ मध्ये लष्करात सामील झालेला कुट्टे गेल्या वर्षी ८ एप्रिल रोजी डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी होता, ज्यामध्ये दोन जर्मन पर्यटक आणि एक ड्रायव्हर जखमी झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात शोपियानमधील हीरपोरा येथे भाजपच्या सरपंचाच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. तर, २०२४ मध्ये दहशतवादी गटात सामील झालेला शफी शोपियानमधील वाची येथे एका स्थानिक नसलेल्या कामगाराच्या हत्येत सहभागी होता.
