‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांचा प्रवास मी गेली दहा वर्ष अगदी जवळून बघतोय. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे, अशा अनेक गोष्टी ज्या जगाच्या दृष्टीने अत्यंत कठीण असतात, किचकट असतात गुंतागुंतीच्या असतात. त्या गोष्टी आशिषजींकडे सोपवल्या की अगदी सहज होतात, सुलभ होतात. त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट मला कायम जाणवली आहे, त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असते.
रामायणातील काही प्रसंग अदभूत आहेत. जे शिवधनुष्य रावणाला हलवता आले नाही, माता सीता त्या शिवधनुष्याशी लहानपणापासून खेळत असे. जगात अशक्यप्राय गोष्टी दोनच प्रकारे होतात. एक ईश्वराकडून किंवा त्याने प्रदान केलेल्या जन्मजात प्रज्ञेमुळे. काही मोजक्या लोकांकडे ही गॉडगिफ्ट असते. वयाच्या २४ व्या वर्षी इंजिनिअरिंग आणि एमबीए केलेला हा तरुण नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कोअर टीममध्ये सहभागी झाला. १९९२ ते २००० तो त्याच टीम मध्ये कार्यरत होता. तो नेहमी म्हणायचा, ‘मी गुजराती आहे आणि मी इंजिनियर सुद्धा आहे. त्यामुळे मला बाजार कळतो आणि तंत्रज्ञान सुद्धा
कळते.
२००० ते २००९ ते या काळामध्ये त्यांनी रिलायन्स समुहासोबत अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केलं. त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध होता की नाही हे माहित नाही, परंतु आयपीएलमध्ये समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सच्या जडणघडणीत त्यांची महत्वाची भूमिका होती. ते टास्क मास्टर आहेत. त्यांच्याकडे काहीही सोपवा, ते तुम्हाला यशस्वी करून देतात. हा एक असा गुण आहे ज्यामुळे कधी ते मुकेश अंबानी आणि सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा दोन अत्यंत शक्तिशाली व्यक्तिंचे ते विश्वासपात्र ठरू शकले.
२००९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मोर्चा वळवला ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’कडे. ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. २०१२ मध्ये मुख्य कार्यकारी पदावर त्यांना बढती मिळाली. ही जबाबदारी मिळाल्यानंतर पुढच्या काळामध्ये त्यांनी जे काही केले त्याचे वर्णन ‘कमाल’ या एकाच शब्दात होऊ शकते. ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’मध्ये यांनी डिजिटल क्रांती घडवली. बाजारातील सौदे स्क्रीनवर दिसू लागले. मोबाईलवर सौदे
होऊ लागले. तेही अवघ्या ६ सेकंदात. त्यांनीच ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चा आयपीओ आणला. ज्यांना हे शेअर मिळाले, त्यांची स्थिती ‘पाचो उंगलीया घी मे और सर कढाई मे’, अशी झाली. बीएसईमध्ये त्यांनीच डेरिव्हेटिव्ह मार्केटचा पाया
घातला.
हे ही वाचा:
‘पाक’ विरघळला, आता मिठाईचा नवा ‘श्री’गणेशा
काँग्रेसने १९९१ला केलेला करार हा देशद्रोह नाही का?
शिष्टमंडळाचे विमान उतरणार, तेवढ्यात युक्रेनचा विमानतळावर ड्रोन हल्ला… काय घडले?
मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात आता ‘ऑपरेशन सिंदूर’ ?
२०१२ ते २०२२ या काळात त्यांनी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ला त्यांनी एका नव्या उंचीवर नेलं. याच कामगिरीमुळे त्यांना २०२२ मध्ये ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ची सूत्र त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांचे सहकारी असं म्हणतात, ‘जिथे आग लागलेली असते तिथे आशिष चौहान यांना पाठवले जाते’. त्यांच्याकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज जबाबदारी आली तेव्हा परिस्थिती फार चांगली नव्हती. सीईओ म्हणून त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. फोन टॅपिंग घोटाळ्यांमुळे एनएसई वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तांत्रिक अडचणीही होत्या. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे बाजारात सौदे अचानक बंद पडत असत. बाजाराच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने हे निश्चितपणे चांगले नव्हते. आयपीओची प्रक्रिया रखडली होती. आशिषजींनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा आयपीओ आणला होता. त्यातल्या खाचाखोचा त्यांना व्यवस्थित माहित होता. त्यामुळे एनएसईच्या
आयपीओमध्ये असलेले बरेच गुंते त्यांनी सोडवत आणले आहेत. आयपीओचा मार्ग प्रशस्त केलेला आहे. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फिफ्टी हे त्यांचे यशस्वी प्रयोग. असे प्रयोग ज्यामुळे एनएसईने बाळसे धरले.
