भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा परिणाम सामन्यांमध्येही दिसून येत असून लोकांकडूनही पाकिस्तानचा निषेध केला जात आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जयपूरमधील मिठाई विक्रेत्यांनी वेगळाच निर्णय घेत त्यांच्या मिठाईच्या नावातून ‘पाक’ हा शब्द काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.
मिठाईंच्या नावातील ‘पाक’ या शब्दाच्या जागी ‘श्री’ किंवा ‘भारत’ वापरले जात आहे. पूर्वी मोती पाक, आम पाक, गोड पाक आणि म्हैसूर पाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पदार्थांची नावे आता मोती श्री, आम श्री, गोड श्री आणि म्हैसूर श्री अशी ठेवण्यात आली आहेत. तसेच, बिकानेरी मोती पाक आता बिकानेरी मोती श्री असून चंडी भस्म पाक आता चंडी भस्म श्री म्हणून ओळखला जात आहेत. तर, स्वर्ण भस्म पाक हे स्वर्ण भस्म श्री म्हणून विकले जात आहे.
मिठाई दुकानदारांचे म्हणणे आहे की, मिठाईच्या नावांमध्ये बदल हे ग्राहकांच्या सततच्या विनंत्यांमुळे झाले आहे. ‘पाक’ हा शब्द पाकिस्तानची आठवण करून देतो आणि सध्याची परिस्थिती पाहता, त्यामुळे ग्राहकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ‘पाक’ शब्दाचा अर्थ शिजवलेला किंवा स्वादिष्ट असा होतो. पण, भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांमध्ये लोक पाक या शब्दाला पाकिस्तानशी जोडू लागले आहेत. त्यामुळे ते नावात बदल करण्याचे सुचवत आहेत.
हे ही वाचा:
काँग्रेसने १९९१ला केलेला करार हा देशद्रोह नाही का?
महाकालेश्वर मंदिराजवळील बेगमबाग परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात
“मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ पदवी द्यावी”
दुकानदारांचे म्हणणे आहे की ग्राहकांनी मिठाईच्या नावांमध्ये बदलाचे स्वागत केले आहे आणि ते देशहितासाठी उचललेले देशभक्तीचे पाऊल असल्याचे म्हणतात. सोशल मीडिया वापरकर्तेही मिठाई विक्रेत्यांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. मिठाईच्या नावात ‘श्री’ आणि ‘भारत’ सारखे शब्द वापरणे याचा त्यांना अभिमान वाटतो, असे लोकांचे मत आहे. ग्राहकांव्यतिरिक्त, जयपूरच्या स्वीट्स असोसिएशनचे अनेक सदस्य देखील या नाव बदलाचे समर्थन करत आहेत.
