भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला फटकारल्यापासून तेथील अंतर्गत परिस्थितीही बिघडू लागली आहे. दरम्यान, पाकिस्तानी राजकारणात दीर्घकाळ निर्वासित असलेले मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्यूएम) संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.
लंडनमध्ये जीवन जगत असलेल्या अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुहाजिरांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. मुहाजिर हे उर्दू भाषिक मुस्लिम आहेत जे भारतापासून फाळणीनंतर पाकिस्तानात, विशेषतः कराची शहरात स्थायिक झाले आहेत. एकेकाळी पाकिस्तानमध्ये सत्तेवर मजबूत पकड असलेल्या मुहाजिरांची स्थिती गेल्या अनेक दशकांपासून वाईट आहे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये भेदभाव आणि अत्याचाराचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तानमधील मुहाजिरांच्या स्थितीबद्दल बोलताना, अल्ताफ हुसेन यांनी लंडनमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना मुहाजिरांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. हुसेन म्हणाले, भारतापासून फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेले उर्दू भाषिक मुहाजिर पाकिस्तानी सैन्य आणि राज्य यंत्रणेकडून भेदभाव आणि हिंसाचाराचे बळी ठरत आहेत.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी बलुच लोकांच्या हक्कांना पाठींबा दिला आहे तर त्याचप्रमाणे मुहाजिर समुदायालाही असाच पाठींबा दाखवावा. हुसेन यांनी दावा केला कि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत २५,००० हून अधिक मुहाजिर तरुण मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेकांना लष्कराच्या कारवाईत लक्ष्य केले गेले होते. अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींना आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मुहाजिरांचा आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हुसेन यांच्या या विधानावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हे ही वाचा :
“मोदीजी, कृपया माझ्या वडिलांना शोधण्यास मदत करा”
पनामातील मंदिरात खासदार सर्फराज पोहोचले आणि…







