उबाठा गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज (१२ फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत या चर्चेला पूर्णविराम लावला. राजन साळवी यांचा राजीनामा हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राजन साळवी आता शिवसेना शिंदे गटात सामील होणार आहेत.
राजन साळवी गुरुवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच साळवी यांना मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. अखेर या निष्ठावंताने ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा :
भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर ‘डी-लिट’ ने सन्मानित
जीबीएसचा बळी, मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद
काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार दोषी
एकाच नावाच्या दोघांचा दावा मलाच ‘पद्मश्री’!
राजन साळवींच्या राजीनाम्यावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसैनिक शिल्लक सेनेत राहणार नाहीत, त्यांच्या पक्षाला घरघर लागली आहे. उबाठाने बाळासाहेबांचे विचार, तत्व सोडून दिलेली आहेत. त्यामुळे सर्व जण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली येणार आणि काम करणार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही कोकणाने दाखवून दिले आहे कि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदेच करू शकतात, असे नरेश मस्के म्हणाले.
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, गेले बरीच दिवस ते कोठे जायचा विचार करत होते. पण खरचं जर ते आमची साथ सोडत असतील तर ते अत्यंत क्लेशकारक आहे. जुना सहकारी आमच्या पासून दूर जात असल्याने याचा मला आनंद नाही. अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ते जर पक्ष सोडत असतील तर अधिक भाष्य करणे योग्य नाही, असे जाधव म्हणाले.