ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केलेल्या एकनाथ स्तुतीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. किंबहुना, खळबळ निर्माण करण्यासाठीच पवारांनी ही स्तुती केली असावी, असेही
काहींचे म्हणणे आहे. पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. संजय राऊत बिथरले. ‘हे साहित्य संमेलन नसून दलालांचे संमेलन आहे’, असा दावा करून
त्यांना तमाम साहीत्यिकांना दलाल ठरवले. पवारांना याच्याशी काही घेणे-देणे नसावे, त्यांना जे काही साध्य करायचे ते त्यांनी करून टाकले.
विविध पक्षांचे राजकीय नेते जेव्हा एका मंचावर येतात, तेव्हा ते एकमेकांवर स्तुतीसुमने उधळतात. खरे तर ही स्तुतीची देवाण-घेवाण असते. पवारांनी म्हणावे की, ‘एकनाथ शिंदे म्हणजे नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता’, त्यावर
शिंदेंनी म्हणावे, ‘पवारांना गुगली टाकता येतो, परंतु ते माझ्यावर कधीही गुगली टाकणार नाहीत’. अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात थोर मराठा सेनानी महादजी शिंदे यांच्या नावे एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देताना शरद पवारांनी ही
स्तुतीसुमने उधळली.
कधी काळी महादजी शिंदे यांनी दिल्लीचे मुघल तख्त फोडले होते. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन मविआचे हिरवे तख्त फोडले. त्या तख्ताचे आपण रिमोट कंट्रोल होतो, याचाही पवारांना शिंदेंची स्तुती करताना विसर पडला असावा. ‘ठाण्याच्या प्रगतीत, महाराष्ट्राच्या विकासात एकनाथ शिंदे यांचे योगदान आहे, त्यांना नागरी समस्यांची जाण आहे’, असे कौतुक करताना पवारांनी शिंदेंचे मोठेपण सांगण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. एकनाथ स्तुतीमुळे ठाकरेंना मिर्च्या झोंबण्याचे काहीच कारण नव्हते. कारण एकनाथ शिंदे यांच्याबाबत सामनातून अलिकडेच हळहळ व्यक्त केली होती. बऱ्याच काळानंतर त्यांचा मिंधे असा उल्लेख न करता शिंदे असा उल्लेख करण्यात आला होता.
महायुतीमध्ये येऊन शिंदेंची कशी फसवणूक झाली आहे, त्यांना कसे बाजूला टाकण्यात आले आहे, याबाबत ठाकरेंनी बरीचं आसवं गाळली होती. त्या शिंदे यांना पुरस्कार मिळाला, पवारांनी त्यांचे कौतुक केले, याचे खरे तर त्यांना समाधान वाटायला हवे होते. परंतु तसे घडले नाही, शिंदे महाराष्ट्राचे गद्दार आहेत, आंतरराष्ट्रीय दलाल आहेत, त्यांनी महाराष्ट्राला कमजोर केले असा पुन्हा एकदा राऊतांना साक्षात्कार झाला.
उद्धव ठाकरेंना नेमका कसला त्रास झाला, हे समजणे फार कठीण नाही. मविआची सत्ता पायउतार झाल्यानंतर ‘लोक माझ्या सांगाती’च्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री असताना ठाकरेंकडे आजूबाजूला काय सुरू आहे, त्याची माहिती नसे. त्यांच्याकडे अनुभव नव्हता. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे संवाद साधण्याची हातोटी नव्हती, त्यांची प्रशासनावर पकड नव्हती, असे मत नोंदवून पवारांनी ठाकरेंचे पार वस्त्रहरण केले होते. ठाकरेंना अनुभव नाही, त्यांना काही कळत नाही, असे म्हणणारे शरद पवार एकनाथ शिंदे यांचे मात्र तोंडभरून कौतुक करतात, ही बाब ठाकरेंना झोंबणे स्वाभाविक होते.
हे ही वाचा:
जीबीएसचा बळी, मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद
भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर ‘डी-लिट’ ने सन्मानित
‘ख्रिश्चन धर्म स्वीकारा नाहीतर घर विकून निघून जा’
महाकुंभ : ‘माघ पौर्णिमेला’ १ कोटी ३० लाख भाविकांनी केले स्नान!
गेले काही दिवस ठाकरे आणि राऊत आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असे वारंवार सांगून दंड थोपटत होते. त्यावेळी शरद पवार काय म्हणाले होते ते आठवा. ‘ठाकरेंनी अशी भूमिका घेतली असली तरी ते दोन
दिवसांपूर्वी मला भेटून गेले. त्यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली. ते अशी काही टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही’, असे पवार म्हणाले होते. ठाकरे टोकाची भूमिका घेतील न घेतील परंतु पवार तशी भूमिका घेणारच नाहीत, असे
कोणीही छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही.
सुप्रिया सुळे अलिकडे देवेंद्र फडणवीस यांची तारीफ करत असतात, थोरले पवार एकनाथ शिंदे यांची प्रशंसा करतात. उत्तम जानकर अजित पवारांची भेट घेतात, या घडामोडी उद्धव ठाकरेंना निश्चितपणे सुखावणाऱ्या नाहीत. गमतीचा भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांचे शरद पवारांनी कौतुक केले तर ठाकरेंच्या पोटात मुरडा उठतो. परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र, त्यांच्या पक्षाचे अन्य नेते वारंवार त्यांच्या गाठीभेटी घेतायत, त्याचे काय? ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांशी सूत जुळवण्याचे प्रयत्न केले तर ती गद्दारी होत नाही, त्यामुळे महाराष्ट्र कमजोरही होत नाही. शरद पवारांनी या भेटींबाबत कधीही नापसंती व्यक्त केली नाही. त्यांचा तो स्वभाव नाही. परंतु एकनाथ शिंदे
यांच्या सत्काराला पवार गेले तर राऊत आणि ठाकरेंना ते मान्य होत नाही.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले नसते तरी त्यांच्यात दानत आहे, म्हणून त्यांनी लोक जोडले आहेत. वारकरी प्रवचनकार, कडवट हिंदुत्ववादी शिरीषराव मोरे महाराज यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे उघड होताच, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कुटुंबिंयांकडे ३४ लाखांची मदत रवाना केली. तातडीने मदत त्यांच्या कुटुंबियांना मिळावी, म्हणून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना तिथे रवाना केले. रोज उठून लोकांना मी हिंदुत्व सोडलंय का? असा सवाल विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना हे सुचले नाही. एकनाथ शिंदे यांना देण्याची सवय आहे, ते लोकांच्या मदतीसाठी उभे राहतात म्हणून पवारांसारख्या नेत्यालाही त्यांचे कौतुक करावेसे वाटते. घेण्यासाठी जन्म आपूला हे ज्यांचे ब्रीद आहे, त्या ठाकरेंनी मागितल्या नंतरही त्या चंद्रभागा आजींना घर दिले नाही. हा दोघांतला फरक. त्यामुळे
उगाच कोणी तरी कोणाचे तरी कौतुक केले म्हणून तुम्हाला पोटदुखी होणाचे कारण नाही. तुम्ही नाकं मुरडली म्हणून तुमच्या तालावर नाचण्या इतकेही पवार कमजोर झालेले नाहीत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)