गिफ्ट निफ्टी…
‘गिफ्टी निफ्टी’ हे भारतीय शेअर बाजारासाठी मोठीच उपलब्धी ठरली. विदेशी गुंतवणूकदार ‘सिंगापूर स्टॉक एक्सचेंज’च्या ‘एसजीएक्स निफ्टी’वर व्यवहार करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे भारतात हवे होते. सिंगापूर, दुबईशी
स्पर्धा करू शकेल अशी ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी’ अर्थात ‘गिफ्टी सिटी’ची स्थापना करण्यात आली. हे मोदी यांचे स्वप्न होते. त्याची पूर्तता करण्याचे काम ३ जुलै २०२३ मध्ये एनएसईने गिफ्ट निफ्टी सुरू करून
केले. किती फरक पडला पाहा, परकीय गुंतवणुकदार आणि गुंतवणूक इथे आली. देशाला कर मिळू लागला. पूर्वी तिथे असलेले हायप्रोफाईल जॉब्स इथे आले. या सगळ्यावर भारताचे नियंत्रण आले हे विशेष. डॉलरमध्ये दिवसातील २१ तास
सौदे करण्याची मुभा इथे मिळाली. आशिषजींच्या मते हा फक्त एनएसईसाठीच नव्हे तर भारतासाठी टर्निंग पॉईंट ठरला. ‘गिफ्ट निफ्टी’ नसताना जे परकीय चलन देशाबाहेर जायचे ते बंद झालेच शिवाय भारताचे आर्थिक क्षेत्र अधिक
आत्मनिर्भर, जगाशी भक्कमपणे जोडलेले आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाले.
आशिषजींनी एनएसईच्या कारभारात सुधारणा केली. आधुनिकीकरणाच्या माध्यमातून बाजाराची कार्यक्षमता वाढवण्याचे काम केले. गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवला. जेव्हा सावळागोंधळ थांबतो तेव्हा आपोआपच कार्यक्षमता वाढते. अडथळे बाजूला केल्यावर पाणी व्यवस्थित वाहू लागले. गेल्या तीन वर्षांच्या काळात एनएसईची उलाढाल वाढलेली आहे. त्यामुळे नफा वाढतो. गुंतवणूकदारांची संख्या वाढते. कोविडनंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या प्रचंड वाढली. आय़पीओही विक्रमी संख्येने येत आहेत. जेव्हा व्याप वाढतो तेव्हा सावधपणाची गरज असते. ज्या विश्वासामुळे व्याप वाढतो तो विश्वास टिकवण्याची गरज असते. हे आशिषजींना माहित आहे. कंपन्यांना विस्तारासाठी
भांडवलाची गरज असते. आयपीओ हा त्याचा राजमार्ग आहे. त्यामुळे आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत राहणार हे त्यांनाही माहिती आहे.
एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले होते की, ‘मी कायम नर्व्हस असतो, आणि त्यामुळे सजग असतो’. हे त्यांच्या वैशिष्ट्यातील एक महत्वाचे वैशिष्ट्य. लवकरच एक दिवस असा येईल की एनएसईमध्ये आशिषजींनी जी लक्ष्य निश्चित केली होती ती पूर्ण होतील. मग आशिषजी पुन्हा अस्वस्थ होतील. तेव्हा कदाचित आणखी एखादे किचकट, गुंतागुंतीचे मिशन त्यांच्याकडे सोपवले जाईल. एक नवी क्षितीज धुंडाळण्यासाठी ते नवा प्रवास सुरू करतील. नव्याची रचना करण्याच्या एका नव्या उमेदीमुळे.
