“हम शोर नहीं करते हैं, सीधा शिकार करते हैं”, “औरंग जब तू मरेगा तब यह तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी” हे संवाद ऐकताच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या धाडसाची, साहसाची कथा लवकरच ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे मराठा साम्राज्यातील एका महान नायकाची ओळख जगभरात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाप्रमाणेच आपण महाराजांचा दैदीप्यमान इतिहास शाळेपासूनच वाचत आलो आहोत. यापूर्वी सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून हा इतिहास लोकांसमोर मांडला गेला, पण आता लक्ष्मण उतेकर यांच्या सिनेमाच्या माध्यमातून हा ज्वलंत इतिहास आपल्याला भव्य- दिव्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर येणारा हा सिनेमा हिंदी भाषेत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगभरात त्यांच्या शौर्याची, धाडसाची, धर्मासाठी बलिदान देणाऱ्या वीराची कथा पोहचणार आहे हे नक्कीच.
बॉलीवूडचा एकूणच ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीतला प्रवास पाहिला तर छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान पराक्रमी योद्ध्यावर हिंदी भाषेत चित्रपट काढणं हे कौतुकास्पद आहे, असं म्हणण्याला वाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अशा अनेक स्वराज्याच्या, मराठा साम्राज्याच्या नायकांच्या शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पहाण्याची संधी लोकांना फार कमी मिळाली. मुघल सम्राट, बादशाहांच्या प्रेमात पडलेल्या बॉलीवूडला आता हिंदुस्तानच्या खऱ्या नायकांची ओळख होऊ लागली आहे, असं म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधणीसाठी आखलेली व्यूहरचना, केलेल्या लढाया, रचलेले डावपेच, महाराजांच्या धाडसी मावळ्यांच्या कथा आणि पुढे हेचं स्वराज्य टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतर नायकांचा लढा याच्या कथा फारशा बॉलीवूडमध्ये कधी दाखवल्या गेल्या नाहीत.
साधारण १९३० साली बॉलीवूड इंडस्ट्री नावारूपाला आली. पुढे १९४०- ६० च्या काळात या इंडस्ट्रीचा नावलौकिक वाढला. तेव्हापासून आपण ऐतिहासिक सिनेमांची यादी पाहिली तर यात मुघल काळावर चित्रित झालेले अनेक सिनेमे अधिक दिसून येतात. मुघल सम्राट, बादशाह कसे प्रेमळ होते, त्यागमूर्ती होते, असं जवळपास प्रत्येक सिनेमांमधून दाखवलं गेलं. सातत्याने या मुघल बादशाहांच्या प्रेम कथा दाखवून लोकांसमोर त्यांना प्रेमाचे प्रतिक म्हणूनचं मोठं केलं गेलं. १९५३ साली आलेला अनारकली सिनेमा, १९६० मधील मुघल-ए-आझम, २००८ मधील जोधा- अकबर, २००५ सालचा ताज महाल असे अनेक बॉलीवूडमधील चित्रपट सुपरहिट ठरले. या सिनेमांमुळे लोकांच्या मनात मुघलांची एक प्रेमळ छबी कोरली गेली. लोकांना हे मुघल बादशाहचं महान वाटू लागले. या सिनेमातून सेट्सच्या माध्यमातून मुघल कालीन महाल, भव्य वास्तू, त्यांची श्रीमंती असं सगळंचं उभं करण्यात आलं. त्यांच्या त्या वास्तूंच्या प्रेमात लोकांना पाडण्यात आलं, त्याची ओळख लोकांना झाली. पण, मुघलांची दुसरी बाजू म्हणजे त्यांची खरी बाजू फारशी समोर आणली गेली नाही. मुघलांनी हिंदुस्तानवर आक्रमण करून इथल्या समाजावर, स्त्रियांवर केलेला हिंसाचार सिनेमांमधून कधी दाखवला गेला नाही. त्यांची क्रूरता समोर आणली गेली नाही. धार्मिक स्थळांची केलेली नासधूस, लुटमार यावर सिनेमे बनले नाहीत.
पण, याचं मुघलांना पळता भुई थोडी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर नायकांची महानता दाखवतील असे फारचं कमी सिनेमे बॉलीवूडमध्ये बनले आहेत. एखादी कलाकृती बॉलीवूडच्या माध्यमातून देशभरात आणि जागतिक पातळीवर अधिक लोकांपर्यंत पोहचवणे शक्य आहे. आर्थिक गोष्टींचा विचार करता मराठा साम्राज्याची भव्यता, महाराजांचे गड- किल्ले, त्यांनी उभं केलेलं स्वराज्य हे बॉलीवूडच्या सिनेमांमधून अधिक योग्यपणे दाखवता येऊ शकते. त्यासाठीचे बजेट उभं करता येऊ शकते. पण, बॉलीवूडमध्ये अजून मराठा साम्राज्याच्या धाडसी कथांना फारसा वाव मिळालेला दिसत नाही. शिवाय इतर ऐतिहासिक विषयांवरही फारसे सुपरहिट चित्रपट आलेले ऐकिवात नाही. राम सेतू, आदिपुरुष, सम्राट पृथ्वीराज, पानिपत असे अनेक चित्रपट बॉलीवूडने दिले पण कथा, संवाद, चित्रपटांची मांडणी, अभिनय यात राहिलेल्या कमतरतेमुळे या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. तान्हाजी, बाजीराव मस्तानी अशा काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली पण यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर धाडसी वीर यांचे व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत पूर्णपणे पोहचलेच नाही. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची कथा सांगणारा सिनेमा २०२० मध्ये आला. तर, आणखी एक प्रेक्षकांना पसंतीस पडलेला सिनेमा बाजीराव मस्तानी हा सिनेमा २०१५ आली आला. त्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांची कथा सांगणारा ‘छावा’ सिनेमा बॉलीवूडमध्ये येत आहे.
हे ही वाचा
जीबीएसचा बळी, मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद
हैदराबादमधील हनुमान मंदिरात सापडले मांसाचे तुकडे, भाविकांमध्ये संतापाची लाट!
काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार दोषी
एकाच नावाच्या दोघांचा दावा मलाच ‘पद्मश्री’!
एका मराठी दिग्दर्शकाने छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान पराक्रमी योद्ध्यावर हिंदी भाषेत चित्रपट काढणं हे कौतुकास्पद आहे. याआधी लक्ष्मण उतेकर यांनी ‘टपाल’ आणि ‘लालबागची राणी’ या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर, हिंदीमध्ये त्यांनी ‘लुकाछुपी’ आणि ‘मिमी’ हे दोन सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. मात्र, ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन ते पहिल्यांदा करत आहेत. आपल्या पहिल्या ऐतिहासिक सिनेमाच्या माध्यमातून ते इतिहासाच्या एका सुवर्ण अध्यायाची ओळख जगाला करून देणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा देशभरातील लोकांना कळेल हे नक्की. बॉलीवूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर येत असलेला बिग बजेट सिनेमा यशस्वी झाल्यास ही बॉलीवूडमधील परिवर्तनाची सुरुवात आहे, असे म्हणता येईल. खऱ्या धाडसी कथा, शूरवीरांच्या शौर्य कथा सांगणारे सिनेमे भविष्यातही येत राहो, अशी अपेक्षा ठेवत या सिनेमाचे नक्कीच स्वागत करायला हवे.