अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापार युद्ध भडकले होते. याचा परिणाम जगभरातील इतर देशांमध्येही दिसून आला होता. आता अखेर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी सोमवारी एकमेकांच्या वस्तूंवरील शुल्क सुरुवातीच्या ९० दिवसांसाठी मागे घेण्यावर सहमती दर्शविली आहे. यामुळे अमेरिका आणि चीनसह इतर देशांनीही दिलासा व्यक्त केला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीवर मोठे शुल्क लादल्यानंतर वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील ही पहिली उच्चस्तरीय चर्चा आहे. या आठवड्याच्या शेवटी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे झालेल्या व्यापार वाटाघाटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. या करारानुसार अमेरिका चिनी वस्तूंवरील शुल्क १४५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत कमी करेल. तर चीन अमेरिकन आयातीवरील शुल्क १२५ टक्के वरून १० टक्क्यांपर्यंत कमी करेल, असे निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही बाजूंनी चीनचे उपपंतप्रधान हे लाइफेंग आणि अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक आणि व्यापार संबंधांबद्दल चर्चा सुरू ठेवण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यासही सहमती दर्शवण्यात आली आहे. “आम्हाला असा निष्कर्ष काढता आला की आमचे समान हितसंबंध आहेत,” असे न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बेसेंट यांनी जिनेव्हा येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
हे ही वाचा..
उद्या दहावीचा निकाल! कुठे पाहता येईल निकाल?
या ग्लासमध्ये लपलंय संपूर्ण ब्रह्मांड!
बीएलए म्हणते आम्ही कोणाच्याही हाती बाहुलं नाही!
केस गळण्यामागची काय आहेत कारणे ?
काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध अधिकाधिक तीव्र होत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशांशी व्यापार तूट आहे अशा अनेक देशांवर परस्पर कर लादले होते. नंतर, अनेक देशांनी व्यापार करारासाठी अमेरिकन प्रशासनाशी चर्चा सुरू केल्यानंतर, अध्यक्ष ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी कर थांबवण्याचा निर्णय घेतला होता.







