इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ७०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर आरसीबी थेट क्वालिफायर-१ मध्ये पोहोचली आहे, जिथे त्यांचा सामना २९ मे रोजी पंजाब किंग्सशी चंदीगडमध्ये होणार आहे.
या सामन्यात जितेश शर्माने ३३ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ८ चौकारांसह खेळलेली नाबाद ८५ धावांची खेळी आरसीबीच्या विजयाचा कणा ठरली. २२८ धावांचे लक्ष्य गाठताना ही खेळी निर्णायक ठरली – जी आयपीएल इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक यशस्वी रन-चेस ठरली.
या धमाकेदार खेळासाठी जितेशला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
पूर्व सनरायझर्स हैदराबाद प्रशिक्षक टॉम मूडी यांनी ESPNcricinfo वर बोलताना या खेळीला आयपीएल २०२५ ची सर्वश्रेष्ठ खेळी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं, “जितेशने ज्या प्रकारे दबावाखाली खेळ केला, तो एक अनुभवी आंतरराष्ट्रीय फलंदाज वाटत होता.”
भारताचे माजी फलंदाज अभिनव मुकुंद यांनीही जितेशच्या खेळीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, जरी काही क्षणांमध्ये नशिबाने साथ दिली (जसे की रनआऊटपासून बचाव, नो बॉलवर मिळालेली संधी), तरीही त्याने त्यातून शिकून जबरदस्त पुनरागमन केलं.
मुकुंद म्हणाले, “याच क्षणांसाठी आपण मिडल ऑर्डरमध्ये अशा खेळाडूंवर मोठी रक्कम खर्च करतो. आज जितेशने जे काही दाखवले, ते अव्वल क्रिकेट होतं.”
