बांगलादेशमध्ये गेल्यावर्षी पंतप्रधान हसीना शेख यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सध्या देशाचा कारभार पाहत आहे. एकीकडे देशात अस्थिरता असताना आता बांगलादेशमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहे. विशेषतः देशाचे संस्थापक शेख मुजीबुरहमान आणि त्यांची मुलगी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संबंधित सामग्री काढून टाकण्यात आली आहे. तसेच पुस्तकांमध्ये भारताशी संबंधित बदल देखील करण्यात आले आहेत. शेख हसीना यांच्याशी संबंधित सर्व चित्रे आणि प्रकरणे पुस्तकांमधून पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून शेख मुजीबुररहमान यांच्याशी संबंधित मजकूर देखील काढून टाकण्यात आला आहे किंवा लहान करण्यात आला आहे.
पाठ्यपुस्तकांमध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीत भारताची भूमिका असल्याची माहिती कायम ठेवली आहे. पण, माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुजी बुरहमान यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी, शेख हसीना यांचा विद्यार्थ्यांसाठीचा संदेश पुस्तकांच्या मागील भागात लिहिलेला होता. त्यात आता बदल करण्यात आले आहेत. जुलै २०२४ मध्ये हसिना यांच्याविरोधात सुरू झालेल्या बंडाशी संबंधित चित्रे मागील कव्हरवर ठेवण्यात आली आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बांगलादेशातील शिक्षण मंत्रालयाने ५७ तज्ञांची एक टीम तयार केली आहे. याच टीमने शालेय पुस्तकांमध्ये बदल केले आहेत. ही पुस्तके प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये वापरली जातात. या बदलानंतर, ४० कोटींहून अधिक नवीन पुस्तके छापण्यात आली आहेत.
हे ही वाचा :
अजमेर: स्पेशल टास्क फोर्सकडून बांगलादेशीला अटक, आतापर्यंत १७ जणांना अटक!
सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे कोण आहेत?
पाणी पिण्यासाठी आला आणि… ७२ तासांनंतर दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसस्क्या
सहावीच्या इंग्रजी पुस्तकातून शेख मुजीबुररहमान आणि तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे दोन फोटो काढून टाकण्यात आले आहेत. एका फोटोमध्ये शेख मुजीबुररहमान भाषण देत असून इंदिरा गांधी मंचावर उपस्थित आहेत. दुसरा फोटो १७ मार्च १९७२ चा असून शेख मुजीबुररहमान यांनी ढाका विमानतळावर इंदिरा गांधींचे स्वागत केले होते. शेख मुजीबुररहमान यांचे इतर प्रमुख जागतिक नेत्यांसोबतचे फोटोही पुस्तकांमधून काढून टाकण्यात आले आहेत.
शेख हसीना विरोधी निदर्शनातील शहीद लोकांवरील चरित्र आणि निबंधांव्यतिरिक्त, पाठ्यपुस्तकांमध्ये आता ‘आमरा तोमादर भुलबो ना’ (आम्ही तुम्हाला विसरणार नाही) हे गद्य आहे, ज्यामध्ये निदर्शनांदरम्यान पोलिसांनी गोळ्या झाडलेल्या विद्यार्थी-कार्यकर्त्या अबू सय्यद आणि मीर महफुजुर रहमान मुग्धो यांचे फोटो आहेत. इयत्ता आठवीच्या साहित्याच्या पाठ्यपुस्तकात शेख हसीना यांच्या विरोधी निदर्शनांवर एक निबंध आहे आणि ‘बांगलादेशसाठी बंगबंधू’ या प्रकरणाची जागा २०२४ च्या निदर्शनांमध्ये महिलांच्या भूमिकेवर आधारित ‘उद्रोहात महिलांची भूमिका’ या प्रकरणाने घेतली आहे.







