गेले अनेक महिने रशिया आणी युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतल्याचे समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दोन्ही राष्ट्रांमधील युद्ध संपवण्याच्या दृष्टीने म्हणून चर्चा केली आहे. त्यामुळे आता दोन वर्षांपासून अधिक काळ सुरु असलेलं युक्रेन- रशिया युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली. झेलेन्स्की यांनी एक्स वर ही घोषणा केली आणि सांगितले की, रशियन आक्रमकता थांबवण्यासाठी आणि कायमस्वरूपी, विश्वासार्ह शांतता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी ट्रम्प यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, मी लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार आहे. ही भेट रशियात होईल की अमेरिकेत होईल हे अद्याप ठरणं बाकी आहे. तसंच या दोन नेत्यांच्या चर्चेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सहभागी होतील की नाही हे देखील अद्याप निश्चित नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली हे ट्रम्प यांनीच स्पष्ट केलं आहे.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी फेब्रुवारी २०२२ यमध्ये रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ला केला त्यानंतर इतर युरोपियन देशांप्रमाणे युक्रेनच्या नाटो सदस्यात्वाला पाठिंबा दिला होता. याबद्दलचं धोरण ट्रम्प यांनी बदललं आहे. या धोरणाबाबतही ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली.
हे ही वाचा:
वादानंतर समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो चे सर्व व्हिडीओ हटवले
पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…
ठाकरेंना सोडून राजन साळवी आले शिंदेंकडे!
डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ, राजदूत आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना वाटाघाटींचे नेतृत्व करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आहे. ही टीम त्यांच्या कामात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्या आधीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जवळजवळ तीन वर्षे पुतिन यांच्याशी कोणताही संवाद साधला नाही. रशियाला भेट देणारे शेवटचे अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा होते, जे २०१३ मध्ये तेथे झालेल्या G-20 शिखर परिषदेत सहभागी झाले होते.







