अंडरट्रायल कैदी इम्रान खान प्रकरणात सशस्त्र दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून दोघांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध विभागीय चौकशी बसविण्यात आली आहे.
अमोल सरकाले आणि संदीप सुर्यवंशी अशी या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलची नावे आहेत. हे दोघे मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस विभागात तैनात होते. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ड्रग्सच्या गुन्ह्यात असलेला ड्रग्स माफिया इम्रान खान हा अंडरट्रायल कैदी आहे.
१६ मे रोजी इम्रान खान याच्या खटल्याची सत्र न्यायालयात तारीख होती, या दरम्यान इम्रान खानला तुरुंगातून न्यायालयात घेऊन जायचे आणि पुन्हा तुरुंगात आणून सोडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
हे ही वाचा :
शेअर बाजाराला मिळालेलं ‘गिफ्ट’ : आशीषकुमार चौहान
मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात आता ‘ऑपरेशन सिंदूर’ ?
काँग्रेसने १९९१ला केलेला करार हा देशद्रोह नाही का?
आमचे पाणी अडवले, तर आम्ही तुमचा श्वास रोखू!
इम्रानला सत्र न्यायालयात दुपारी दीड वाजता हजर करण्यात आले होते, न्यायालयाने पुढची तारीख दिल्यानंतर इम्रान खानला न्यायालयातून तुरुंगात घेऊन जाण्याऐवजी इम्रान खान हा एका दुचाकीवरून मनसे वाहतूक कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांचे कार्यालय असलेल्या सात रस्ता येथील जे. आर. बोरीचा मार्ग या ठिकाणी आला आणि त्याने मटकर याला धमकी देऊन निघून गेला होता.
ही सर्व घटना मटकर यांच्या कार्यालया बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या प्रकरणी मटकर यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले होते.
या संदर्भातील बातमी ‘न्यूज डंका’ने गुरुवारी रात्री प्रसारित केली होती. अखेर या वृत्ताची दखल घेऊन सशस्त्र दलाचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल सरकाले आणि संदीप सूर्यवंशी यांच्यावर शिस्तंभंगाची कारवाई करून दोघाना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.
