डिप्रेशन म्हणजेच नैराश्यामुळे मेंदूच्या गंभीर आजार डिमेन्शिया होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असं एका नव्या जागतिक संशोधनातून स्पष्ट झालं आहे. हा धोका मध्यम वयात (४०-५० वर्षे) आणि ५० वर्षांवरील लोकांमध्ये विशेषतः दिसून येतो.
डिमेन्शिया हा एक मेंदूचा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता कमकुवत होत जाते. सध्या जगभरात सुमारे ५.७ कोटीहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. डिमेन्शियासाठी कोणताही ठोस इलाज उपलब्ध नसल्यामुळे, याचे कारण वेळीच समजून घेणे आणि योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
या संशोधनात असे आढळले की, डिप्रेशन आणि डिमेन्शिया यांच्यातील नाते अतिशय गुंतागुंतीचे आहे. दीर्घकाळ टिकणारी शरीरातील सूज, मेंदूतील रासायनिक बदल, रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडणे, न्यूरोट्रांसमीटरचे असंतुलन, आणि आनुवंशिक घटक हे सर्व डिमेन्शिया वाढण्यास कारणीभूत ठरतात.
ब्रिटनमधील नॉटिंघम विद्यापीठाच्या मानसिक आरोग्य संस्थेचे जेकब ब्रेन सांगतात, “मानसिक आजारांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.”
या विषयावर आधी अनेक स्वतंत्र संशोधनं झाली होती. मात्र डिप्रेशन नेमकं कुठल्या वयात डिमेन्शियाचा धोका सर्वाधिक वाढवते, हे अजून पूर्णतः स्पष्ट नव्हतं. काही संशोधनानुसार मध्यम वयातील डिप्रेशन अधिक घातक ठरते, तर काही अभ्यास वृद्धावस्थेतील डिप्रेशन अधिक धोकादायक असल्याचे सांगतात.
या नव्या अभ्यासात मागील २० हून अधिक अभ्यासांचं विश्लेषण करण्यात आलं असून, यात ३४ लाखांहून अधिक लोकांचा समावेश आहे. या माध्यमातून वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे की, वृद्धावस्थेतील डिप्रेशन हा डिमेन्शियाचा एक प्राथमिक लक्षण असू शकतो.
जेकब ब्रेन म्हणतात, “जर आपण डिप्रेशनला लवकर ओळखलं आणि त्यावर योग्य उपचार केले, तर डिमेन्शियासारख्या गंभीर आजारापासून वाचण्याची शक्यता नक्कीच वाढते.”
