भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर यांना त्यांच्या २० वर्षातील समाजकार्याची दखल घेत अरुणाचल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडीज यांच्यातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी-लिट) ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. इटानगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चाऊनामैन यांच्याहस्ते देवधर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वविद्यालयाचे कुलाधिपति कमललोचन, प्रो-चांसलर विश्वलोचन आणि भूतानचे माजी खासदार डपठोब यांगसेप उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असा देवधर यांचा प्रवास आहे. त्यांच्या या सामाजिक जीवनात त्यांनी केलेल्या समाजसेवेची दखल या संस्थेने घेतली. संघ प्रचार असताना खास करून ईशान्य भारतात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिथली स्थानिक भाषा शिकून केलेले कार्य हे अतुलनीय आहे. प्रचारक म्हणून दिलेली जबाबदारी संपल्यानंतर देवधर हे तिथल्या लोकांना विसरले नाहीत. ईशान्य भारतातील नागरिकांना देशभरामध्ये आपलेपणाची वागणूक मिळावी आणि त्यांच्या मनात देशभक्तीची भावना दृढमूल व्हावी या हेतूने त्यांनी २००५ साली ‘माय होम इंडिया’ या देशव्यापी समाजसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेला आता २० वर्षे होऊन गेली आहेत.
हेही वाचा..
जीबीएसचा बळी, मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद
हैदराबादमधील हनुमान मंदिरात सापडले मांसाचे तुकडे, भाविकांमध्ये संतापाची लाट!
काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार दोषी
एकाच नावाच्या दोघांचा दावा मलाच ‘पद्मश्री’!
‘माय होम इंडिया’ने गेल्या २० वर्षांत सव्वा लाखाहून अधिक ईशान्य भारतीयांच्या अनेक प्रकारच्या अडचणी सोडविल्या आहेत. संकटप्रसंगी त्यांना मदत केली आहे. उर्वरित भारतात आपल्याला ‘माय होम इंडिया’चा आधार आहे अशी भावना ईशान्य भारतातील लोकांमध्ये रुजली आहे.
देवधर यांच्या संकल्पनेतून हरवलेल्या, पळून गेलेल्या, पळवण्यात आलेल्या आणि पोलिसांना सापडल्यानंतर बालगृहांमध्ये खितपत पडलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप पोहोचविण्याचे कार्य ‘सपनों से अपनों तक’ या प्रकल्पाअंतर्गत केले जाते. गेल्या १२ वर्षांत देशभरातील ७२ बालगृहांतून ३,७०० हून अधिक मुलांना संस्थेने त्यांच्या घरी पोहोचविले आहे.
“जनआरोग्य रक्षा” ही देवधर यांची आणखी एक महत्त्वकांक्षी समाजोपयोगी संकल्पना आहे. दुर्धर रोगाने ग्रस्त असलेल्या गरीब रुग्णांना आणि त्यांच्या हतबल नातेवाईकांना अनेक प्रकारे संस्थेला शक्य असेल तितकी मदत करणे, कोणत्याही प्रकारच्या अडवणुकीपासून त्यांची रक्षा करणे, त्यांना मानसिक आधार देणे असे महत्त्वाचे कार्य याअंतर्गत केले जाते. आतापर्यंत संस्थेने एक लाखाहून अधिक रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सेवा केली आहे.
जामीन मिळवण्यासाठी पैसे नसल्यामुळे लहानसहान गुन्ह्यातील असंख्य आरोपी तुरुंगात कच्च्या कैदेत खितपत पडलेले असतात. तेथे त्यांच्यावर इतर नामचीन गुन्हेगारांचा प्रभाव पडून ते मोठे गंभीर गुन्हे करण्याची किंवा देशद्रोह्यांना सामील होण्याची शक्यता असते. अशा कच्च्या कैद्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्याचे काम “दर्द से हमदर्द तक” या संकल्पने अंतर्गत राबवले जाते. आत्तापर्यंत संस्थेमार्फत ४०० हून अधिक कच्च्या कैद्यांना सोडविण्यात यश आले आहे. अशा विविध प्रकारच्या समाजकार्याची दखल घेत देवधर यांना डी-लिट पदवी देऊन गौरवण्यात आले आहे.