भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने सोमवारी टेस्ट क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा करत क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. विराटने एका भावनिक पोस्टद्वारे आपल्या टेस्ट करिअरमधील आठवणी शेअर करत शेवटचा निरोप घेतला. त्याच्या या निर्णयावर संपूर्ण क्रिकेटविश्वातून भावनिक प्रतिक्रिया उमटल्या.
टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ‘X’वर विराटसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, “शेरासारख्या जोशाने खेळणारा माणूस, विराट तू खूप आठवशील!”
बीसीसीआयने कोहलीच्या १३ वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीची आठवण करून दिली. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट पदार्पण आणि २०१२ मध्ये अॅडिलेडमध्ये केलेले पहिले शतक, तसेच २०१४ मध्ये कर्णधार म्हणून केलेली सुरुवात आणि दोन्ही डावांत शतक झळकावण्याचा पराक्रम – या साऱ्या क्षणांची उजळणी बीसीसीआयने आपल्या पोस्टमधून केली.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “विराट कोहलीने टेस्ट क्रिकेट केवळ खेळले नाही, तर ते आत्मा, शौर्य आणि अभिमानाने जपले. आधुनिक युगात टेस्ट क्रिकेटसाठी त्यांनी एक अनुकरणीय उदाहरण निर्माण केले.”
इरफान पठान यांनी लिहिले, “कर्णधार म्हणून तू सामनेच नाही तर, खेळाडूंमध्ये सामने जिंकण्याची मानसिकता रुजवलीस. तू फिटनेस, आक्रमकता आणि जिंकण्याच्या जिद्दीचा नवा मापदंड तयार केलास.”
कोहलीच्या मित्राने आणि दक्षिण आफ्रिकेच्या माजी फलंदाजाने ए.बी. डिविलियर्सने लिहिले, “तुझा निश्चय आणि कौशल्य नेहमी प्रेरणा देत राहील. तू खरा लिजेंड आहेस.”
आकाश चोप्रा, हरभजन सिंग यांसह अनेक माजी खेळाडूंनीही कोहलीच्या या निर्णायक टप्प्यावर त्याला शुभेच्छा दिल्या आणि टेस्ट क्रिकेटसाठी त्याच्या योगदानाची आठवण करून दिली.
आता विराट पुन्हा कधीही पांढऱ्या कपड्यांत दिसणार नाही, पण त्याच्या बॅटने निर्माण केलेला तो आवाज आणि त्याच्या डोळ्यातला तो जिंकण्याचा तळमळ – तो कायम क्रिकेटच्या इतिहासात जिवंत राहील.
