मध्य- पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलने अमेरिकेला दिलेल्या नव्या गुप्तचर माहितीनुसार, इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा नवा कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे. या माहितीची अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा पडताळणी करत असून, व्हाइट हाऊस आणि संबंधित संस्थांनी ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत अतिरिक्त खबरदारी घेतल्याचे वृत्त आहे.
या वृत्तानुसार, इस्रायली गुप्तचर संस्थांना अलीकडेच काही माहिती मिळाली असून ती तातडीने अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्यात आली. या कथित कटाचा संबंध इराणच्या पूर्वीच्या सूडाच्या भूमिकेशी जोडला जात आहे. विशेषतः २०२० मध्ये इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांच्या अमेरिकन हवाई हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर ट्रम्प हे इराणच्या निशाण्यावर असल्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांचा दीर्घकाळापासून दावा आहे.
वृत्तांनुसार, इस्रायलकडून मिळालेली माहिती अमेरिकेने अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. मात्र, या कथित कटाची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. अमेरिकन सुरक्षा यंत्रणा गुप्तचर माहितीची पडताळणी करत असून, ट्रम्प यांच्या सुरक्षेत आवश्यक ती वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडील एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी स्वतःही इराणकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे संकेत दिले. त्यांनी इराणच्या नेतृत्वावर टीका करत, “ते मला संपवू इच्छितात,” असे विधान केल्याचे वृत्त आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे या नव्या गुप्तचर माहितीची अधिक चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडी अशा वेळी समोर आल्या आहेत, जेव्हा इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. अलीकडील लष्करी कारवाया, आखाती प्रदेशातील तणाव आणि अमेरिकेच्या भूमिकेमुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. अशा वातावरणात ट्रम्प यांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या कथित हत्येच्या कटाबाबत इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे इस्रायलने दिलेली गुप्तचर माहिती आणि अमेरिकन तपास यांचे निष्कर्ष काय येतात, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
तृणमूल सोडून भाजपमध्ये आलेल्या तीन खासदारांना राज्यसभेची उमेदवारी
IPOपूर्वी ऋतिक रोशनचा मोठी शेअर डील!
लेप्टोस्पायरोसिसपासून बचावासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ऍडव्हायझरी
रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्याला ‘हनीमून बेडरूम’चा लूक
अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत अत्यंत तणावपूर्ण राहिले आहेत. २०२० मध्ये कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणने सूड उगवण्याची भूमिका अनेकदा व्यक्त केली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्याविरोधात कथित कट रचल्याच्या आरोपांशी संबंधित अनेक तपास आणि गुन्हे दाखल झाले आहेत. या नव्या गुप्तचर माहितीकडे त्याच पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.







