संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीत भारताने पाकिस्तानचा मुखवटा फाडून जगासमोर पुन्हा एकदा त्यांचे खरे रूप उघड केले आहे. गेल्या महिन्यात जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या सिंधू पाणी कराराबद्दल पाकिस्तानने खोटी माहिती दिल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका केली. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पर्वतनेनी हरीश यांनी म्हटले की, “दहशतवादाचे जागतिक केंद्र असलेल्या पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवेपर्यंत हा करार स्थगित राहील.” पाकिस्तानी प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्रांमध्ये कराराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, पाणी हे जीवन असून युद्धाचे शस्त्र नाही, असे म्हटले होते. यावर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. भारताने म्हटले की, जो देश दहशतवादी आणि नागरिकांमध्ये फरक करत नाही त्याला नागरिकांच्या सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हरीश म्हणाले की, “भारताने गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सहन केला आहे. मुंबईतील २६/११ चा हल्ला असो किंवा एप्रिल २०२५ मध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेला नरसंहार असो. त्यांचे लक्ष्य नेहमीच सामान्य नागरिक राहिले आहेत. अशा देशाने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या तोंडावर चापट मारण्यासारखे आहे,” अशी टीका हरीश यांनी केली आहे. अशा वर्तनानंतर या संस्थेत उपदेश करणे हे ढोंगीपणाचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादाला शून्य सहनशीलतेवर, त्याचे समर्थन करणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
अंडरट्रायल कैदी इम्रान खान प्रकरणी सशस्त्र दलाचे कॉन्स्टेबल निलंबित
पाकिस्तानविरोधात भारताला जर्मनीचा पाठींबा
मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात आता ‘ऑपरेशन सिंदूर’ ?
त्यांनी पुढे आरोप केला की, पाकिस्तानी सैन्याने या महिन्यात भारतीय सीमावर्ती गावांवर जाणूनबुजून गोळीबार केला, ज्यामध्ये २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. ८० हून अधिक जण जखमी झाले. गुरुद्वारा, मंदिरे, चर्च आणि रुग्णालये लक्ष्य करण्यात आली. तसेच अलीकडेच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सरकार, पोलिस आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते, असेही भारताने नमूद केले. यावरून स्पष्ट होते की ते दहशतवादी आणि सामान्य नागरिकांमध्ये फरक करत नाहीत. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतो, अशी टीका त्यांनी केली.







